skip to main |
skip to sidebar
शिमग्याचे सोंग
भ्रष्टाचाररूपी रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामचंद्राने अण्णा हजारे यांचा अवतार घेतला आहे आणि अरविंद केजरीवाल, किरण बेदी हे त्यांचे हनुमान आहेत, असा जो काही समज पसरविला जात होता, तो किती वरवरचा आहे हे गेल्या काही दिवसांत अनेकदा दिसले. आता तर ही सारी मंडळी स्वत:च्या शेपटीला लागलेली आग विझवण्याच्या नादात वाटेल तशी उडय़ा मारू लागली आहेत आणि भ्रष्टाचारविरोधी लढय़ातील वानरसेना होण्याऐवजी प्रत्यक्ष वानरचाळे करू लागली आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवाल यांचे नवे वक्तव्य. भारतीय संसद ही बलात्कारी, गुंड वगैरेंनी भरलेली असल्याचे विधान केजरीवाल यांनी केले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या बेजबाबदार वर्तनास ते शोभेसेच असले तरी आतापर्यंतच्या एकूण बेजबाबदारीची मर्यादा त्यांनी यातून ओलांडली आहे. केजरीवाल आणि मंडळींचा आपण शुद्ध आहोत असा दावा असतो. प्रचलित बाजारपेठीय विक्रय तंत्रात आपले उत्पादन चांगले ठरवण्यासाठी स्पर्धकाच्या उत्पादनास नावे ठेवावी लागतात. केजरीवाल यांचे वर्तन त्याचप्रमाणे झाले. आपण स्वच्छ आहोत हे सांगण्यासाठी त्यांना इतरांना अस्वच्छ ठरवावे लागत आहे, यातच सगळे आले. भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी केजरीवाल आणि मंडळी एक संस्था चालवितात. कोणतीही मोहीम चालवायची तर पैसा लागतो. तसा तो या मोहिमेसाठीही लागत असणार. आपण या पैशाचा हिशेब देतो, असे ते सांगत असतात. त्या हिशेबावरून केजरीवाल यांना मध्यंतरी टीका सहन करावी लागली होती. खेरीज केंद्रीय सेवेत असताना ते शिष्यवृत्ती मिळाल्यावर सेवेतून दूर झाले. त्या वेळी सेवेच्या करारानुसार ते सरकारचे काही देणे लागत होते. सरकारने नोटीस बजावल्यानंतरच त्यांनी ते पैसे सरकारला परत केले. हे त्यांच्या प्रामाणिकपणाच्या व्याख्येत बसत असावे. जसे केजरीवाल तशाच त्यांच्या साथीदार. या बेदीबाईंनी पोलीस सेवेत असताना तुरुंग सुधारणा जोमाने राबविल्या आणि त्याचे दामदुप्पट फळ त्यांना मिळाले. परंतु सेवेनंतरही त्या फळावर त्या संतुष्ट नसून त्यांची अधिकाची हाव संपलेली नाही. पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी जे काम केले त्या अनुभवकथनासाठी त्यांना ठिकठिकाणांहून व्याख्यानांची निमंत्रणे येत असतात. थोडय़ा वेळात खूप समाजसेवा करायची असल्याने बेदीबाई विमानाने हिंडतात. त्यातही त्यांचा काटकसरी दृष्टिकोन लक्षात घेण्यासारखा आहे. त्या प्रथम वर्गाचे भाडे संस्थेस आकारतात आणि प्रवास मात्र जनता वर्गातून करतात. यातून जे पैसे वाचतात ते त्या समाजसेवेसाठी वापरतात. केवढे उदात्त विचार. वास्तविक त्यांनी अधिक साधेपणा दाखवला तर अधिक पैसे उभे राहू शकतात. बडे उद्योगपती, व्यापारी, राजकारणी वगैरे मंडळी जशी स्वत:च्या खासगी विमानाने प्रवास करीत असतात त्याचप्रमाणे बेदीबाईंनी त्यांना निमंत्रण देणाऱ्या संस्थांना अशा खासगी विमानाचे भाडे आकारावे आणि प्रत्यक्ष प्रवास जनता वर्गातून करावा. असे केल्याने त्यांचे अधिक पैसे वाचतील आणि तितके अधिक पैसे जनसेवेसाठी त्यांना मिळतील. या दोघांचे ज्येष्ठ सहकारी भूषण पितापुत्रही तसे समाजसेवेत मागे हटणारे नाहीत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री, देशातील आघाडीच्या समाजसेविका सुo्री मायावती यांच्याकडून या भूषण पितापुत्रांनी अत्यंत स्वस्तात मोठी जमीन घेतल्याचे प्रकरण मध्यंतरी बरेच गाजले. त्यावर या कायदेतज्ज्ञ जोडगोळीचे म्हणणे असे की या भूखंड खरेदीत सवलत द्यावी अशी काही मागणी त्यांनी केली नव्हती, परंतु तरीही सुo्री मायावतींनी सवलत दिल्यास त्या बापुडय़ांचा काय दोष? खरेच आहे ते. या दोघांच्या कार्याचा अफाट विस्तार लक्षात घेता भ्रष्टाचाराचे निर्मूलन झाल्यावर श्रमपरिहार करता यावा म्हणून आराम करायचा तर त्यांना मोठे घर लागणार. मोठय़ा घरासाठी जमीनही मोठी हवी. ती मोठय़ा सवलतीत दिली तर त्यावर एवढा मोठा गहजब करण्यासारखे वास्तविक काहीच नाही. ज्या संसदेत बलात्कारी, गुंड वगैर बसतात त्यांच्या विधानसभेतील सहकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांना सवलत दिली, तेव्हा त्यांनी ती स्वीकारू नये असा काही सल्ला भूषण पितापुत्रांना केजरीवाल यांनी दिल्याचे ऐकिवात नाही. तसा तो दिला असता भूषणांनी हे भूषणावह कृत्य कदाचित केलेही नसते.
