इटलीचे सरकार हिंदुस्थानच्या न्यायालयास मानायला तयार नाही. ही त्यांची मस्तवाल भूमिका हिंदुस्थानच्या कायद्यास लाथाडणारी आहे.
इटलीचे माफिया!
इटली देश पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडला आहे. हिंदुस्थानच्या सम्राज्ञीपदावर पुचाट कॉंग्रेसवाल्यांनी सोनियाबाईंना विराजमान केले आहे व बाई ‘इटली’च्या मातृभक्त असूनही हे पुचाट लोक तिच्या भोवती फेर धरून नाचत आहेत, पण ‘इटली’च्या बाबतीत हिंदुस्थानवासीयांना इतके हळवे होण्याचे कारण नाही व सोनिया गांधी दिल्लीत विराजमान आहेत म्हणून ‘इटली’वाल्यांनी त्यांचा कायदा आमच्या देशावर लादू नये. हिंदुस्थानच्या समुद्र-हद्दीत इटलीच्या नौकेवरील सैनिकांनी आमच्या दोन मच्छीमारांना गोळ्या घालून मारले. त्यानंतर इटलीच्या या नौकेस हिंदुस्थानच्या पोलिसांनी घेरले व या गोळीबार करणार्या दोन सशस्त्र सैनिकांना अटक करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. सध्या हे दोन्ही इटालियन सैनिक केरळ पोलिसांच्या कोठडीत आहेत. यावर इटली सरकारच्या अंगात जो आग्या वेताळ संचारला आहे तो धक्कादायक आहे. इटली सरकारचा दावा आहे की, दोन हिंदुस्थानी मच्छीमार मारले गेले त्यात सैनिकांचा काडीमात्र दोष नाही. ‘केरळच्या जवळ इटालियन व्यापारी बोटीतून जो गोळीबार झाला त्याचा हिंदुस्थानी सरकारशी संबंध नसून हा प्रकार आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत झाला. त्यामुळे सैनिकांवर हिंदुस्थानी कायद्याने खटला चालू शकत नाही,’ अशा प्रकारची वकिली इटलीचे येथील राजदूत करीत आहेत व सैनिकांच्या सुटकेची मागणी करीत आहेत. हिंदुस्थानच्या विदेश मंत्रालयावर दबाव टाकण्यासाठी इटलीतून त्यांचे एक उपमंत्री व वकिलांचा ताफाही दिल्लीत पोहोचला आहे. इटलीची नौका हिंदुस्थानात म्हणजे केरळच्या समुद्र-हद्दीत होती. या नौकेसमोर मच्छीमारांची छोटी नौका आली. वारंवार इशारा देऊनही ते हटले नाहीत. त्यामुळे या नौकेत समुद्र-चाचे असल्याच्या भीतीने आपण गोळीबार केल्याचे आता इटलीतर्फे सांगितले जात आहे. प्रश्न इतकाच आहे की, इटलीचे ते सैनिक काही म्हणोत. त्यांचा जो काही कायदा असेल तोही त्यांच्यापाशी, पण मच्छीमारांच्या बोटीतून इटालियन नौकेवर कोणताही गोळीबार किंवा हल्ला झाला नव्हता व तसा हल्ला होईल अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली नसताना
इटलीवाल्यांनी नि:शस्त्र मच्छीमारांवर गोळीबार
केलाच कसा? नि:शस्त्र लोकांवर गोळ्या चालवून ठार मारण्याचा अधिकार कोणत्या आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याने दिला असेल असे आम्हाला तरी वाटत नाही. केरळातील हे दोन मच्छीमार हिंदुस्थानच्या हद्दीत होते व त्यांच्या नौकांवर कोणत्याही प्रकारची शस्त्रे नव्हती. उलट इटलीच्या महाकाय ‘एनरिका लेक्सी’ या जहाजावर सुरक्षेसाठी संपूर्ण शस्त्रसज्जता होती. हिंदुस्थानच्या निरपराधी