राज्यात एकमेकांची उणीदुणी काढण्याचे जोरदार पीक आलेले असताना कुणा संत व्हॅलेंटाइनची स्मृती म्हणून प्रेमाचा दिवसही याच धामधुमीत यावा, हा सध्याच्या सुखद थंडीतला गुलाबी योगायोगच होय. येत्या १७ तारखेला कोण क्षुल्लक ठरेल आणि कोण किंगमेकर ठरेल याचे आडाखे आणि अंदाज प्रत्येकजण आपापल्या सोयीने बांधत असतानाच प्रेमाच्या युतीचे दर्शन घडविण्याचा हा दिवस आला आहे. व्हॅलेंटाईनच्या विरोधात शस्त्रे उपसणाऱ्यांची पुढली पिढी आता आपापल्या पित्यांच्या छत्राखाली राजकीय धडे घेत असल्याने आणि या पिढीच्या मित्रमंडळींत 'व्हॅलेंटाईन डे' हाच वर्षातला सर्वात मोठा सण असल्याने सगळेच 'बाबा' आता प्रेमाची भाषा बोलू लागले आहेत. वयाची सत्तरी ओलांडलेल्या एकाकी वद्धत्वालाही 'लिव्ह इन रिलेशनशिप'चे महत्त्व आणि गरज लक्षात येत असतानाच्या या काळात प्रेमाच्या प्रकटीकरणाच्या या दिवसाला केवळ तरुणांसाठीचा तरी का म्हणावे? गरज आणि स्वरूप बदलत असले, प्रकटीकरणाच्या त-हा बदलत असल्या, तरी कोणत्याही काळात रक्ताचा रंग जसा लालच असतो, तसा प्रेमाचा रंगही गुलाबीच असतो. व्हॅलेंटाईनने जरी निमित्त पुरवले असले आणि 'या हृदयीचे त्या हृदयी' पोचवण्यासाठी आजचा दिवस मुक्रर केला असला, तरी प्रेमाला मुहूर्त लागत नाही. बालपण संपून तारुण्याची चाहूल लागते, तेव्हा हा गुलाबी रंग मनाच्या क्षितिजावर पसरू लागतो आणि सांजवेळ येऊन सावल्या लांबू लागल्या, तरी त्याची लाली कायम राहते.
भेट, नजरानजर, होकार, नकार, वेदना, विरह, त्याग, राग, लोभ, मत्सर या सर्व भावनांचा एकत्रित आविष्कार म्हणजे प्रेम. त्यातही विरह म्हणजे तर प्रेमभावनेचा कळसच. आपल्या प्रियकराची वाट पाहात वाटेवरच कुठेतरी पडून असलेली एक प्रेयसी. तिने बहुधा प्राण सोडले असावेत असे समजून एक कावळा तिच्या अंगावर झेपावतो, तेव्हा ती त्याला म्हणते, 'कागा सब तन खाईयो, मोरा चुन चुन खाईयो मांसरे, दो नैना मत खईयो, उन्हे पिया मिलन की आस रे..' म्हणजे माझ्या शरीराचे वाट्टेल तेवढे लचके तोड; मात्र डोळ्यांवर चोच नको मारूस; कारण त्यांना प्रतिक्षा आहे प्रियकराची. असा ग्रेट विरह. तर दुसऱ्या बाजूला निराशाही तेवढीच सकस. प्रेयसीचे आणखी कुणाशी तरी लग्न झाल्यावर, तो काय म्हणतो? 'दारावरून माझ्या तिची वरात गेली, मेंदीत रंगलेली बर्ची उरात गेली, आता कशास तिची पारायणे करू मी, माझीच भाग्यरेषा परक्या घरात गेली.' आजच्या दिवशी कॉलेजा-कॉलेजात गुलाब फुलांच्या देवाण-घेवाणीचे उत्सव असतात. कोण कुणाला फूल देतो, कोण कुणाचे फूल स्वीकारतो, यावर पैजा लागतात. परंतु फूल स्वीकारले म्हणजे आयुष्यभराची कमिटमेंट केली असे नव्हे. एकमेकांना पारखून, एकमेकांना ओळखून मगच फायनल निर्णय घेण्याएवढी ही पिढी शहाणी आणि व्यवहारी झाली आहे. कोवळ्या वयात झालेला प्रेमाचा साक्षात्कार हा नजरेचा धोकाही असू शकतो ना? भाऊसाहेब पाटणकर म्हणतात, 'तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी, नंतर मजला कळले, ती तशीच पाहते नेहमी.' तर अशी फसगत झाली, तर करेक्शनला वाव असावा इतपत ही पिढी प्रॅक्टिकल विचार करू लागली आहे. अर्थात तरीही आवश्यक तिथे हळवेपणा येतोच आणि तो आलाच पाहिजे; कारण 'तुम जो आये जिंदगीमें बात बन गयी' असं मुलायम आवाजात सांगावेसे वाटते, हीच तर या गुलाबी हृदयरोगाची खासीयत आहे. 'दिले नादाँ तुझे हुवा क्या है, आखीर इस दर्दकी दवा क्या है' असं उगाचच आडूनआडून विचारण्याऐवजी थेट 'तुम्हीने दर्द दिया है तुम्ही दवा देना', असं सांगण्याचे हे दिवस आहेत. व्हॅलेंटाईनचा दिवस असो अथवा नसो; समुद्राच्या साक्षीनं, झाडांच्या आडोशानं रंगीबेरंगी थवेच्या थवे प्रेमकुजन करीत असतात. कटाक्ष, इशारे, सांकेतिक भाषेतील निरोप हे तर सगळीकडेच सुरू असतात. 'जरासी आहट होती है तो दिल सोचता है, कही ये वो तो नही'चा लाजराबुजरा प्रणयही टिकून आहे आणि 'तुला चार कॉल मारले मी, एकालाही उत्तर नाही, गेलास उडत' असा 'स्व'चे भान आलेला नवा प्रणयही आहे. सगळे बदलत असते, तरी काहीही बदलत नसते. राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. आणाभाका, शपथा आणि वायदे सुरू आहेत. प्रेमाचा उत्सव साजरा करताना प्रियकराने प्रेयसीला जे म्हटले तेच आपण दारी आलेल्या उमेदवारालाही म्हणायला हरकत नाही- 'उद्या उद्याचा नको वायदा, हिशेब आपुला चोख हवा, प्रीतीचा व्यवहार साजणी नको उधारी रोख हवा.' या गुलाबी दिवसाचा हाच संदेश आहे. |