News Update :

मतदारराजा, काढ ती भवानी तलवार!

Wednesday, February 15, 2012


मतदारराजा, काढ ती भवानी तलवार, मराठी अस्मितेची आणि हिंदुत्वाच्या तेजाची! आणि कर शरसंधान महाराष्ट्राच्या हितशत्रूंवर. 

मतदारराजा, काढ ती भवानी तलवार!
मतदारराजा, तुला प्रेमाचा साष्टांग दंडवत आणि जय महाराष्ट्र! कॉंग्रेस, राष्ट्रवादीवाल्यांसाठी निदान आजच्या दिवशी तरी तू ‘राजा’ आहेस. तुमच्या त्या दळभद्री लोकशाहीने निदान औटघटकेचे राजेपद तुला बहाल केले. हा एक दिवस असा असतो की, मतदार ‘राजा’ हा सत्ताधार्‍यांना, राजकारण्यांना गुडघे टेकायला लावू शकतो. अर्थात आतापर्यंत अनेक निवडणुकांत गुडघे टेकून राज्यकर्त्यांना गुडघे रोग झाला तरी त्यांच्या वर्तणुकीत काही सुधारणा होत नाही. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, नाशिकसह दहा महानगरपालिकांमध्ये आज मतदान होत आहे. त्यासाठी मतदारांना एका निर्धाराने मैदानात उतरावेच लागेल. विशेषत: आजच्या दिवशी लाखो मतदारांना निकाल द्यावा लागेल. आपले मत महाराष्ट्राच्या हितशत्रूंना की प्राणाची बाजी लावून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणार्‍या शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या प्रखर राष्ट्रवादी महाशक्तीला? याबाबत सारासार विचार करूनच मतदारांना निर्णय घ्यावा लागेल. निवडणुकीत मतदारांनी प्रामुख्याने कोणता विचार करायचा असतो? ज्याला आपण मत देणार तो उमेदवार जनतेची गार्‍हाणी प्रभावी रितीने मांडील काय? तो जनतेचा हितकर्ता ठरेल काय? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहेच. त्या मुंबईवर महाराष्ट्राचाच, खासकरून मराठीजनांचा वचक राहील अशा पद्धतीने कोण काम करील? निवडणुकीतील इतर पक्ष पैशाने व सत्तेने प्रबळ असतील. पैशांच्या जोरावर आमिषे दाखवून मतदारांना प्रभावी करण्याची क्षमता त्यांच्यात असेल, पण सामान्य मतदारांच्या बाबतीत विनयाने वागण्याचे सौजन्य त्याच्या धमन्यांत आहे काय? मुंबई महाराष्ट्रासाठी त्याग केलेले, हालअपेष्टा भोगलेले, प्रसंगी आजही प्राणाची कुरवंडी करण्यास तयार असलेले लोक उमेदवार म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांनी दिले आहेत काय? हे सर्व गुण फक्त शिवसेनेच्याच उमेदवारांत दिसतात. वर सांगितलेल्या कसोटीवर महाराष्ट्राला उपयोगी कोण पडेल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यातील महाराष्ट्रीय जनतेची दु:खे ठणकावून सांगण्याचे आणि जनतेच्या हितशत्रूंना दे माय धरणी ठाय करून सोडण्याचे सामर्थ्य फक्त 
जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेल्या शिवसेनेतच 
आहे! सरकारच्या अन्यायाविरुद्ध आवेशाने कडाडणारे आणि महाराष्ट्राच्या हितशत्रूंना भुईसपाट करून सोडणारे उमेदवार हे शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचेच आहेत आणि मतदार राजा या सर्व महाराष्ट्रवीरांना आशीर्वाद देऊन राष्ट्रकार्यास हातभार लावील याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही. आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भलतेसलते सुचत असेल तर गोष्टच वेगळी. त्यांची झोप उडाल्याने ते सध्या जागेपणी स्वप्न पाहू लागले आहेत. ‘मुंबईतून शिवसेनेचा पराभव होईल व १७ तारखेनंतर शिवसेनेचा प्रभाव संपून जाईल,’ हे पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य बेअकलेचे आहे. त्यांना महाराष्ट्रातील लोकभावनेची जाण नाही. मात्र १७ तारखेला निकाल लागताच पृथ्वीराज चव्हाण यांना जबरदस्त झटका बसेल व ते जागेपणीच डुलकी घेत असल्याने दचकून जागे होतील. त्यांच्या स्वप्नांच्या ठिकर्‍या उडून मुंबई महापालिकेवर शिवरायांचा भगवा फडकलेला असेल. