भारतीय हॉकी संघाचा पुनर्जन्मच झाला आहे; परंतु लंडन ऑलिंपिकमध्ये खेळायला मिळतेय, एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही, तर "सोने' लुटूनच परत यायला हवे.
ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने सपाटून मार खाल्ला, त्याच दिवशी इकडे नवी दिल्लीत फ्रान्सचा दणदणीत पराभव करून भारतीय हॉकी संघाने आपली लंडनवारी निश्चित केली आहे! कोणे एके काळी हॉकीचे अनभिषिक्त सम्राट म्हणून भारताचा जगभरात वावर होता. ऑलिंपिकमध्ये एकदा दोनदा नव्हे, तर आठ वेळा सुवर्णपदक जिंकण्याचा मान हॉकीपटूंनी आपल्याला मिळवून दिला होता. पण, बघता बघता दिवस पालटले. गोऱ्या टोपीकरांनी भारतात आणलेल्या चेंडूफळीच्या खेळातून सोन्याचा धूर निघतोय, हे क्रीडा क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या राजकारण्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुकारलेल्या खेळाडूंच्या लिलावात दिग्गज विक्रमवीरही सामील झाले आणि "राष्ट्रीय खेळ' म्हणून कागदोपत्री नोंद असलेल्या हॉकीला कवडीइतकी किंमत उरली नाही. त्याचीच परिणती बीजिंग ऑलिंपिकसाठी पात्रता फेरीत खेळायला लागण्यात झाली आणि तेथेही पदरी पराभवच आला. गेली आठ वर्षे भारतातील इनेगिने हॉकीप्रेमी भारत ऑलिंपिकमध्ये पुन्हा कधी खेळेल, यासाठी देव पाण्यात घालून बसले होते. त्यांच्या आशा-आकांक्षांची पूर्ती अखेर झाली आहे आणि आता भारतीय हॉकी संघ लंडन ऑलिंपिकमध्ये दिमाखाने सहभागी होणार आहे. हा एका अर्थाने भारतीय हॉकी संघाचा पुनर्जन्मच असला, तरी पुनरुत्थानाची ही लाट भारताच्या सीमारेषा ओलांडून सातासमुद्रापलीकडे जायला हवी. केवळ लंडन ऑलिंपिकमध्ये खेळायला मिळतेय, एवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही, तर भारतात क्रिकेटची स्थापना करणाऱ्या त्या टोपीकराच्या मायभूमीतून "सोने' लुटूनच आपल्या संघाने परत यायला हवे, तरच क्रिकेटच्या मागे वेड्यासारखे धावणाऱ्या भारतीयांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाईल. अर्थात, या पात्रता फेरीत भारतीय हॉकी संघ ज्या तडफेने आणि जिद्दीने खेळला, ते बघता आठ वर्षांतील मानहानीचा बदला हा संघ लंडनमध्ये निश्चितच घेईल, असे खात्रीने म्हणता येते. त्यातही आपल्या हातावर पाच खंडांचे प्रतीक असलेली चक्राची मुद्रा गोंदवून ठेवणाऱ्या संदीपसिंहाचा सर्वार्थाने "सिंहा'चा वाटा आहे. या पात्रता फेरीतील सहा सामन्यांत भारताने नोंदवलेल्या 44 पैकी 16 गोल एकट्या संदीपच्या नावावर आहेत, हे लक्षात घेतले की त्याच्या कामगिरीचे मोल लक्षात येते. अंतिम सामन्यात भारताने फ्रान्सचा 8-1 असा धुव्वा उडवला, त्यातही संदीपचा वाटा एका हॅटट्रिकसह पाच गोलांचा होता. त्यामुळेच संदीपसह संपूर्ण भारतीय संघावर आज भारतवर्षांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण, ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट संघ सुमारे वर्षभरापूर्वीच्या "वर्ल्ड कप'च्या बिरुदाला जागून खेळला असता आणि विजयश्रीने आपल्यावर वरदहस्त ठेवला असता, तर हॉकीपटूंच्या या देदीप्यमान यशाकडे आपल्या साऱ्यांचे कितपत लक्ष गेले असते, ते सांगता येणे कठीण आहे आणि अवघ्या भारतीय क्रीडाक्षेत्राच्या शोकांतिकेचे इंगितही हेच आहे.
भारतीयांचे क्रिकेटवेड गेल्या काही वर्षांत इतके टोकाला गेले आहे, की त्यापायी हा देश "वन गेम नेशन' आहे की काय, अशी शंका घ्यायला जागा निर्माण व्हावी. हे वेड लक्षात घेऊनच केवळ दोन घटका करमणुकीसाठी "आयपीएल'ची सर्कस उभी करण्यात आली. त्यातून क्रिकेटपटू कोट्यवधीचे धनी होऊ लागले; पण देशाची प्रतिष्ठा पणास लावून भारताला लंडन ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचा मान मिळवून देणाऱ्या खेळाडूंना सरकारने जाहीर केलेली इनामाची रक्कम आहे, मात्र प्रत्येकी अवघी एक लाख! आपला देश कोणत्या खेळाला काय किंमत देतो, तेच यातून स्पष्ट होत असले तरी त्यातून धडा घ्यायला मात्र कोणीच तयार नाही. जगभरातील हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच देश क्रिकेट खेळतात, तरी त्याचे कौतुक मोठे आणि त्याला मिळणारे पुरस्कर्तेही धनदांडगे! त्यामुळेच अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत इतर प्रगतच नव्हे, तर भारताच्या तुलनेत मागास असलेले देशही ऑलिंपिक वा राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांचे शतक ठोकत असताना, आपल्या संघाच्या गळ्यातील पदके मात्र दोन आकडी संख्याही गाठत नसत. त्यातल्या त्यात बरा खेळ भारतीय संघाने दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये केला खरा; पण तेथेही सर्वात मोठा "विक्रम' सुरेश कलमाडी यांच्याच नावावर लागला! -आणि इंडियन हॉकी फेडरेशन आणि हॉकी इंडिया या दोन संघटनांमधील वादापोटी इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने इंडियन हॉकी संघटनेची मान्यताच रद्द केली होती. शिवाय, आपले मानधन वाढवून मिळावे म्हणून हॉकीपटूंना आंदोलन करावे लागल्याची गोष्टही ताजीच आहे. पण, अशी ही सारी अडथळ्यांची शर्यत ओलांडून भारतीय हॉकीपटूंनी मोठ्या दिमाखात लंडनवारीचे तिकीट बुक केले आहे. त्याबद्दल त्यांचे पुनःश्च अभिनंदन आणि लंडनमध्ये आणखी मोठे मानसन्मान मिळावेत, अशा शुभेच्छा!
http://www.esakal.com/esakal/20120228/5450465627713046676.htm