केजरीवाल यांनी संसदेवर थुंकण्याचा प्रयत्न केला. अफझल गुरूने केलेला हल्ला व या लोकांनी केलेला हल्ला तितकाच धोकादायक आहे.
यांची डोकी तपासा!हिंदुस्थान नामक आमच्या देशात सध्या कुणाचाच पायपोस कुणाच्याच गळ्यात नाही असेच एकंदरीत वातावरण आहे. एका महान देशाला नैतिकतेच्या र्हासाने ग्रासून टाकले आहे. स्वातंत्र्य, मग ते बोलण्याचे असेल नाही तर वागण्याचे, त्या स्वातंत्र्याचा नुसता स्वैराचार सुरू आहे. आताही अरविंद केजरीवाल नामक एका ‘एनजीओ’वाल्याने हिंदुस्थानच्या संसदेविषयी अत्यंत बकवास उद्गार काढले आहेत. ‘संसदेत बलात्कारी व खुनी गुन्हेगारांचा भरणा असल्याचे सांगून संसद हीच देशापुढील मोठी समस्या आहे, असे म्हटले आहे. केजरीवाल यांच्यासारख्या बिनबुडाच्या लोकांनी असे बोलणे व अण्णा महाराजांनी त्याचे समर्थन करणे म्हणजे त्यांच्या तथाकथित चळवळीचा बोर्या वाजल्यातच जमा आहे. एका विचारवंताने असे म्हटले आहे की, ‘ज्या माणसाच्या पोटात अल्सर झालेला असतो, त्याला पोटाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही!’ अण्णा उत्सव मंडळाचेही तेच झाले आहे. अण्णा व त्यांच्या तथाकथित आंदोलनातील फोलपणा उघड झाल्यामुळे लोकांनीच त्यांच्याकडे पाठ फिरवली. भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरायला हवे. त्यात आक्षेपार्ह काहीच नाही. वेळोवेळी ही अशी आंदोलने होतच असतात. मात्र याचा अर्थ मैदानावर बसून टी.व्ही. कॅमेर्यासमोर कुणाचीही, कशीही यथेच्छ बदनामी करणे असा नव्हे. सोनिया गांधींचा नुसता उदो उदो करायचा. बाईसाहेब कशा चांगल्या आहेत, बाईसाहेबांना भ्रष्टाचाराचा कसा तिटकारा आहे, बाईसाहेबांनी मनावर घेतले तर भ्रष्टाचाराचे कसे निर्दालन होईल, अशी चापलुसी करायची व त्याच वेळी कॉंग्रेसच्या इतर दोन-चार लोकांवर आरोप करून खळबळ उडवून द्यायची, हे कसले धंदे? उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे अस्तित्वच नाही. उत्तर प्रदेशात भ्रष्टाचाराचा हैदोस घातलाय तो तेथील मायावती सरकारने. डझनभर मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली न्यायालये किंवा लोकायुक्तांनी दोषी ठरविले, पण मायावतीच्या राज्यात जाऊन प्रचार करणारे हे अण्णा मंडळ
मायावतीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध एक शब्दही उच्चारायला तयार नाही. मात्र संसदेत कसे चोर व दरोडेखोर भरले आहेत त्यावर प्रवचने झोडीत आहेत. अगदी सोनिया गांधींचेच उदाहरण घ्या. हे जे कोणी केजरीवाल नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनी जनतेला माहितीचा अधिकार मिळावा म्हणून लढा दिला होता असे म्हणतात; पण चेन्नईच्या गोपाळकृष्णन या सामाजिक कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकाराचा वापर करून सोनिया गांधी यांच्या संपत्तीचा तपशील मागताच खासगी स्वातंत्र्य व सुरक्षेचे कारण देत ही माहिती देण्यास सोनिया गांधींनी नकार दिला. ‘अशी माहिती गोळा करण्यामागे कोणते जनहित दडले आहे?’ असा उलटा सवाल सोनियांनी आयकर विभागाला पाठविलेल्या पत्रात केला आहे. आता यावर टीम अण्णांचे काय म्हणणे आहे? माहितीच्या अधिकाराचा दट्ट्या जसा इतरांना आहे तसा सोनिया गांधींना का नाही? यावर अण्णा किंवा त्यांचे ‘मेंबर’ आवाज चढवून काही बोलतात का? हे लोक ज्यांना बलात्कारी, चोर, दरोडेखोर, गुन्हेगार म्हणतात त्यांनी आपली सर्व माहिती उघड करायची व ज्यांच्या मुठीत देशाची सत्ता व संसदेची सूत्रे आहेत त्यांनी मात्र स्वत:च्या कोंबड्या झाकून ठेवायच्या. यात कुणालाच काही वावगे वाटू नये याचेच आश्चर्य वाटते! सोनियांची संपत्ती नेमकी किती आहे? ती देशात आहे की परदेशात आहे? हे एक रहस्यच आहे; पण ‘टीम’ अण्णांच्या दृष्टीने त्या चांगल्या, कामसू, प्रामाणिक असल्याने त्यावर कुणी काही बोलायचे नाही. अण्णा हजारे व त्यांच्या मंडळींनी कुणावर काहीही बोलावे, चिखलफेक करावी व समाजातील एका विशिष्ट वर्गाने त्याचे समर्थन करावे, ही बाब गंभीर आहे. बरं संसदेत खुनी, गुन्हेगारांचा भरणा आहे असे केजरीवाल कुठल्या तोंडाने म्हणू शकतात. आधी या
अण्णा मंडळाने स्वत:खाली काय जळते आहे ते पाहावे. अण्णा मंडळाच्या एक सदस्या किरण बेदी यांच्याविरुद्ध ‘चारसो बिसी’ केल्याचा गुन्हा न्यायालयाच्याच आदेशानुसार दाखल करण्यात आला आहे. खुद्द केजरीवाल महाशयांवरही आयकर बुडविल्याचा आरोप आहेच. दुसरे ते शांतीभूषण. त्यांनादेखील स्टॅम्प ड्युटी चुकविल्याबद्दल २७ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. शांतीभूषण यांचे पुत्र आणि अण्णा मंडळाचे सदस्य प्रशांत भूषण यांनीही कश्मीरप्रश्नी सार्वमत घ्यावे अशी राष्ट्रद्रोही मुक्ताफळे उधळली होती. आता केजरीवाल यांनी संसदेवर थुंकण्याचा प्रयत्न केला. अफझल गुरूने संसदेवर केलेला हल्ला व या बहकलेल्या लोकांनी केलेला हल्ला तितकाच धोकादायक आहे. संसदेसारख्या संस्था मोडून-तोडून निष्प्रभ करायच्या हे राष्ट्रविरोधी कटकारस्थान असू शकते. परदेशी शक्ती फक्त अफझल गुरूसारखे, कसाबसारखे अतिरेकी पाठवूनच देशावर हल्ला करतात असे नव्हे, तर आमच्याच देशातील चळवळे पकडून त्यांना ‘डॉलर्स’रूपी खंडण्या देऊन देशाचे स्तंभ उद्ध्वस्त करण्याचे काम राजरोस सुरू आहे. संसदेच्या बाबतीत एक पावित्र्य जपलेच पाहिजे. त्यात काही त्रुटी किंवा मतभेद असू शकतील. पण कुणीही उठावे व संसदेस गुंड, बलात्कारी, खुन्यांचा अड्डा म्हणावे हे देशहिताचे नाही. पुन्हा स्वत:स गांधीवादी म्हणवून घेणारे लोकही अशा बेफाम वक्तव्याचे समर्थन करतात तेव्हा नवलच वाटते. राजकारणात टीका-टिपणी होतच असते. मात्र ती कुणी कुणावर करावी? पुन्हा ते करताना डोके ठिकाणावरही हवेच. केजरीवाल आणि कंपनी ज्या पद्धतीने संसदेसंदर्भात बरळत आहे, त्यावरून यांची डोकी तपासा, असेच सांगण्याची वेळ आली आहे. जे पाकिस्तान किंवा अमेरिकेला हवे आहे तेच हिंदुस्थानात घडताना दिसत आहे. पाकिस्तानातील अतिरेक्यांकडे शस्त्रे व स्फोटके आहेत. हिंसाचार व दहशतवाद आहे. हिंदुस्थानातील नवे अतिरेकी पांढरपेशे, शिकले सवरलेले व हाती शस्त्र न घेता लोकांच्या मनात देशविरोधी विष पेरणारे आहेत. हा प्रकार सशस्त्र दहशतवादापेक्षा भयंकर आहे.
http://www.saamana.com/


