News Update :

तुझी दुरता त्याहुनी साहवे!

Sunday, February 26, 2012


सात्त्विक, चिंतनशील क्रियावंतांचा अलिप्तपणा राजस असतो. कुसुमाग्रजांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाला असा राजस आणि लोभस अलिप्तपणा लाभला होता आणि आयुष्यभर त्यांनी तो प्राणपणाने जोपासलादेखील. त्यामुळे फार कमी कलावंतांच्या भाग्यात असते ते चाहत्यांचे, अभ्यासकांचे आणि सामान्य माणसाचे कुतूहल कुसुमाग्रजांभोवती नेहमी दाटलेले असायचे. हल्ली बरेच कवी आपले कवीपण आणि कविता चुरमुरेवाल्यासारख्या अंगावर घेऊनच मिरवीत असतात आणि कोणी भेटल्यावर चुरमुरेवाल्याप्रमाणे त्यातल्या दोन पाच काढून समोरच्याच्या हातावर ठेवतातही. कुसुमाग्रजांचे कवीपण असे कधीही समोर आले नाही. हेच कारण असावे त्यांची कविताही मार्दव घराणेदार होती. आपल्या कर्त्यांचा राजस अलिप्तपणा तिच्यातही उतरला होता आणि त्यामुळेच ती सहज सांगून जायची.
आणि लक्षात ठेव
हा खेळ आहे,
खेळाच्याच नियमांनी बांधलेला
निर्मळ बिलोरी आनंदात सांधलेला.
आघात करायचा, पण
रक्त काढायचं नाही
जीव ओतायचा
पण जीवन हरपायचं नाही..
आणि आपल्या अंतरंगातील पंच,
तटस्थ समयसुज्ञ साक्षी
थांबा म्हणतील त्या क्षणी थांबायचं
आणि जवळ जमलेले
चंद्राचे तुकडे घेऊन
आपापल्या अंधारात विलीन व्हायचं.
मराठी सारस्वतांच्या अंगणात जेव्हा एकूणच मंचीय कवितांनी उच्छाद मांडला होता, त्या काळात कुसुमाग्रजांच्या ‘काढ सखे गळय़ातील तुझे चांदण्याचे हात.’सारख्या ओळींनी आणि पृथ्वीच्या प्रेमगीतांनी एका पिढीला वेड वगैरे लावले होते. त्या कविता आहेतही उत्कट. पण कुसुमाग्रजांची उदात्त विरक्ती त्या नंतरच्या कवितांत ठसठशीतपणे समोर येते. त्या उदात्त विरक्तीने कुसुमाग्रज यांना आणि त्यांच्या कवितेला अधिक उंचीवर नेले. क्रियावंतांसाठी समर्थ रामदासांनी थोडासा लोकांत आणि थोडासा एकांत सुचविलेला आहे. तो कुसुमाग्रजांच्या कवितेत आणि त्यांच्यातही पुरेपूर दिसतो. उगाच सभासंमेलने गाजवीत, टाळय़ांच्या आनंदयात्रेत त्यांची कविता भटकताना दिसली नाही. सामाजिक जाणिवांचा कर्कश आक्रोश त्यांच्या कवितेने आणि त्यांनीही कधीही केला नाही. पण त्यांची कविता 
आदिवासी महिलेच्या एका थानाच्या गाठोळीवरून लोंबत होतं आपलं पार्लमेंट 
आणि दुसऱ्या गाठोळीवरून लोंबत होतं आमचं साहित्यसंमेलन.
असं सहज लिहून जाते आणि तरीही त्यात कोणताही अभिनिवेश नसतो. कुसुमाग्रजांचे हे समाजभान विलक्षण आहे.
लढाईच्या अंतिम क्षणी
संसाराचा कोष तोडून
सामान्यच असामान्य होतात.
लढाई जिंकतात,
आणि पुन्हा कोषात जाऊन
सामान्य होतात.
विजयाची मिरवणूक 
ते परस्थपणाने 
आपल्या घराच्या
खिडक्यांतूनच पाहतात.
अशा ओळी ते लिहितात तेव्हा नकळतपणे दर्शन होते ते त्यांच्यातील मार्क्‍स आणि ‘दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो’ असे लिहिणाऱ्या रामदास यांचे. जागरूक कलावंताचे समाजभान त्यांच्या कलाकृतींतून सहजपणे दिसते. त्यासाठी कोणता       एखादा झेंडा घेऊन मैदानातच उतरावे लागते असे नाही. 
माणसाच्या माथ्यावर दारिद्रय़ासारखा
शाप नाही,
पृथ्वीच्या पाठीवर इतके अमंगल,
इतके दु:खदायक, इतके भेसूर
दुसरे पाप नाही.
यासारख्या ओळी त्यांचे हे समाजभानच दर्शवितात. कुसुमाग्रजांचे मोठेपण हे की त्यांचे हे समाजभान आतून आलेले आणि प्रामाणिक होते. एरवी कलावंतांच्या कलाकृतीतील जीवनमूल्ये आणि त्या कलावंताचे प्रत्यक्ष जीवन यात मोठी तफावत आपल्याला आढळते. कुसुमाग्रजांच्या बाबतीत तसे झाले नाही. जी मते, भूमिका त्यांनी आपल्या कलाकृतींतून मांडली त्याचाच आविष्कार त्यांच्या जगण्यात झाला. त्याचमुळे यशवंतराव चव्हाणांसारखा अत्यंत उच्चपदस्थ नेता ‘सकाळच्या विमानाने बरोबरच जाऊ दिल्लीला’ असे म्हणाला, तेव्हा ‘तुम्ही पुढे व्हा, मी लवकर उठत नाही’, असे ते सांगू शकले. तेही सहजपणे. अन्यथा स्वत:च्याच कथित बाणेदारपणाच्या चौकटी वर्तमानपत्रांत छापून आणणारे कलावंत आपल्या समाजात काही कमी नाहीत. परंतु हे असले उद्योग कुसुमाग्रजांच्या मनाला कधी शिवलेही नाहीत. ते आपल्या नाशकातील मठीत मस्त असायचे. पुलंच्या तुझे आहे तुजपाशीमधील काकाजी म्हणतो, ताजमहाल पाहायचा तर आग्य््रााला जावे लागते. तुमच्या दारासमोर नाचत येतात ते मुहर्रमचे ताबूत. कुसुमाग्रज हे त्या अर्थाने ताजमहालाच्या व्रतस्थ शांतपणाने राहिले. बऱ्याचदा तुटलेपणास अलिप्तता म्हटले जाते. कुसुमाग्रजांची अलिप्तता तुटलेली नव्हती. 
चिंब चिंब भिजतो आहे
भिजता भिजता मातीमध्ये
पुन्हा एकदा रुजतो आहे
अशी मातीशी नाळ राखून असलेली जिवंत, कृतार्थ अलिप्तता त्यांनी अनुभवली. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे
उषा सुंदर होतीच
पण अधिक सुंदर आहे
ही संध्या. 
मावळतीवर उतरलेला हा सूर्य,
दिवसभराच्या प्रकाशदानाने कृतार्थ झालेला
अधिक प्रकाशमय अधिक स्नेहशीलही.
अशा अधिक स्नेहशीलपणाने कुसुमाग्रज जगत गेले.
