News Update :

पालापाचोळा उडाला; शिवसेना जिंकली!

Friday, February 17, 2012



महाराष्ट्राच्या राजधानीतला पालापाचोळा उडून गेला. शिवसेनेचा ‘भगवा’ डौलाने फडकला. त्या भगव्यास मानाचा मुजरा!
पालापाचोळा उडाला;
शिवसेना जिंकली!
वल्गना हवेत विरल्या. फुका गर्जना करणार्‍यांची दातखिळी बसली. शिवसेना संपवू पाहणार्‍यांचे पानिपत झाले. जसे शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटे छाटली आणि महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या औरंगजेबाची कबर याच मराठी भूमीत बांधली त्याच जिद्दीने आणि ईर्षेने मुंबई-ठाण्याच्या झुंजार जनतेने शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचा विजय घडवून महाराष्ट्रद्रोह्यांचा पालापाचोळा केला आहे, दारुण पराभव केला आहे. महाराष्ट्राची राजधानी ‘मुंबई’ची कोंबडी बनवून तिच्या मानेवरून सुरी फिरविण्याचे कारस्थान कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले रचित होते. ही सुरी त्यांच्यावरच उलटली. शिवसेनेच्या भवानी तलवारीसमोर या सुरेबाजांचा निभाव लागला नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोंड लपवून फिरण्याची पाळी आली आहे. १६ तारखेनंतर मुंबई-ठाण्यात शिवसेनेचा दारुण पराभव होईल, शिवसेना त्यानंतर इतिहासजमा होईल. शिवसेनाप्रमुखांचे अस्तित्व नष्ट होईल अशा ‘फाका’ चव्हाणांनी मारल्या. त्या चव्हाणांतला ‘च’ काढून ‘व्हाण’ त्यांच्याच थोबाडावर मारण्याचा पराक्रम मुंबई-ठाण्याच्या जनतेने केला. कुठे आहेत ते मुख्यमंत्री? आता तोंड लपवून फिरण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. शिवसेना नष्ट होईल अशा वल्गना करणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच नष्ट झाले. मुंबई-ठाण्याच्या जनतेने हे करून दाखविले. तिला लाख लाख धन्यवाद. कोणी किती जागा जिंकल्या व गमावल्या याची आकडेमोड,
बेरीज-वजाबाक्या ज्यांना करायच्या आहेत त्यांना करू द्या. जय-पराजयाची विश्‍लेषणेही ज्या पोटावळ्यांना करायची असतील त्यांना करू द्या, पण शिवसेनाद्वेषाचा कोणाला कितीही मुरडा झाला तरी मुंबई-ठाण्यावर फडकणारा शिवरायांचा भगवा कुणाला उतरवता आला नाही. भगव्यास हात लावायला निघालेले खाक झाले.
भगव्याची शान वाढलीआहे. मराठी जनांचा अभिमान तळपला आहे. कृपाशंकर सिंह यांच्यासारख्या उपर्‍यांना मुंबईचा लचका तोडायचा होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची असेल तर आधी मराठी माणसांचे वर्चस्व मोडायचे. मराठी माणसाचे वर्चस्व मोडण्यासाठी शिवसेनेचा पराभव मुंबई-ठाण्यात करायचा हे कृपाशंकरांचे स्वप्न यावेळीही धुळीस मिळाले. झारखंड घोटाळ्यातला भ्रष्ट पैसा मुंबईत शिवसेनेच्या पराभवासाठी धो धो वापरण्यात आला. त्या पैशांच्या लाटेत कृपाशंकरांची कॉंग्रेस गटांगळ्या खाताना दिसत आहे. असे शंभर कृपाशंकर मुंबईत उतरले तरी शिवसेनेचा पराभव त्यांना करता येणार नाही. शिवसेनेने प्रचंड कामे केली. मुंबई - ठाण्यातील जनतेला विश्‍वास आणि आधार दिला. लोकांना इतक्या वर्षांनंतरही शिवसेना आपली वाटते हेच शिवसेनेचे यश आहे. जनतेचे इमान भगव्याशी आहे व भगवा शिवसेनेच्या हातात आहे. