
सन २००३मध्ये ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे 'दी सायंटिफिक एज' हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात विसाव्या शतकातील भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दहा प्रमुख यशोगाथा आहेत. सन १९५० पूर्वीच्या पाच आणि उर्वरित पाच त्यानंतरच्या वर्षांतील. १९५०पूर्वीच्या यशोगाथा या वैयक्तिक प्रयत्नातून साध्य झाल्या आहेत. रामानुजन (या गणितज्ज्ञाच्या उत्तुंग कामावर अजूनही संशोधन होते), मेघनाद साहा (यांच्या खगोलभौतिकशास्त्रातील आयनीभवनाच्या समीकरणाच्या शोधाने या क्षेत्रात क्रांती घडवली), सत्येंद्र नाथ अर्थात एस.एन. बोस (यांनी अणुगर्भातील सूक्ष्म कणांबाबत संख्याशास्त्रीय सिद्धांत मांडला), सी.व्ही. रामन (भारतात राहून संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञाला मिळालेला एकमेव नोबेल पुरस्कार. 'रामन इफेक्ट' या शोधासाठी तो मिळाला) आणि जी. एन. रामचंदन (हे रेण्वीय भौतिकशास्त्राचे जनक) या त्या यशोगाथा.
नारळीकरांनी सन १९५०नंतरच्या पाच यशोगाथांमध्ये हरितक्रांती, अंतराळ संशोधन, अणुऊर्जा, अतिवाहकता आणि नव्वदच्या दशकात विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थेचा कायापालट (त्या काळात या संस्थेचा मी महासंचालक होतो) यांचा समावेश केला आहे. यात, अतिवाहकतेमधील संशोधन हे सी.एन.आर. राव यांच्या मोलाच्या योगदानातून झाले. हा अपवाद वगळता अन्य यशोगाथा सरकारी निधींवर झालेले संघटित स्वरूपाचे कार्य होते. रामानुजन, रामन, बोस यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी केलेले अलौकिक कार्य विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात का साधता आले नाही? असा प्रश्न पडतो. परंतु, भावी रामन आणि रामानुजन आजही कुठेतरी असतील. आपण त्यांना शोधले पाहिजे आणि त्यांना विज्ञान संशोधनासाठी उत्तेजन दिले पाहिजे.
सन २००५मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल ग्लोबर, हॉल आणि हान्श या तिघांना विभागून देण्यात आले. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ ई.सी.जी. सुदर्शन यांनाही त्यात सामावून घ्यायला हवे होते, असे भारतीय शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. पण, सन २००९मध्ये भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वेंकटरामन रामकृष्णन यांना रसायनशास्त्राचे नोबेल स्टित्झ आणि योनाथ या दोघांच्या जोडीने विभागून देण्यात आले. आता, भारतात संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल कधी मिळेल, अशी उत्सुकता वाटणे साहजिकच आहे. माझ्या अंदाजानुसार, ही वेळ फार दूर नाही.
भारतीय विज्ञानक्षेत्र पुन्हा वैभवाकडे निघाले असल्याचे दिसले तरी आपल्याला अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या विरोधाभासालाही सामोरे जावे लागत आहे. 'चांदयान-१' या भारताच्या चांदमोहिमेमुळे चंदावरील पाण्याचा शोध लागला; पण, आजही भारताच्या ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते, हे वास्तव आहे. हे पाहता, विज्ञानक्षेत्रातील विकास आणि संशोधनाचा सर्व समाजासाठी उपयोग होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहायला हवे. हे आव्हान भारतीय तरुण शास्त्रज्ञ स्वीकारतील का? याचे उत्तर ठामपणे 'होय' असेच आहे!
भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन समितीने सन २००८मध्ये नवीन औषधे शोधून ती विकसित करण्याचे आव्हान स्वीकारले. यामध्ये आतापर्यंत तीन हजार पदवीधर विद्यार्थी सहभागी झाले आहेत. क्षयरोगावरील प्रभावी उपचारास आवश्यक असणाऱ्या नव्या औषधाच्या निमिर्तीसाठी कृत्रिम नवे संयुग तयार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत त्यांनी यश मिळवले आहे. 'टेकपेडिया'ने पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे एक लाख प्रकल्प संकेतस्थळावर टाकले आहेत.
बहुतांश प्रकल्प सामाजिक समस्या मांडणारे आणि ते सोडवण्यासाठी अधीर होऊन प्रयत्न करणारे आहेत... विदर्भातील तरुण शास्त्रज्ञांनी मला एकच गोष्ट विचारली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी विज्ञान काय करू शकते? त्यांच्या प्रश्नाचा अर्थच असा की, आपल्याकडे संशोधनासाठी झोकून देण्याची तयारी असलेल्या अत्यंत संवेदनशील तरुण शास्त्रज्ञांचा समूह आहे! आपण निमिर्तीक्षम प्रज्ञावान तरुणांना विज्ञानाकडे वळवू शकलो, त्यांना संशोधनातील अव्वल दर्जाचे काम करण्याची संधी दिली तर आपण विज्ञानातील गतवैभव पुन्हा मिळवू शकतो. भारताला वैज्ञानिक प्रगत देशांच्या रांगेत सर्वोच्च स्थानावर नेऊन बसवू शकतो, याची मला पूर्ण खात्री आहे.
रघुनाथ माशेलकर
(गेस्ट एडिटर)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12063145.cms