News Update :

ही फटाक्याची वात आहे

Thursday, February 23, 2012



मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांची व त्यांच्या कुटुंबीयांची स्थावर व जंगम मालमत्ता त्यांच्या मोटारींच्या मोठय़ा ताफ्यासह जप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले याचा कोणत्याही पक्षाच्या पुढार्‍याने आनंद मानण्याचे कारण नाही. भ्रष्टाचार व बेकायदेशीर मार्गाने मालमत्ता मिळविलेल्या व मिळवणार्‍या सर्वपक्षीय पुढार्‍यांसाठी वाजलेली ही धोक्याची घंटा आहे. आपण मिळविलेली अशी संपत्ती लोकांच्या नजरेला येत नाही या भ्रमात अशा पुढार्‍यांना राहता येणार नाही. जेमतेम ४५ हजार रुपये वेतन असलेल्या कृपाशंकर सिंग यांनी अल्पावधीत ३२0 कोटींची माया जमविली हे भ्रष्ट वास्तव संजय तिवारी या डोळस कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकाराचा वापर करून उघडकीला आणले.. हा मार्ग आहे आणि त्यावरून डोळस नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या वर्गाने जायचे आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना दाखविलेली मालमत्ता ही हा मार्ग दाखविणारी दिशा आहे. यापुढे कोणत्याही उमेदवाराला त्याची मालमत्ता लपविता येणार नाही आणि जो ती लपवील त्याचा कृपाशंकर झाल्याशिवाय राहणार नाही हा या घटनेने स्वच्छताप्रेमी नागरिकांना दिलेला दिलासा आहे. साध्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराची मालमत्ता पाच वर्षांत अनेक पटींनी कशी वाढते, आमदारांचे महाल कसे उभे होतात, पुढार्‍यांना शेकडो एकर जमिनी कशा विकत घेता येतात, मुंबईसारख्या शहरात पुढार्‍यांचे डझनांनी फ्लॅट्स कसे असतात आणि कोणता पुढारी केरळात शेकडो एकरांच्या नारळाच्या बागा विकत घेतो याचे रहस्य उलगडण्याच्या शक्यता आता निर्माण झाल्या आहेत. परवापर्यंत स्कूटरने फिरणारे पुढारी विमाने विकत घेतात, त्यांच्या मोटारींच्या ताफ्यात हेलिकॉप्टरे आली असतात आणि त्याच्या परिसरात येणार्‍या प्रत्येकच उद्योगात त्याची भागीदारी कशी असते याचीही माहिती आता उपलब्ध होऊ शकणार आहे आणि त्याविषयीचा जाब या पुढार्‍यांना द्यावा लागणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या एका नवृत्त सचिवाच्या नावावर मुंबईत २६ फ्लॅट्स आहेत की २७ असा प्रश्न आपल्याला पडल्याचे एका मुख्यमंत्र्यांनीच एकदा बोलून दाखविले. एकमेकांना ठाऊक असणारा आणि परस्परांना सांभाळून करायचा हा खेळ आहे हे यातून सार्‍यांच्या लक्षात यावे. या खेळात विरोधी पक्षाचे लोकही सहभागी असतात. त्यांनी दहा घेतले तर ते पचवायला यांच्या वाट्याला त्यातले ४-५ तरी येतातच. मग ते मंत्री चांगले ठरतात आणि विरोधकही सज्जन ठरविले जातात. त्यातून सरकार पक्षातील पुढार्‍यांएवढय़ाच विरोधी पक्षातील नेत्यांच्याही इस्टेटी मजबूत होतात आणि वाढतात. परिणामी, हे गेले काय आणि ते आले काय सारे सारखेच असे कपाळावर हात मारून घेत साधी माणसे एकमेकांना सांगताना दिसतात. या सार्‍यांसाठी संजय तिवारींनी मार्ग दाखविला आहे आणि त्याचे अनुसरण होण्याची गरज आहे. कार्यकर्ते, पुढारी, मंत्री, विरोधी नेते आणि आपल्या गावचे व शेजारचे पुढारी म्हणून मिरवणारे सारेच अल्पकाळात धनवंत झाले म्हणून अचंबा करण्याचे दिवस संपले आहेत. त्यांच्या श्रीमंतीची चौकशी करण्याचे व तिचे खोटेपण लक्षात आले तर ते उघड करण्याचे दिवस आले आहेत. कृपाशंकर हे भ्रष्टाचार नावाच्या फटाक्याच्या लडीला असलेल्या वातीचे एक टोक आहे. एका चांगल्या दिवाळीचा हा आरंभ आहे आणि यापुढच्या फटाक्यांच्या स्फोटांची वाट आपण पहायची आहे. 
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.