
हे का घडते?
महाराष्ट्रात हिंसा, खूनखराबा यांना ऊत आला आहे, पण सातार्यातील आशा शिंदे (२५) हिच्या बाबतीत जो निर्घृण आणि भयंकर प्रकार घडला त्यामुळे महाराष्ट्राची मान खाली झुकल्याशिवाय राहणार नाही. स्त्रीशिक्षण, सामाजिक सुधारणा याबाबतीत देशात लौकिक असलेल्या महाराष्ट्रात गर्भातील व उपवर मुलींच्या हत्या वाढत्या प्रमाणात होताना दिसत आहेत. सातार्यातील आशा शिंदे खून प्रकरणात जे घडले ते भयंकर आहे. आशा ही सज्ञान, सुशिक्षित व कमवती होती. पुण्यातील केईएम रुग्णालयात काम करीत होती. त्यामुळे आपले भलेबुरे तिला नक्कीच कळत होते. असे असताना तिच्या आई-वडिलांनी आणलेल्या स्थळाबरोबरच लग्न करण्याची जबरदस्ती तिच्यावर सुरू होती. मात्र आशाने नकार देताच वडील शंकर बजरंग शिंदे याने तिचा झोपेतच खून केला. पहाटे ती झोपेत असताना तिच्या डोक्यात लोखंडी पट्टीने प्रहार केला. हा सर्वच प्रकार विकृतीचा कळस गाठणारा आहे. ज्या महाराष्ट्राने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे दिले त्या महाराष्ट्रातला समाज आज कोणत्या जंगली प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतोय? परजातीत लग्न करणार्या मुलीचे व तिच्या प्रियकराचे खून करण्याचे प्रकार हरयाणा वगैरे प्रांतात झाले आहेत. तिकडे तो ‘खाप’ पंचायत नावाचा हिडीस प्रकारही जोरात आहे. मुलगी म्हणजे ओझे अशी मानसिकता असल्याने स्त्रीभ्रूण हत्या सर्रास केली जाते. महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण हत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शेवटी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा करावा लागला. मात्र गर्भातील मुलींना मारणारा समाज वयात आलेल्या मुलींनाही आशा शिंदेसारखा मारत असेल तर या समाजाचे करायचे काय, असा प्रश्न पडतो. ‘नकोशा’ झालेल्या मुलींचे खून हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. नांदेड जिल्ह्यातील कांडाळा येथील अर्चना आनंद कदम या महिलेस लागोपाठ तिसरी मुलगी झाली. तिचे बारसेही झाले, नाव गायत्री ठेवले. पण तिसरी मुलगी नको असल्याने आजी व आत्याने मिळून त्या मुलीचा खून केला. अशा अनेक गायत्री व आशा
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हटल्या जाणार्या
राज्यात मारल्या जात आहेत. सातार्यातील औंध येथे शंकर शिंदे या बापानेच उपवर मुलीचा खून केला व त्या खुनाबद्दल त्याला पश्चात्ताप होत नाही. जातीबाहेर लग्न करण्यापेक्षा त्या मुलीचा मृत्यू झालेला बरा याच मानसिक अवस्थेत बापाने मुलीचा खून केला. अनेकदा आई व बाप संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या करतात. त्याची कारणे जगण्या-मरण्याची, बेरोजगारी व भुकेची असतात. पोटच्या मुलांचा नीट सांभाळ करता येत नाही म्हणून बाप स्वत: मृत्यूला कवटाळतो; पण आशा शिंदेच्या बाबतीत यापैकी काहीच घडले नव्हते. फक्त तथाकथित सामाजिक इभ्रत व प्रतिष्ठेसाठी बापाने मुलीचा खून केला. पोटच्या मुलीच्या खुनाने बापाचे हात रंगले व तो तुरुंगात गेला. यामुळे बापाची व त्याच्या जातीची कोणती प्रतिष्ठा वाढली? दिल्लीत नितीश कटारा प्रकरण काही वर्षांपूर्वी गाजले. बाहुबली डी.