News Update :

क्रिकेटचे गारदी

Sunday, February 26, 2012


क्रिकेटमधील गारदय़ांनी सध्या अचानक उचल खाल्ली आहे. त्यांना ताबडतोब बळी हवा आहे आणि तोही कुण्या सोम्यागोम्याचा नाही तर चक्क किक्रेटचा देव मानल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरचा. सध्या भारतीय क्रिकेट काहिसे झाकोळले आहे. सतत होणारे पराभव, मान्यवर खेळाडुंचे अपयश याची जबाबदारी कर्णधाराचीच असते. त्यामुळे कर्णधार धोणी याला बदलण्याची मागणी सुरू होणे साहजिक आहे. पण तेवढेच नाही, तर फूटवर्कला सोडचिठ्ठी देणार्‍या आणि फिटनेसची पर्वा न करणार्‍या वाढत्या पोटाच्या खेळाडूंना बॅट फिरवणेही अवघड झाल्याने भारतीय क्रिकेट संघ सतत पराभवाच्या छायेत असतो. त्यांच्यामुळे क्रिकेटला असलेले ग्लॅमर संपुष्टात येत आहे. ती संधी साधूनच सहाराने क्रिकेट संघाचा ह्यसहारा काढून घेतला होता. आता तो महत्प्रयासाने पुन्हा मिळविला असला तरी क्रिकेटवरचे सावट संपलेले नाही. सततच्या पराभवामुळे बर्‍याच प्रस्थापित खेळाडूंना वगळण्याची मागणी होत आहे. त्या मागणीचा रोख क्रिकेटचे महर्षी म्हणविणार्‍यांनी सचिनकडे वळवला आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये म्हणे सचिन आता खेळू शकत नाही. त्याचा खेळ धीमा झाला आहे. कसोटीमध्ये शतकांचे शतक पूर्ण करणे त्याला अवघड जात आहे, वगैरे.वगैरे.. ही गोष्ट खरी आहे की, सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सचिन अनुभव व वयानेही ज्येष्ठ आहे. वाढत्या वयाचा परिणाम त्याच्या खेळावर झाला आहे हेही कुणी नाकारत नाही. पण त्याला नवृत्त होण्याचा अनाहूत सल्ला कुणी देण्याची गरज नाही. आपण केव्हा नवृत्त व्हायचे हे त्या खेळाडूलाच ठरवू दिलेले बरे. विशेषत: आजच्या दिखावू क्रिकेटच्या जमान्यात केवळ प्रेक्षकांच्या टाळय़ा, शिट्ट्या मिळवण्यासाठी वेडीवाकडी बॅट फिरवणार्‍या खेळाडुंमध्ये कॉपीबुक पध्दतीने खेळणारे जे थोडे क्रिकेटपटू उरले आहेत त्यामध्ये सचिनचे नाव सर्वात वरचे आहे. केवळ त्याची फलंदाजी पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाणारे आणि टीव्ही ऑन करणारे आजही अनेक क्रिकेटवेडे आहेत. अशा अवस्थेत त्याला सक्तीने रिटायर्ड केले तर क्रिकेटमध्ये पाहण्यासारखे काय उरेल? मध्यंतरी राहुल द्रविडने भारतीय क्रिकेटच्या अवनतीला वैतागून अचानक नवृत्ती जाहीर केली, पण क्रिकेट शौकिनांना ती अजिबात मंजूर नव्हती. शेवटी त्याला ती मागे घ्यावी लागली. सचिनच्या बाबतीतही यापेक्षा वेगळे घडण्याची शक्यता नाही. क्रिकेट शौकिनांच्या सचिनकडून काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण झाल्याशिवाय क्रिकेट रसिक त्याला हा खेळ मग एक दिवसीय असो की कसोटी, सोडू देणार नाहीत. अनेकदा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना विचारण्यात येते की, तुम्ही नवृत्त कधी होणार, तेव्हा त्या म्हणतात की, संगीत हेच माझे जीवन आहे. माझ्याकडे संगीताशिवाय आहेच काय, त्यामुळे मी मरेन तेव्हाच त्यातून नवृत होईन. हेच उत्तर सचिनलाही लागू आहे. अर्थात सचिन तहहयात खेळत राहील असे नाही, पण ह्यटाइम प्लीज कधी करायचा हे त्याला नीट माहित आहे. त्यालाच तो करू देणे योग्य आहे. त्यासाठी गारदय़ांनी उतावीळ व्हायचे कारण नाही आणि कुणी ह्यध चा ह्यमा करायची गरज नाही.
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.