News Update :

ममताबाई, काय हे..

Wednesday, February 22, 2012


सत्ता ही फार लवकर आणि नको तशी डोक्यात चढणारी बाब आहे आणि ममता बॅनर्जी या केंद्रात व राज्यात सत्तेवर राहिल्याला बराच काळ लोटला आहे. कोलकात्यात एका ३७ वर्षांच्या महिलेवर काही बदमाशांनी केलेल्या सामूहिक बलात्काराची निंदा करून त्यातील गुन्हेगारांना न्यायासनासमोर आणण्याची कठोर भाषा बोलण्याऐवजी ममताबाईंनी ‘ती बाईच चारित्र्यहीन आहे’ असे म्हटले. वर ‘ती घटना आपल्याला बदनाम करण्यासाठी वापरली जात असल्याचे’ सांगायला सुरुवात केली. आपल्यावर झालेल्या बलात्काराची पुरावाशुद्ध माहिती ती महिला देत असताना व पोलिसांनी त्या पुराव्याची वैद्यकीय तपासणीसह खात्री केली असताना मुख्यमंत्रिपदावर असलेली महिलाच त्या पीडित स्त्रीला खोटे ठरवीत असेल तर स्त्रीच स्त्रीची खरी शत्रू असे काहीजण म्हणतात ते खरेच म्हणावे लागेल. एखादी स्त्री चारित्र्यहीन आहे असे म्हटल्याने तिच्यावरचा बलात्कार सर्मथनीय वा क्षम्य ठरत नाही हे येथे लक्षात घ्यायचे. दुर्दैवाने सत्ताधार्‍यांनी सार्‍या शहाणपणावरच नव्हे तर नीतीविचारांवरही आपला हक्क सांगणे व आपण म्हणू तेच मूल्य असा बकवा सुरू करणे हाच आपल्या लोकशाहीतला दोष आहे. त्या महिलेच्या पाठीशी उभे राहून व बलात्कार्‍यांना अद्दल घडवून आपली प्रतिमा आणखी उजळ करून घेणे ममता बॅनर्जींना या प्रकरणात शक्य होते. पण आपण पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत आणि अर्थमंत्र्यांपासून निवडणूक आयोगापर्यंत कोणाचाही पाणउतारा करू शकतो असा समज करून घेतलेल्या ममताबाईंनी तसे न करता हा बलात्कार आपल्या सरकारला बदनाम करण्याच्या षड्यंत्राचा भाग ठरविण्याचे बालिश राजकारण चालविले आहे. आपल्या राजकारणात सर्वाधिक हिंसा घडविणारे पुढारी उपोषणाची आणि मूल्यपूजेची नाटके करतात. इतरांच्या पूजास्थानांची जाळपोळ करणारे धर्माची भाषा वापरतात आणि सर्वाधिक भ्रष्ट असलेली माणसे नीतिशुद्धतेवर व्याख्याने देतात. जनतेला हे कळते पण तिचा धाक नसलेल्या पुढार्‍यांना पाच वर्षे तरी त्या धाकाची पर्वा करण्याचे कारण नसते. त्यातून ममता बॅनर्जी यांनी रालोआ सरकारात असताना तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी यांना धमक्या दिल्या आणि बहुमत सांभाळायला त्यांना त्या ऐकायला लावल्या. आताच्या सरकारात त्यांचा पक्ष सहभागी असतानाही पंतप्रधानांसोबत बांगला देशच्या दौर्‍यावर जायला नकार देऊन त्यांनी त्यांचाही अपमान केला. केंद्राचे निर्देश जुमानायचे नाहीत, राष्ट्रीय धोरण धाब्यावर बसवून आपली लहर पुढे दामटायची आणि त्या उद्दामपणाला पराक्रम समजायचे हा त्यांचा खेळ आता जुना झाला आहे. दुर्दैवाने कोणत्याही एका पक्षाच्या पाठीशी बहुमत नसल्याच्या व आघाडीचा धर्म सांभाळावे लागण्याच्या गरजेपायी हा उद्दामपणा केंद्राला पचवावाही लागतो. मात्र राजकीय उद्दामपण आणि बलात्काराचे सर्मथन या दोन वेगळ गोष्टी आहेत. बंगालमध्ये लहान मुले सुरक्षित नाहीत हे त्या राज्यात अलीकडे झालेल्या बालमृत्यूच्या घटनांनी सिद्ध केले आहे. ममताबाईंचे आताचे वर्तन त्या राज्यात महिलांची अब्रूही सुरक्षित राहिली नाही हे सांगणारे आहे. केंद्र सरकार अडचणीत येत असेल तर कशालाही साथ देण्याचे राजकारण करणारे विरोधी पक्ष याविषयी काही बोलत नसतील तर ते समजण्याजोगे आहे. देशातील महिलांच्या व अन्य सामाजिक संघटनांचे याविषयीचे मौन मात्र जास्तीचे चिंताजनक आहे. 
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=EditorialEdition-16-1-23-02-2012-04bea&ndate=2012-02-23&editionname=editorial
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.