दोन सेनांचे भवितव्य आजच्या मुंबईतील मतदानात ठरविले जाईल. कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपासारखे राष्ट्रीय पक्ष मैदानात असले तरी रणधुमाळी झाली ती शिवसेना विरूद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशीच. दोन्हीपैकी कोणती सेना निवडायची यापेक्षा राज की उद्धव असा हा प्रश्न. अर्थात या दोघांच्यामध्ये खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत आणि अर्थात ते मुलाच्या म्हणजे आपल्या वंशाच्या म्हणजे आपल्या अघोषित घराणेशाहीच्या बाजूने आहेत. राज देखील ठाकरे घराण्याचेच. ठाकरे हाच त्यांचा वंश. पण ते शिवसेनाप्रमुखांचे वारस नव्हेत. शिवसेनाप्रमुखांनी आपला वारस मुलातच शोधला आणि तो मुंबईसह महाराष्ट्रातील शिवसैनिकांवर लादला. याला पुन्हा राजच जबाबदार असल्याचे शिवसेनाप्रमुखांनी याप्रचारात पुन्हा पुन्हा सांगितले. खरे तर हा राज यांचा अपप्रचार ठरावा आणि तो झाला तरी फरक पडत नाही. याचे कारण उद्धव यांच्याबद्दल राज यांची भूमिका कमालीची आणि आधीपासून स्पष्ट आहे. या निवडणुकीच्या प्रचारात ती अधिक आक्रमकपणे पुढे आली. शिवसेनाप्रमुखांसाठी शंभर पाऊले पुढे येण्यास तयार आहे. पण उद्धव आणि त्यांच्या चार नादान टाळक्यांसाठी एक पाऊलही टाकणार नाही, असे राज यांनी ठणकावून सांगितले. याचा अर्थ सामान्य आणि कडवट शिवसैनिकांप्रमाणेच राज यांनाही उद्धव पसंत नाही. सारेच आजही शिवसेनाप्रमुखांचेच नेतृत्व मानतात. शिवसेनेने मुंबईची निवडणुकही खर्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांच्याच नेतृत्वाखाली लढवली. उद्धव यांचे नेतृत्व असेल तर ते होर्डिंग्जपुरते! राज उद्या ज्या काही जागा जिंकतील त्या त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विरोधात जिंकलेल्या असतील. उद्धव यांचे नेतृत्व मुंबईने किती स्वीकारले आणि किती झिडकारले हे शिवसेनेने गमावलेल्या जागांमध्ये दिसेल.
शिवसेनेच्या मराठी मतांमध्ये मनसेने फूट पाडली, या अर्थानेही राज घरभेदी असल्याचा मोठा प्रचार शिवसेनेने सुरुवातीपासून चालविला आहे. या प्रचाराचा आव असा की, शिवसेनाप्रमुख किंवा थेट प्रबोधनकारांनी मुंबईत मराठी मतांचा भलामोठा भूखंडच जणू घेऊन ठेवला आणि त्यात राज यांनी वाटा मागितला! असा कोणताही मराठी भूखंड शिवसेनेच्या नावावर कोणी करून दिलेला नव्हता आणि नाही. मराठी माणूस म्हणजेच शिवसेना हे गारूड जरूर आहे. परंतु मुंबईच्या सत्तेसाठी झुंजणारे सारेच पक्ष तर मराठी आहेत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजपा हे पक्षदेखील सर्वाधिक उमेदवार मराठीच उभे करतात. मुंबई उत्तर भारतीयांच्या हवाली करायची काय? हा मातोश्रीचा परवलीचा सवाल आहे. या निवडणुकीत असे किती उत्तर भारतीय उमेदवार उभे आहेत? त्यांची एकूण संख्या पाच-पंचवीसच्या पलीकडे जात नाही. मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचाच झेंडा फडकला. मराठी मतांशिवाय तो फडकला काय?
शिवसेनेची मुंबईतील सत्ता संपली की शिवसेना संपते हे साधे समीकरण कॉँग्रेस-राष्ट्रवादीने या वेळी गांभीर्याने घेतलेले दिसते. गुरु-कृपा झाली तरच अर्थात सेनेची सद्दी संपेल आणि दोन्ही कॉँग्रेसचे राज्य मंत्रालयाप्रमाणे मुंबई पालिकेतही येईल. शेवटी आकड्यांचा खेळ आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून सेना निवडून आली तरी पालिका त्रिशंकू असेल. अशा परिस्थितीत सेना-भाजपाला सत्तेसाठी कुणाचा पाठींबा मिळू शकतो? या प्रश्नावर राज ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहील. कल्याण-डोंबिवलीत सेनेचा भगवा फडकला तो मनसेच्या दांड्यावर. मुंबई पालिकेतही राज यांनी सेनेचे असेच कल्याण करायचे ठरविले तर लोकांचा विश्वास उडेल. राज ठाकरे तटस्थ राहिले आणि कडवट विरोधी पक्ष म्हणून पुढे आले तर मुंबईतील सत्तांतर अटळ दिसते.
टोच्या
राज यांचा पक्ष नवा. त्यांची फळी अजून निर्माण व्हायची आहे. शिवसेनेत सेनाप्रमुखांची मजबूत फळी होती. ती तशी राहिली नाही. उद्धव यांची फळी शोधावी लागेल. जो सोडतो त्याची किंमत चाराणे असते. खासदार आनंद परांजपे यांचीही किंमत चाराणेच असल्याचे सांगितले गेले. म्हणजे शिवसेनेत सारेच चाराणे-आठाणे उरले आहेत. आहे तो एकच बंदा रुपया तो म्हणजे शिवसेनाप्रमुख. सारी मदार आजही या बंदा रुपयावरच आहे.
- विवेक गिरधारी