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यातून शिवसेनेचा पराभव व्हावा यासाठी झारखंड खाण घोटाळा, टु जी घोटाळा, लवासा घोटाळ्यातल्या पैशांचा अफाट वापर सुरू आहे. हे सर्व का सुरू आहे? महाराष्ट्राचे हितशत्रू मुंबईतच दबा धरून बसले आहेत. शिवसेना निष्प्रभ झाली तर महाराष्ट्राच्या हितशत्रूंचा आनंद गगनात मावेनासा होईल. शिवसेना निष्प्रभ झाली तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी, अबू आझमी व त्यांच्या बगलबच्च्यांना दाहीदिशा मोकळ्या होतील. महाराष्ट्राच्या दुश्मनांवर दरारा ठेवणारी शिवसेना हीच एकमेव मोठी शक्ती आहे. महाराष्ट्राच्या शत्रूंना नेस्तनाबूत करण्यासाठी फक्त शिवसेनेचा कजाखी तोफखाना उपयोगी पडेल म्हणूनच मतदार राजाने सर्वत्र शिवसेनेच्या व महायुतीच्या उमेदवारांना निवडून देऊन ही शक्ती जागृत राखली पाहिजे. आजच्या निवडणुकीत धनशक्तीचा विजय अजिबात होणार नाही तर
शिवशक्ती व भीमशक्तीचाच विजय 
होईल हे निश्‍चित आहे. तथापि, महायुतीचा हा विजयरथ रोखण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले मतदारांवर पैशांचा विषप्रयोग करीत आहेत. पैसे घेऊन दु:ख आणि यातना कायमचे घरात आणून ठेवू नका. मतदानाचे कार्य पवित्र आहे. महाराष्ट्र अस्मितेचे व राष्ट्रहिताचे आहे. सीमेवरील सैनिक बंदुकीच्या गोळीने देशाच्या दुश्मनांचा वेध घेतो. मतदार राजाने त्याच्या अमूल्य मताचा बॉम्ब फोडून महाराष्ट्राच्या दुश्मनांच्या ठिकर्‍या उडवायला हव्यात व शिवरायांच्या भगव्याचा डौल वाढवायला हवा. निवडणूक प्रचारात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पुढार्‍यांनी शिवराळ, असभ्य शिमगा केला. तो राज्यकर्त्या पक्षास शोभतो काय? पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, आर.आर. पाटील, नारोबा राणे, कटीपतंगराव कदम, माणिकराव ठाकरे वगैरे राज्यकर्त्या टग्यांनी जी भाषा वापरली व एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे शेण फेकले त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी म्हणजेच चोर्‍या, दरोडे, लुटालूट, मारामारी आणि गुंडगिरी या सगळ्यांचे माहेरघरच वाटत आहे. या सोनेरी टोळ्यांचा धिंगाणा मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासारख्या शहरात चालू द्यायचा काय? या पुढार्‍यांची शिवराळ भाषा ऐकून बुद्धिजीवी, सुसंस्कृत महाराष्ट्र तो हाच काय? अशी शंका निर्माण होण्याइतपत या बेजबाबदार व असभ्य प्रवृत्ती वाढल्या आहेत. मतभेद व्यक्त करण्याची सर्वांना मुभा आहे. कठोर भाषेच्या आधाराने मतभेद व्यक्त करायलाही हरकत नाही, परंतु आज त्यापेक्षा काही निराळेच घडत आहे व महाराष्ट्रावर कसे गुंडापुंडांच्या पोशिंद्यांचे राज्य सुरू आहे ते राज्यकर्ते स्वत:च दाखवीत आहेत. मतदार राजा, हे सर्व तूच पाहा. तूच जागरूकपणे, एका निश्‍चयाने, निर्धाराने मतदानास उतर. आजचा दिवस फक्त तुझा आहे. महाराष्ट्राची भवानी तलवार लखलखत चालविण्याचा हाच दिवस. मतदार राजा, काढ ती भवानी तलवार, मराठी अस्मितेची आणि हिंदुत्वाच्या तेजाची! आणि कर शरसंधान महाराष्ट्राच्या हितशत्रूंवर. मतदार राजा, तुला पुन्हा एकदा प्रेमाचा साष्टांग दंडवत आणि जय महाराष्ट्र!
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.