प्रचारात कोणी कितीही तोंडाची डबडी वाजविली तरी त्यांना तोफांचे महत्त्व नाही. तोफखाना फक्त शिवसेनेचाच व डरकाळी फक्त मराठी वाघाचीच.
तोफा थंड पडत नाहीत!
मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या प्रचारांची रणधुमाळी संपली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असे म्हणण्याची आता एक रीत झाली आहे. खरं तर कुणालाही तोफांची उपमा देणे हा त्या तोफांचाच अपमान ठरेल. ‘पेड न्यूज’च्या जमान्यात तोंडच्या वाफा दवडणार्यांनाही ‘तोफा’ किंवा ‘गर्जना’ अशा विकतच्या उपमा देऊन बेडकाचा बैल बनविण्याचा प्रयत्न होतो. अशा बैलांचे काय हाल होतील ते प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कळेलच. प्रचाराच्या तोफा थंड पडल्या हे खरेच; पण हे जे काही तोफखाने धडाडले असे म्हणतात त्या तोफांतली दारू तशी कुचकामीच होती. ना लोकांच्या प्रश्नावर कुणी गरजले, ना विकासाच्या मुद्यावर कुणी बरसले. फक्त उखाळ्या-पाखाळ्या, व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप, जुने मुडदे उकरून काढण्याचेच काम झाले व याच आरोप-प्रत्यारोपांना प्रसिद्धी मिळाली. मुंबई-ठाण्यात अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. ही सत्ता लोकांनी आमच्या हाती सोपविली आहे. लोकांना जी वचने दिली ती बहुसंख्य पूर्ण झाली. त्यामुळे आम्ही अभिमानाने पूर्ण झालेल्या व लोकार्पण केलेल्या भव्य कामांचे पुस्तकच छापले व छातीठोकपणे सांगितले की, ‘‘होय, आम्ही करून दाखवले!’’ याला म्हणतात आत्मविश्वास. जे केले ते केलेच व त्या केल्याचा आम्हाला अभिमान आहे. मुंबई, ठाणे, नाशिक या महानगरपालिका शिवसेनेकडे आहेत. एकदा नव्हे तर सातत्याने या महानगरपालिकांत शिवसेनेचा जय झाला तो सत्ता लोकांसाठी व शहरांसाठी राबविल्यामुळेच. जे टीकाकार आज आमच्याविरोधात तोंडच्या वाफा दवडत आहेत त्यांनी मुंबई-ठाण्याचा फेरफटका मारावा व नंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पुण्यात किंवा पिंपरी-चिंचवडला जाऊन पाहावे. गेला बाजार अकोला, अमरावतीत जाऊन या. काय दिवे लावलेत तिथल्या सत्ताधार्यांनी? अनेक महानगरपालिकांच्या तिजोरीत कर्मचार्यांचे पगार करण्यासाठी पैसे नाहीत, तेथे विकासकामांची काय सगळी बोंब होणारच! पिंपरी-चिंचवडला तर तुमच्या दादामहाराज अजित पवारांची एकहाती सत्ता आहे. आज हे महाशय, मुंबईची सत्ता मागत आहेत व त्यासाठी शिवसेनेच्या कारभारावर टीका करीत आहेत, पण मुंबईमध्ये शिवसेनेच्या सत्तेने जे भरीव काम जागोजाग केले त्या प्रकारचे अंशभर काम तरी पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात झाले असेल तर दादा पवारांनी ते दाखवून द्यावे. शिवसेनेने केलेल्या कामाचे मोठे पुस्तकच आम्ही छापले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी त्यांच्या ताब्यातील महानगरपालिकांत ‘चिटोरे’ भरेल इतकेही काम केले नाही. त्यामुळे ‘करून दाखविले’ या शिवसेनेच्या मुसंडीचा त्रास त्यांना होणारच. सांगली-मिरज महानगरपालिका राष्ट्रवादीकडे आहेत. त्या महानगरपालिकेत फक्त गुंडगिरीच्या भाषा व लफंगेगिरीच्याच कहाण्या आहेत. सगळे दस नंबरी हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन त्या महानगरपालिकेत बसलेत व राज्याच्या गृहमंत्र्यांना या गुंडगिरीचे काहीच वाटत नाही. तुम्ही काय करून दाखवले ते सांगली-मिरज महानगरपालिकेत प्रत्यक्ष पाहायला मिळते. हीच तुमची कर्तबगारी म्हणावी लागेल. गेल्या काही दिवसांत प्रचाराच्या वाफा दवडताना जे आरोप-प्रत्यारोप झाले ते म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आबा, दादा, बाबांचे नैराश्य होते. बाकीच्या महानगरपालिकांत लोक योग्य तो कौल देतीलच, पण महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मराठमोळ्या मुंबईचे महत्त्व जगात मोलाचे आहे. मुंबई ही मराठी माणसांच्या रक्तातून व घामातूनच निर्माण झाली. कृपाशंकरसारखे लोक इकडे बटाटे विकायला आले म्हणून मुंबईचे महत्त्व वाढले नाही. मुंबईने देशाचे पोट व रोजीरोटी सांभाळली, पण मराठी माणूस मात्र अनेकदा उपाशी राहिला; तरीही तो लढत व गर्जत राहिला. याच लढवय्या मराठी माणसामुळे मुंबई आजपर्यंत महाराष्ट्रात राहिली. शिवसेना हाच त्या मराठी माणसाचा आधारस्तंभ आहे. प्रचारात कोणी कितीही तोंडाची डबडी वाजविली तरी त्यांना तोफांचे महत्त्व नाही. तोफखाना फक्त शिवसेनेचाच व डरकाळी फक्त मराठी वाघाचीच. प्रचार संपला, निवडणुकांचा बाजार बंद झाल्यावर अनेक लवंगी फटाके विझून जातात, पण खर्या तोफांचे तसे नसते. त्या लोकांच्या प्रश्नांसाठी, मराठी माणसांसाठी धडाडतच राहतील.