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून, मराठी माणसांच्या संघर्षातून मुंबई मराठी माणसाला मिळाली त्या मुंबईचे रक्षण करण्याचे काम सदैव शिवसेनेने केले. शिवसेनेचा पहिला भगवा ठाण्यावर फडकला. तो या निवडणुकीतही कायम राहिला. शिवसेनेला मुळासकट उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न पाहणारे आतापर्यंत काय कमी झाले? ते सर्वच्या सर्व नामशेष झाले हाच इतिहास आहे. त्या इतिहासात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कृपाशंकर नामक गांडूळही ‘जमा’ झाले. मुंबई-ठाण्याशिवाय उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती आणि अकोला या महापालिका तसेच २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक झाली. त्या त्या ठिकाणचे लागायचे ते निकाल लागले आहेत. त्याचेही विश्‍लेषण करणारे करतीलच. २७ जिल्हा परिषदा-पंचायत समित्यांचा विचार केला तर त्यातील बहुतेक ठिकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचीच सत्ता पूर्वापार होती. त्यामुळे तेथील निकाल त्यापद्धतीनेच लागले तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. मात्र यानिमित्ताने सत्ताधारी आघाडीने काही ठिकाणी जे तोडफोडीचे,
मोडतोडीचे राजकारणअत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केले त्याला तेथील जनतेने सणसणीत प्रत्युत्तर दिले हे लक्षात घेण्यासारखे आहे. विशेषत: बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांचे भाऊ पंडितअण्णा मुंडे यांनी बांधलेले राष्ट्रवादीचे घड्याळ मतदारांनी पार उचकटून फेकून दिले. एवढेच नव्हे तर परळी आणि अंबाजोगाई पंचायत समित्यांवरही भाजपचा पर्यायाने गोपीनाथ मुंडेंचाच पूर्ण वरचष्मा राहिला. धाराशीव जिल्ह्यात अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांना मतदारांनी ‘हबाडा’ दिला. पद्मसिंह पाटील यांचे भाचे अमोल पाटोदेकरांनाही पराभव स्वीकारावा लागला. नांदेडमध्ये तरुण शिवसैनिकांनी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्षाला घरचा रस्ता दाखवला. हिंगोली आणि जालना जिल्हा परिषदांवर तर शिवसेनेचा भगवाच फडकला आहे. त्यातही हिंगोलीमध्ये शिवसेनेने २७ जागा मिळवून एकहाती स्पष्ट बहुमत मिळविले आहे. तिकडे पुण्यातही महापौर मोहनसिंग राजपाल पराभूत झाले. पिंपरी-चिंचवडप्रमाणेच पुण्यात एकहाती सत्ता मिळविण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले. मात्र आता पुण्यात ‘पंजा’शीच हातमिळवणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जिल्हा परिषदा-पंचायत समित्यांमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीने बर्‍यापैकी सत्ता राखली असली तरी जनतेने त्यांना जमिनीवर आणले आहे. मुंबई-ठाण्यात जनतेने विकासाला मते दिली. त्यामुळे शिवसेनेने काय केले? असे विचारणार्‍यांचे थोबाडच फुटले. शिवसेना-भाजप-रिपाइं ही मनापासून झालेली महायुती होती. यात एकमेकांविषयी दुरावा नव्हता की द्वेष नव्हता. कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले जाहीरपणे एकमेकांचे वस्त्रहरण करीत होते आणि दुसरीकडे ‘आम्ही दोघे भाऊ भाऊ’ म्हणून मतांची भीक मागत होते. त्या राजकीय भिकारड्यांना जनतेने सर्वत्रच ठोकरून लावले. अखेर महाराष्ट्राच्या राजधानीतला पालापाचोळा उडून गेला. शिवसेनेचा ‘भगवा’ डौलाने फडकला. त्या भगव्यास मानाचा मुजरा!

Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.