पी. यादव यांच्या मुलीने जातीबाहेरच्या नितीश कटाराशी प्रेमप्रकरण केले म्हणून यादवांच्या मुलांनी व गुंडांनी मिळून नितीश कटाराचा निर्घृणपणे खून केला. जात व धर्म माणसांच्या मनात व धमन्यांत इतका मिसळला आहे की, तो त्यातून बाहेर पडायला तयार नाही. आपण सुसंस्कृत समाजात खरोखरीच राहतो काय? हा प्रश्न आता अशा घटनांमुळे पडतो. देवळांवर दरोडे पडतात व देवांच्या अंगावरील दागिने लुटून दरोडेखोर पसार होतात. आई मुलाचा तर मुलगा वृद्ध आईचा खून करतो. बापालाही इस्टेटीसाठी ठार मारले जाते. निवडणुकीत हार-जीत झाली म्हणून प्रतिस्पर्ध्यांना तलवारीने घाव घालून व दगडाने ठेचून मारले जाते आणि मुलगी परजातीत लग्न करील म्हणून बापच सुशिक्षित मुलीचा खून करतो. देशात दरवर्षी १५ कोटी मुलींचा जन्म होतो. तथापि त्यातील २५ टक्के मुली वयाची १५ वर्षे गाठण्यापूर्वीच या जगाचा निरोप घेतात. त्याची कारणे अनेक असली तरी त्यातही मुलींचा विरोध हे कारण सर्वाधिक आहे. देशात दर मिनिटाला एका महिलेचे अपहरण होते. ९३ व्या मिनिटाला एका महिलेचा हुंडाबळी जातो. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराची घटना प्रत्येक सवा मिनिटाला होते. देशातील हे भयंकर चित्र
स्त्रीविषयीच्या भयानक दृष्टिकोनाचाच
प्रत्यय आणून देते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिलांना आरक्षण दिल्याने सर्वत्र ‘महिलाराज’चा डंका पिटला जातो. मात्र त्याच वेळी स्त्री भ्रूणहत्या, खोट्या प्रतिष्ठेपायी आशा शिंदेसारख्या सुशिक्षित मुलींचे घेतले जाणारे बळी, महिला अत्याचाराच्या वाढत असलेल्या घटना एक वेगळेच भीषण चित्र उभे करतात. मुंबईसारख्या महानगरातही मुलींची संख्या घटत असेल तर हे गंभीर चित्र अधिकच गडद होते. मुलगाच हवा या अट्टहासापोटी अनेक निष्पाप कळ्या जन्माआधीच खुडल्या जातात आणि आम्ही सांगू त्याच मुलाशी लग्न कर या दुराग्रहापायी आशा शिंदेसारख्या उपवर, शिक्षित मुलींचा बळी जन्मदातेच घेतात. ‘लेक वाचवा’ ही शासनाने सुरू केलेली मोहीम चांगली असली तरी आई-बापच लेकींना जगविणार नसतील तर त्या वाचणार कशा? येथे कायद्याचा प्रश्न नसून समाजात पसरलेल्या विकृतीचा, खोट्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. हिंदुस्थानी संस्कृती मातृप्रधान संस्कृती आहे. मातेला तीन प्रदक्षिणा घालणे म्हणजे संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे. आई-बापाची सेवा करणे म्हणजे मोक्ष मिळविणे. ‘न मातु: परदैवतम्’. आईविना दैवत नाही. आईचे ऋण कधी फिटत नाही असे आपण गौरवाने म्हणतो. मातृदिन वगैरेही साजरे होतात. मात्र त्याचवेळी स्त्रीभ्रूण हत्याही हाच समाज बेदरकारपणे करीत असतो. खोट्या इभ्रतीसाठी सुशिक्षित मुलींचे खून करणाराही हाच समाज असतो. सातार्यातील आशा शिंदे प्रकरणाने महाराष्ट्राची संस्कृती कलंकित झाली आहे. हे डाग कधीच धुतले जाणार नाहीत. राजकारणात महिलांसाठी आरक्षण ठेवता आणि पहाटेच्या झोपेत असताना त्यांच्या डोक्यात दगड घालता? समाजाला याची किंमत चुकवावी लागेल. आशा शिंदेच्या बापाला कायदा शिक्षा करीलच, पण महाराष्ट्रात हे का घडते आहे, याचा विचार कुणी करणार आहे का?