मच्छीमारांना ठार मारण्यासाठी ही शस्त्रे नव्हती. त्यामुळे त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना हिंदुस्थानी कायद्यानेच शासन व्हायला हवे. केरळच्या न्यायालयाने इटलीच्या दोन सैनिकांना कोठडीत रवाना केले. त्यामुळे जो काही फैसला व्हायचा तो न्यायालयातच होईल. मात्र इटलीचे सरकार हिंदुस्थानच्या न्यायालयास मानायला तयार नाही. आमचे सैनिक आमच्या हवाली करा. आम्ही निघालो, ही त्यांची मस्तवाल भूमिका हिंदुस्थानच्या कायद्यास लाथाडणारी आहे. इटलीच्या सैनिकांवर ‘३०२’ म्हणजे खुनाच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर गुन्हा शाबीत झाला तर फाशी किंवा जन्मठेप निश्चित आहे. इटलीच्या राजदूताला व तेथील सरकारला त्यामुळे घाम फुटला असेल तर तो त्यांचा प्रश्न. फक्त इटलीच्या दोन सैनिकांना ‘दया’ दाखवून त्यांच्या विरुद्धचे पुरावे सैल पडणार नाहीत. त्याकडे सगळ्यांनीच जागरूकतेने पाहायला हवे. कारण याआधी अशा अनेक परदेशी गुन्हेगारांना आमच्या देशाने एकतर पळून जाण्यास मदत केली आहे नाहीतर कायद्यास भोके पाडून त्यांना निर्दोष सोडले आहे. पुरुलिया शस्त्रकांडातील रशियन आरोपींना तर रशियन राज्यकर्त्यांच्या दबावामुळेच सोडले गेले आणि बोफोर्स कांडातील सोनियांचा इटालियन मामेभाऊ क्वात्रोचीलादेखील आधी
कॉंग्रेस सरकारनेच दिल्लीतून पळून जाण्यास
मदत केली व नंतर सीबीआयने त्याला ‘क्लीन चिट’ देऊन उरलेले कार्य पूर्ण केले. म्हणजे परदेशी, खासकरून इटली किंवा पाकिस्तानचे गुन्हेगार आमच्या देशात येऊन खून करतात, लुटमार करतात आणि आम्ही मात्र नातीगोती जपण्यासाठी या गुन्हेगारांना मोकळे सोडत असतो. आज इटलीच्या बाबतीत नेमके तेच घडताना दिसत आहे व सोनिया गांधी दिल्लीत बसलेल्या असल्यामुळे आज अटकेत असलेले इटलीचे दोन खुनी सैनिक खुनाची शिक्षा भोगतीलच याची खात्री नाही. कायदा व सरकारच इटालियन बाईसाहेबांच्या मुठीत असल्यावर अशा शंका आणि कुशंका मनात येणारच हो! इटलीत माफियांचे राज्य आहेच व इटलीतील माफियांनी जगभरात दहशत निर्माण केली होती हे खरेच. मात्र तेथील माफियांचे कायदेकानू वेगळे. हिंदुस्थान हा एक स्वतंत्र सार्वभौम देश आहे व या देशाच्या हद्दीत झालेला गुन्हा व गुन्हेगारांवरील खटले हिंदुस्थानी कायद्यानेच चालतील. मग समुद्र असो, जमीन असो, आकाश असो. जेथे हिंदुस्थानची हुकूमत चालते तेथे घुसून आमच्या लोकांना मारणारे आमच्याच देशाचे गुन्हेगार आहेत. निरपराध्यांच्या सांडलेल्या रक्ताचे मोल तुम्हाला चुकवावेच लागेल. इटलीची माफियागिरी त्यांच्यापाशी. दोन सैनिकांना सोडले नाही तर इटलीचे हिंदुस्थानशी संबंध बिघडतील अशी धमकी देण्यात आली आहे. अशा धमक्यांना भीक घालण्याची गरज नाही. संबंध बिघडले तर बिघडले. आम्ही दिल्लीच्या १० जनपथावरील इटालियन पार्सल पुन्हा इटलीस पाठवायला तयार आहोत. देश मुक्त होईल. मोकळा श्वास घेईल. बोला, आहे तयारी?