News Update :

डिकन्स, आजही..

Saturday, February 11, 2012



सॅम्युअल पिकवीक रेखाटताना आपण एक अमर व्यक्तिरेखा जन्माला घालीत आहोत याची कल्पना चार्ल्स डिकन्स याला नसेल. पण नियतीची तशी इच्छा होती. पिकवीकच नव्हे तर आणखी अशाच असंख्य व्यक्तिरेखा डिकन्सच्या लेखणीतून उतरणार होत्या आणि अभिजात वाङ्मयात आपले स्थान ठळकपणे जपणार होत्या. याच आठवडय़ात डिकन्सची २००वी जन्मतिथी जगात सर्वत्र साजरी झाली, तेव्हा त्याच्या लहानमोठय़ा असंख्य व्यक्तिरेखांना उजाळा द्यावा लागला नाही. उलट दोन शतके उलटल्यानंतर आजही त्या तितक्याच रसरशीतपणे आपल्या आजूबाजूला वावरत आहेत, असे वाचकांना वाटत होते. अभिजात कलाकृतीची ही खूण आहे. पिकवीक पेपर्स लिहिताना डिकन्स पत्रकाराची नोकरी करीत होता. हा पेशा त्याने 
जन्मभर सांभाळला. एकीकडे उत्तमोत्तम साहित्यकृती निर्माण करीत असताना संपादक म्हणूनही त्याने उत्तम काम केले. पत्रकाराच्या नजरेतून त्याने जग पाहिले आणि साहित्यिकाच्या नजरेतून कागदावर उतरविले. जग जसे आहे तसे, त्याच्या चांगल्या-वाईट रंगासह रंगविण्यात डिकन्सचा हात धरणारा त्या काळात कोणी नव्हता. आजही अशी किमया साधणारे जगात फार थोडे आहेत.
डिकन्सचे बालपण कष्टात गेले. गरिबीचे चटके त्याने सोसले. त्याच्या काळातील लंडन हे बकाल होते. गरीब-श्रीमंतांमधील दरी खूप मोठी होती. मध्यमवर्ग नुकताच उदयाला येत होता. उमरावांची चैन असली तरी बहुसंख्य जनता गांजलेली होती. भ्रष्टाचाराचा बुजबुजाट होता. औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली असली तरी क्रांतीचे वैभव सर्व थरांवर पोहोचले नव्हते. या लंडनमधील उमरावांच्या महालांपासून गरिबांच्या झोपडीपर्यंत, समाजाचे विविध थर डिकन्सने आपल्या लेखणीत पेलले. दारिद्रय़ामुळे त्याच्यात कडवटपणा आला नाही. गरिबीच्या चटक्याने त्याचे हास्य मिटविले नाही. उलट पिकवीक पेपर्ससारखी हास्यरसाने भरलेली गोष्ट अद्याप लिहिली गेली नाही, असे अनेकजण सांगतात. हास्याचा हा सूर पुढील कादंबऱ्यांतही कायम राहिला. त्यामध्ये उपहास डोकावला नाही. लबाड, इरसाल व्यक्तिरेखा रेखाटतानाही जगाकडे कुतुहलाने, आत्मीयतेने पाहण्याची वृत्ती डिकन्सने घालविली नाही. मध्यम वयात ‘टेल ऑफ टू सिटीज्’ लिहिताना तो गंभीर झाला. पण वाचकांना ते पसंत पडले नाही आणि वाचकांच्या इच्छेला मान देणाऱ्या डिकन्सने ‘ग्रेट एक्स्पेक्टेशन’ या पुढील कादंबरीत पुन्हा हास्यरस आणला. हे करण्यासाठी त्याला आपल्याच साहित्यकृतीचा आसरा घ्यावा लागला हे विशेष. ‘डेव्हिड कॉपरफिल्ड पुन्हा वाचली आणि मला सूर सापडला’, असे त्याने मित्राला लिहिले होते. 
कथानकाची उत्तम बांधणी हे डिकन्सच्या कादंबऱ्यांचे वैशिष्टय़ असले तरी अजोड व्यक्तिरेखा ही त्याची खासियत होती. डिकन्स लक्षात राहतो तो त्याच्या व्यक्तिरेखांमुळेच. रशियन कादंबरीकारांच्या तुलनेत डिकन्सला गौण मानणारे अनेक ढुढ्ढाचार्य आहेत. परंतु, डिकन्सच्या व्यक्तिरेखांवर डोस्टोव्हस्की व टॉलस्टॉय यांच्यासारखे प्रतिभावान फिदा होते. आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला डिकन्सने चितारलेल्या व्यक्तिरेखेशी ताडून पाहण्याचा छंद मला लागला होता, असे टॉलस्टॉय म्हणत असे. शेक्सपीअरनंतर इतके प्रभावी व्यक्तीरेखाटन कुणी केले नाही असे अनेक समीक्षक म्हणतात. १४ कादंबऱ्यांतून डिकन्सने एकूण ९८९ व्यक्ती उभ्या केल्या. हे प्रत्येक पात्र अतिशय रेखीव व बांधेसूद आहे. त्या प्रत्येकाचे वेगळे वैशिष्टय़ आपल्या मनावर ठसते. डिकन्सची निरीक्षणशक्ती विलक्षण होती. लहानपणापासून त्याला भटकण्याचा नाद होता. लंडनच्या रस्त्यातून रात्रीबेरात्री