प्रत्येकाच्या पाठीवर हात ठेवून कुसुमाग्रज लढायला सांगायचे. म्हणूनच रोजीरोटीच्या लढाईत श्वास कोंडलेली खूप माणसे कुसुमाग्रजांकडे येत व जगण्याची ऊर्मी घेऊन जात असत.
कशास आई, भिजविसि डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
मृत्यूच्या दारात पाऊल टाकतानाही जे देशभक्त अढळ असतात त्यांच्या "क्रांतीचा जयजयकार' पेरणारे ज्ञानपीठ पुरस्कारविजेते वि. वा. शिरवाडकर तथा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज समारोप होत आहे. "युगामागुनी चालली युगे ही, किती करावी भास्करा वंचना,' असे पृथ्वीचे प्रेमगीत गाणाऱ्या कुसुमाग्रजांनी माणसांच्या मनामनांमध्ये प्रीतीची ज्योत जागविली आहे. त्यामुळे त्यांची कविता, त्यांचे साहित्य शताब्दीच्या कालमर्यादांच्या पलीकडचे आहे. नित्यनूतन आहे. आज शताब्दीच्या समारोपातही तात्यासाहेबांची कविता माणुसकीच्या वाटेवर मानव्याची पूजा करण्यासाठी सचेतन, प्रवाही होत निघाली आहे. मुळात तात्यासाहेब केवळ शब्दांना प्रसवणारे, शब्दांमध्ये अडकणारे नव्हते, तर साहित्य व माणसाचे जीवन हातात हात घालून कसे पुढे जाