मंगळवारी नवी दिल्लीत इस्रायली दूतावासाच्या मोटारीवर झालेल्या बॉम्बहल्ल्याचा अर्थ पश्चिम आशियातील संघर्ष आता भारतापर्यंत पोहचला आहे, असाच घ्यावा लागेल. इस्रायल व इराण ही दोन्ही परस्परांशी शत्रुत्व असलेली राष्ट्रे भारताची मात्र मित्र राष्ट्रे आहेत. अरब-इस्रायल वादात एकेकाळी अरबांची बाजू घेताना भारताने इस्रायलशी कोणत्याही प्रकरचे संबंध ठेवले नव्हते. पण काळ बदलला तसे इस्रायलशी संबंध प्रस्थापित झाले आणि आता ते इतके घनिष्ठ झाले आहेत की दोन्ही देशांत सुरक्षाविषयक सहकार्य चालू असते. इराणशी भारताचे प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत. त्या देशाबरोबरच्या संबंधात चढउतार होत असले तरी दोन्ही देशांत चांगले आर्थिक व व्यापारी संबंध राहिले आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाला भारताचा विरोध असला तरी त्या देशावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादणे भारतास मान्य नाही. याचे कारण भारत हा इराणी पेट्रोलियम पदार्थांचा मोठा ग्राहक आहे. तसेच इराणही भारताकडून मोठय़ा प्रमाणात तांदूळ व गहू खरेदी करीत असतो. त्यामुळे इस्रायल व इराण या दोन्ही राष्ट्रांनी आपले शत्रुत्व भारताच्या भूमीपर्यंत आणावे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अलीकडेच इस्रायली गुप्तहेरांनी इराणच्या अणुशास्त्रज्ञाची त्याच्या कारमध्ये बॉम्ब ठेवून तेहरानमध्ये हत्या घडवून आणली. त्यानंतर इराणने त्याचा बदला घेण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेची अमलबजावणी मंगळवारी नवी दिल्लीत आणि जॉर्जियाची राजधानी तिब्लिसी येथे झालेली दिसते. भारतात चुंबकाने चिटकवला जाणारा बॉम्ब प्रथमच वापरण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेमागे परदेशी दहशतवादी असावेत असे दिसते. शिवाय हे दहशतवादी प्रशिक्षित असावेत असे अनुमान पोलिसांनी काढले आहे. पुरेशी टेहळणी करून आणि दिल्लीतील रस्त्यांची पूर्ण माहिती घेऊन हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेत इराणच्या गुप्तचर संस्थेचा किवा तेथील एखादय़ा दहशतवादी संघटनेचा हात असावा असे प्रथमदर्शनी तरी दिसते. इराण सरकारने या घटनेत आपला हात असल्याचा इन्कार केला असला तरी त्यावर लगेच विश्वास ठेवता येईल असे नाही. भारतासाठी ही नसती डोकेदुखी असल्यामुळे ताबडतोब इराण व इस्रायल सरकारांशी उच्चपातळीवर संपर्क साधून त्यांनी आपसातील शत्रुत्वासाठी भारताची भूमी वापरू नये हे स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. या हल्ल्यात इराण सरकारच्या संघटना आहेत असे सिध्द झाले तर इराणविरूध्द निर्बंध लादण्याच्या युरोपीय समूदायाच्या तसेच अमेरिकेच्या मागणीला विरोध करणे भारताला अवघड जाईल याची जाणीवही इराणला करून देणे आवश्यक आहे. या हल्ल्यामुळे प्रचंड लोकसंख्या आणि गर्दी असलेल्या भारतातल्या बड्या शहरांत शंभर टक्के सुरक्षा व्यवस्था ठेवणे किती अवघड आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दिल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे आणि सतत नाकाबंदी असूनही पंतप्रधानांच्या घरापासून काही अंतरावर राजनीतिक अधिकार्याच्या गाडीवर हल्ला होतो, यावरून सुरक्षादलांच्या र्मयादा स्पष्ट होतात. येत्या काळात सतत निवडणुकांचे, सणांचे आणि उत्सवांचे वातावरण असणार आहे. हे वातावरण दहशतवादय़ांना संधी देणारे आणि पोलिसांची परीक्षा घेणारे असते. त्यामुळे सतत सावध राहावे लागणार आहे. एकीकडे भारतीय दहशतवादय़ांना तोंड देत असतानाचा आता या आंतरराष्ट्रीय दहशतवादय़ांवरही नजर ठेवावी लागणार आहे.
|