खोमेनीची पिलावळ!
संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरलेल्या इस्लामी दहशतवादाने पुन्हा डोके वर काढले आहे. सोमवारी राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर दुसर्याच दिवशी थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही धमाके झाले. सोमवारीच जॉर्जियाची राजधानी तिबलीसी येथेही बॉम्बस्फोटाचा प्रयत्न झाला. पण सुरक्षा अधिकार्यांनी वेळीच बॉम्ब निष्क्रिय केल्यामुळे तिथे कोणी ठार किंवा जखमी झाले नाही. या तिन्ही स्फोटांचे टार्गेट एकच होते. ते म्हणजे इस्रायल. दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर इस्रायली दूतावासाची गाडी धमाक्याने उडवण्यात आली. लाल रंगाच्या बाईकवरून आलेल्या दुचाकीस्वारांनी धावत्या इनोव्हा गाडीला स्फोटकांची चुंबकीय छडी चिकटवली आणि हल्लेखोर शिताफीने अदृश्य झाले. त्यानंतर १० सेकंदांतच स्फोट झाला. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून ही माहिती आता समोर आली आहे. धावत्या गाडीला स्फोटके चिकटवण्याचे हे नवे तंत्रज्ञान हिंदुस्थानच्या सुरक्षेसाठी धोकादायकच म्हणायला हवे. दिल्लीतील स्फोटात इस्रायली दूतावासातील महिला अधिकार्यासह चार जण जखमी झाले. या धमाक्यांमागे इराण आणि लेबनॉनमध्ये सक्रिय असलेल्या ‘हिज्बुल्लाह’ या कट्टर शियापंथीय अतिरेकी संघटनेचा हात असावा, असा संशय व्यक्त होत आहे. इराण सरकारने हिज्बुल्लाहचा वापर करून दिल्लीत स्फोट घडविल्याचा थेट आरोपच इस्रायलने केला आहे. बँकॉकमध्ये मंगळवारी स्फोट घडवणार्या इराणी नागरिकाचे ओळखपत्रच सापडल्याने इस्रायलच्या आरोपात तथ्य असल्याचेच निष्पन्न होत आहे. दिल्लीतील धमाक्यानंतर इराण सरकारने हल्ल्यामागे इस्रायल सरकारचाच हात असल्याची उलटी बोंब ठोकली होती. हिंदुस्थान आणि इराण यांच्यातील संबंध बिघडवण्यासाठी इस्रायलने हा धमाका केल्याचा कांगावा इराणने केला होता. पण बँकॉकमध्ये इराणी कनेक्शन स्पष्ट झाल्यानंतर इराण सरकार तोंडावर पडले आहे. हिंदुस्थानपुरते बोलायचे तर हिज्बुल्लाहच्या अतिरेक्यांना इंडियन मुजाहिद्दीनच्या घरभेद्यांनी मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण इंडियन मुजाहिद्दीनने यापूर्वी सर्व हल्ले १३ तारखेलाच केले आणि सोमवारीही १३ तारीखच होती. इराण आणि इस्रायल यांचे भांडण जुने आहे. या दोन्ही देशांतून विस्तवही जात नाही. कधीही युद्धाचा भडका उडेल, अशी स्थिती आहे. त्या आगीत तेल ओतण्याचे काम या धमाक्यांनी केले आहे. इराण-इस्रायलच्या या भांडणात हिंदुस्थानच्या भूमीचा दहशतवादी हल्ल्यासाठी वापर होणे आपल्याला परवडणारे नाही. ‘हिज्बुल्लाह’ म्हणजे इराणचा धर्मांध नेता अयातुल्ला खोमेनीची पिलावळ आहे. आधीच इस्लामी दहशतवाद रुजण्यासाठी आपली जमीन भुसभुशीत आहे. त्यात ‘हिज्बुल्लाह’सारख्या संघटनांचे पीक वाढणार नाही, याची काळजी केंद्र सरकारने घ्यायला हवी.