News Update :

सक्षम मराठीच्या दिशेने...

Sunday, February 26, 2012


जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण यांच्या झंझावातातही मराठी भाषेची ध्वजा दिमाखात फडकत ठेवली पाहिजे याची जाणीव करून देणारा आजचा 'मराठी भाषा दिन' हा प्रत्येक मराठी भाषकासाठी महत्त्वाचा आहे. प्रतिभावंत साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्यांच्या प्रतिभेला सलाम करतानाच त्यांनी आपल्या मायबोलीच्या दुरवस्थेबाबत व्यक्त केलेली चिंता आजही काळजीचाच विषय आहे. मुंबईसारख्या महानगरातील मराठी शाळांची रोडावणारी संख्या आणि पदवी परीक्षेसाठी मराठी भाषा घेणाऱ्यांमध्ये होणारी घट ही चिंतेचीच बाब आहे. मुंबईलगतच्या परिसरातही आता हळूहळू इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे. साहजिकच तिथेही मराठी शाळांना ओहोटी लागली आहे. जागतिकीकरणाच्या वावटळीमध्ये आता 'करियर'साठी देशांच्या सीमांना फारसा अर्थ उरलेला नाही. शिवाय पाश्चात्त्य तेच सर्वच चांगले, असा समज असणाऱ्या वर्गाची संख्याही आता वाढते आहे. याला मुख्यत: नवश्रीमंत आणि विस्तारणारा मध्यमवर्ग जबाबदार आहे. त्यांचेच अनुकरण समाजातील इतर घटकही करतात. या साऱ्याचा एकत्रित परिणाम मराठी माध्यमाच्या शाळांकडे पाठ फिरवण्यामध्ये झाला आहे. 

वास्तविक प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होणेच चांगले असते, असे तज्ज्ञांनी अनेकवार सांगितले आहे. परंतु ते कानाआड केले जात आहे. या प्रश्नाचा आजच्या दिनी गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. आजच्या विलक्षण स्पधेर्च्या युगामध्ये आपल्या मायबोलीवर नुसते भाबडे प्रेम करून चालणारे नाही, तर ती अधिकाधिक सशक्त कशी होईल याचा विचार करणे गरजेचे आहे. मराठी ही ज्ञानभाषा झाली, तरच ती इंग्लिशशी टक्कर घेऊ शकेल. आज इंग्लिश ही जागतिक भाषा म्हणून मानली जाते; कारण ती ज्ञानभाषा आहे. दुसरे असे की त्या भाषेने स्वत:भोवती कोणतेही कुंपण घालून घेतले नाही. उलट अनेक भाषांतील नवनव्या शब्दांना इंग्लिशने आपलेसे केले आहे. कोणतीही भाषा ही प्रवाही असते, तेव्हाच ती अधिकाधिक सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करत असते. आपण मात्र भाषेबाबत फारच कडवी भूमिका घेत आलो आहोत. 

आज विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये होत असलेली प्रगती आपल्या घराचा उंबरठा ओलांडून येत आहे. या प्रगतीची दखल घेताना मराठी शब्दच वापरले पाहिजेत, असा हट्ट धरून चालणार नाही. जिथे चपखल आणि सहज आकलन होणारे पर्यायी शब्द आहेत, तिथे ते वापरण्यास हरकत नाही. मात्र प्रत्येकवेळी मराठीचा आग्रह धरणे योग्य नाही. उदाहरणच द्यावयाचे तर ट्युमर या शब्दाऐवजी अर्बुद असा शब्द वापरला तर त्याचा अर्थ कितीजणांना समजेल? मात्र याचा अर्थ मराठीतील पर्यायी शब्द वापरूच नयेत असे नाही. मात्र त्यासाठी मराठी हीसुद्धा ज्ञानभाषा व्हायला हवी. तशी ती झाली की विविध क्षेत्रांत होणाऱ्या प्रगतीचे स्पष्ट चित्र रेखाटण्यासाठी आवश्यक असणारी भाषा आपोआपच घडत जाईल. प्रतिभावंताच्या लेखणीमधूनच त्याची अशी शैली साकारत जाते, तशीच प्रगतीला लीलया आपल्या कवेत घेणारी मराठीही अधिकाधिक सक्षम होत जाईल. खरेतर मराठी भाषा किती श्रीमंत आहे, हे संतवाङ्मयातून फार समर्थपणे दिसते. 

गीतेतील तत्त्वज्ञानावर भाष्य करणाऱ्या ज्ञानेश्वरांनी तर 'जैसें बिंब तरी बचकें एवढें। परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें। शब्दाची व्याप्ती तेणें पाडें। अनुभवावी' असे सांगितले आणि ते सिद्धही केले. तुकारामांनी 'आम्हा घरी धन शब्दाचींच रत्नें। शब्दाचींच शस्त्रें यत्ने करूं।। शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन। शब्दें वांटंू धन जनलोका।।' असे सांगितले आणि या शब्दभांडारांतूनच त्यांनी गुह्य ज्ञान समाजातील सर्व थरांसाठी मोकळे केले. आताच्या काळात असे काम समाजातील सर्वच क्षेत्रांतील जाणत्यांना करावयाचे आहे. तसे ते करण्याचा संकल्प आजच्या दिनी केला आणि तो अमलातही आणला तर मराठी भाषा अधिक समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागेल. मराठी साहित्याच्या प्रांतात आता अनेक विषय नव्याने प्रवेश करते झाले आहेत आणि त्यांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, ही सुखावह गोष्ट आहे. मराठी ग्रंथप्रदर्शनांना मिळणारा प्रतिसाद हा फारच उत्साहवर्धक असतो. त्यातून लोकांच्या आवडींमध्ये पडलेला फरकही स्पष्ट दिसतो. ललित साहित्यापेक्षासुद्धा जास्त मागणी ही माहितीपर, नवीन विषयांची ओळख करून देणाऱ्या, अज्ञात जगाची खिडकी उघडून दाखविणाऱ्या ग्रंथांना असते. एका अर्थाने या बदलत्या अभिरूचीतून आजच्या पिढीच्या आकांक्षाच प्रतिबिंबित होत आहेत. त्याची दखल प्रसारमाध्यमांसकट सर्वच संबंधितांनी घेणे आवश्यक आहे. तशी ती घेण्याचा निश्चय आज केला तर मराठी श्रीमंत होण्याकडे वाटचाल करू लागेल. 
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.