वास्तव हे आहे की गेल्या काही महिन्यांत अण्णा आणि मंडळींच्या आंदोलनाची जी दशा झाली आहे, त्यामुळे या मंडळींचा तोल गेला आहे. त्यामुळे एकापेक्षा एक अतिरेकी विधाने करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची स्पर्धा या मंडळींत सुरू आहे. केजरीवाल यांच्याही आधी खुद्द अण्णा यांनी अशीच धक्कादायक विधाने करीत संसदेपेक्षा ग्रामसभांना अधिक अधिकार द्यायची मागणी केली होती. या मंडळींची समज आणि वकूब दोन्ही कसे कमी आहेत, याचेच दर्शन यातून घडते. कदाचित असेही असेल की अण्णांचे एकूणच भान ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषद यांच्या पलीकडे जात नसल्याने त्यांना संसद आदींचे महत्त्व कळले नसावे. अन्यथा अशा तऱ्हेचे बालबुद्धीचे विधान ते करते ना. हे कमी म्हणून की काय त्यांना कपालभातीकार बाबा रामदेव हेही मिळाल्याचे दिसते. त्यांनी केजरीवाल यांच्या ताज्या वक्तव्यास पाठिंबा दिला असून लीबियात कर्नल मुअम्मर गडाफी याची सत्ता उलथून पाडण्यासाठी जसा उठाव झाला तशा उठावाची आपल्याकडे गरज असल्याचे म्हटले आहे. तसा उठाव व्हावा यासाठी आपण काय करणार, हेही त्यांनी स्पष्ट केले असते तर बरे झाले असते. म्हणजे उठाव करायचा जनतेने आणि तो मोडण्यासाठी पोलीस आल्यास बाबा रामदेव यांनी महिलेच्या वेशात पळून जाण्याची अलौकिक योगिक क्रिया करायची, याची पुनरुक्ती होणार का, हे कळले असते. बाबांच्या मतानुसार एक कुटुंब आणि एक पक्ष देशाच्या दुरवस्थेस जबाबदार आहे. त्यांचा रोख गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस पक्षावर असावा. असे असेल तर बाबांचे हिंदुत्ववादी पक्ष ही दुरवस्था रोखण्यासाठी काय करीत आहेत, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे. देशातील अर्धा डझनपेक्षा अधिक राज्यांत बाबांना देशास अधोगतीकडे नेणाऱ्या पक्षांच्या सत्ता नाहीत. तेव्हा त्या राज्यांत रामराज्य असल्याचे प्रमाणपत्र बाबा आणि अण्णा यांनी द्यायला हरकत नाही.
या मंडळींचे गेल्या काही दिवसांतील वागणे उबग आणणारे आहे. यांच्या या अशा वागण्या आणि बोलण्याने सुरुवातीला भ्रष्टाचारविरोधी मोहिमेस जो आधार मिळाला होता तो आता झपाटय़ाने विरू लागला आहे. याचे कारण आपल्यासारख्या देशास कर्कश्शपणा मानवत नाही. मग तो माजलेल्या राजकारण्यांचा असो वा त्यांना विरोध करणाऱ्या स्वयंभू स्वच्छतावाद्यांचा असो. आपले सामूहिक समाजमन सुरुवातीस असे प्रकार सहन करते आणि नंतर अशा मंडळींना त्यांची जागा दाखवून देते. अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाबतीत हा दुसरा टप्पा अपेक्षेप्रमाणे आला आहे, अशी त्यांची भाषा दर्शविते. मूठभर भ्रष्टाचाऱ्यामुंळे साऱ्या संसदेवर ठपका ठेवणाऱ्या अण्णा आणि त्यांच्या कंपूस हुकूमशाही हवी आहे काय? आणि ती समजा आली म्हणजे रामराज्य येते, असे त्यांना वाटते काय? या मंडळींची जगाची एकूण समज लक्षात घेता तसा त्यांचा समज नसेलच असे म्हणता येणार नाही.
आपण काय बोलतो याचे भान या स्वयंभू स्वच्छता मोहीमवाल्यांना नाही. यंदा अधिक महिन्यामुळे शिमगा लवकर आहे. त्यामुळे शिमग्याची सोंगेही लवकरच येणार. केजरीवाल यांनी हे दाखवून दिले आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=213051:2012-02-27-15-46-15&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7