तो मनमुराद भटकत असे. ‘भटकंतीतील आनंद और आहे. आजूबाजूच्या जगात डोकाविण्याची संधी आपल्याला मिळते’ असे त्याने मित्राला लिहिले आहे. भटकंतीतून त्याला पात्रे मिळत. कथानक आकार घेई. शारीरिक शक्ती व मानसिक ऊर्जा हे दोन्ही त्याच्याकडे भरपूर होते. या दोन्ही ऊर्जा कसाला लावून तो आपली सृष्टी उभी करी. पण ते केवळ वर्णन नसे, तर मानवी भावभावनांचा कल्लोळ असे. डिकन्स स्वत तीव्र भावनाशील होता. परंतु त्यावर नियंत्रण ठेवून त्या लेखणीतून कागदावर उतरविण्याचे कौशल्यही त्याच्याकडे होते. ‘व्यक्तिरेखांची माझ्या मनात झुंबड उडते आणि मी लेखणी उचलली की कागदावर उतरण्यासाठी त्या आतुर होतात’, असे त्याने म्हटले आहे. पिकवीक, डेव्हिड कॉपरफिल्ड, नेल ट्रेन्ट अशा अनेक व्यक्तिरेखांनी वाचकांच्या मनात  घर केले. ही पात्रे रेखाटताना डिकन्स जणू परकायाप्रवेश करी. आरशासमोर उभा राहून त्या पात्रासारखे हावभाव करी. त्यांच्या आवाजात बोले आणि नंतर पुन्हा लेखन सुरू करी. नेलचा शेवटचा काळ लिहिताना त्याला अश्रू आवरत नव्हते. भावनांवर भर असल्यामुळे डिकन्सचे साहित्य मेलोड्रॅमॅटिक वाटत असले तरी या त्याच्या साहित्यकृतींची खोली विलक्षण आहे. वास्तववादी लिखाण करणाऱ्या जॉर्ज ऑर्वेललाही डिकन्स आपला माणूस वाटला यात सर्व आले.
या आपलेपणामुळे डिकन्स आजही अनेकांना आकर्षित करतो. जगाचे एकरंगी दर्शन तो घडवीत नाही. सुंदरता दाखविताना कुरुपतेला नाकारीत नाही. मात्र ते करताना वाचकांची करुणा जागृत करतो. लबाडीबरोबरच छोटय़ा माणसांच्या विशाल मनाचे दर्शन त्यातून होते. गरीब असणे म्हणजे काय, नाकारले जाणे म्हणजे काय, भणंग जगणे म्हणजे काय, विफल होणे म्हणजे काय हे त्याच्या व्यक्तिरेखांतून वाचकांच्या हृदयाला भिडत होते. जगातील अन्याय, अनैतिकता, लालसा, गरिबांची होणारी पिळवणूक ही ठसठशीतपणे जाणवली तरी डिकन्सची कादंबरी संपविल्यानंतर आपल्या मनाला कडवटपणा शिवत नाही. उलट जगाकडे आपण अधिक सहानुभूतीने पाहू शकतो. मानवी मनात डोस्टोव्हस्की जितका आरपार घुसतो तशी प्रतिभा डिकन्सला लाभली नव्हती हे खरे. म्हणून नवसाक्षरांसाठी डिकन्स योग्य आहे, अशी शेरेबाजी त्याकाळी व आताही काही समीक्षक करतात. परंतु, ज्या प्रतिभावंतांना पुढे करून ही मल्लीनाथी केली जाते ते प्रतिभावंत डिकन्सकडे आदराने पाहात होते. सैबेरियातील सक्तीच्या एकांतवासात सोबत म्हणून डोस्टोव्हस्कीने ‘पिकविक पेपर्स’ नेले होते. त्याच्या ‘द इन्सल्टेड अ‍ॅन्ड इन्जुअर्ड’मधील नेलीच्या मृत्यू वर्णनावर डिकन्सच्या ‘ओल्ड क्युरिऑसिटी शॉप’मधील नेलच्या मृत्यूची दाट छाया आहे. सामान्य वाचकांप्रमाणेच प्रतिभावंतानाही आल्हाद देण्याची ताकद डिकन्सच्या लेखणीत होती.  
डिकन्सच्या कादंबऱ्या आटोपशीर आकारात उपलब्ध असल्या तरी पण मूळ कादंबऱ्यातील मौज त्यामध्ये नाही. डिकन्सच्या कादंबऱ्यात कथानकाचा हमरस्ता असला तरी बराच वेळ आजूबाजूच्या गल्ल्याबोळातून भटकण्यात जातो. मात्र याच गल्लीबोळात आपल्याला अफलातून पात्रे भेटतात आणि जीवनाबद्दलची आपली समज वाढवितात. शेक्सपिअरची अनेक दुय्यम पात्रे जीवनाचे अद्भुत दर्शन घडवितात तसेच येथे होते. व्हिक्टोरिया राणीच्या काळातील जग डिकन्सने रंगविले. नंतरच्या दोनशे वर्षांत तंत्रज्ञानामुळे जगात बदल झाले असले तरी माणूस तोच राहिला आहे. मानवी भावभावनांचा कल्लोळ तसाच आहे. आज पैसा, करिअर यासाठी आटापिटा सुरू असला तरी माणसाला खरा रस दुसऱ्या माणसातच आहे, मग तो सामान्य असो वा असामान्य. डिकन्स आयुष्यभर अशा माणसांना रंगरूप देत होता. म्हणून तो आजही आपला वाटतो
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.