मराठी संस्कृतीस कृतघ्नपणाचा शाप आहे. त्यामुळे बघता बघता आपल्या संस्कृतीत आचार्य अत्रे यांच्यासारखा उत्तुंग कडा विस्मृतीत विरघळून गेला. त्याआधीचे टिळक, आगरकर, राजवाडे, राम गणेश गडकरी, शि. म. परांजपे, o्री. म. माटे, जोतिबा फुले, आंबेडकर वगैरेंचे तेज:पुंज लिखाण आता वस्तुसंग्रहालयातच उरेल अशी चिन्हे आहेत. गेलाबाजार पुलं अजूनही आठवतात ते त्यांच्या अन्य कोणत्या गोष्टींपेक्षा गमतीसाठी. इंदिरा संत, मर्ढेकर, अनिल, आरती प्रभू, बी असे कित्येक कवी आता उरलेत ते कवितेच्या तासांपुरते वा प्राध्यापकी चर्चासत्रांपुरते. एक विचित्र अशा त्रिशंकूंची पैदास महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर होताना दिसते. पोटापाण्याच्या हेतूने हा समाज इंग्रजीकडे पाहात असतो. तितकाच मर्यादित त्याचा हेतू असल्याने त्या भाषेतील सौंदर्यही त्यास दिसत नाही. चारचौघात आणि मुलाखतीत बोलण्याइतपतच इंग्रजी त्यास येते. आणि त्या इंग्रजीकडे आशाळभूतपणे पाहताना मराठीकडेही दुर्लक्ष झालेले असते आणि त्यामुळे तीही मागे पडलेली असते. अशा वेळी एक सांस्कृतिक शुष्कता घेऊन वाढणारी एक पिढीच्या पिढी आपल्या डोळय़ासमोर घडताना पाहणे हे दुर्दैवी म्हणायला हवे. हे दुर्दैवी प्राक्तन मराठीच्याच नशिबी का, याचा विचार धुरिणांनी करायला हवा. बंगाली तरुणांना आजही रोबिंद्रसंगीत प्रेमात पडायच्या वयातही आठवत असते आणि मराठी तरुण मात्र भुसभुशीत भाषा घेऊन जगत असतो. अशा सत्त्वहीन समाजाला स्वभाषेची जाणीव करून देण्यासाठीदेखील एखादे प्रयोजन तयार करावे लागते. सरकारनेच ती सोय करून दिली आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे निमित्त साधत भाषादिन साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन. तो मराठी भाषादिन म्हणून गेली काही वर्षे साजरा केला जातो. यंदा तो अधिक जोमाने साजरा होत आहे याचे कारण कुसुमाग्रजांच्या जन्मास १०० वर्षे होत आहेत. या निमित्ताने त्यांच्याच स्वातंत्र्यदेवीची विनवणी कवितेचे सरकारी पारायण होईल, मराठीची अवस्था किती वाईट झाली आहे वगैरे आठवणी काढल्या जातील. हे तसे नेहमीचेच.
आकाशतळी फुललेली
मातीतील एक कहाणी
क्षण मावळतीचा येता    
डोळय़ांत कशाला पाणी?
असा प्रश्न कुसुमाग्रजांनीच विचारून ठेवला आहे. तो त्यांना शोभून दिसतो. परंतु या त्रिशंकू समाजाकडे पाहिल्यावर कोणाही विचारी माणसाच्या डोळय़ाच्या कडा काळजीने ओलावल्याशिवाय राहणार नाहीत. 
एका अर्थाने आजच्या या अशा समाजात कुसुमाग्रज नाहीत, तेच चांगले आहे. दुर्बळ क्षुद्रांचा शृंगार पाहण्यापेक्षा तुझी दुरता त्याहुनी साहवे, असे त्यांनीच म्हणून ठेवले आहे, ते योग्यच म्हणायचे. कर्णकटू गदारोळास नाद समजला जातो तेव्हा मौन पाळायचे असते. तेव्हा कुसुमाग्रजांना आजच्या दिनी आदरांजली त्यांच्याच शब्दातील त्या मौनाने वाहायला हवी.
शब्द. जीवनाची अपत्ये
मृत्युपर्यंत पोहोचत नाहीत
म्हणून तुझ्या समाधीवर
मी वाहात आहे
माझे मौन.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=212978:2012-02-26-15-43-59&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.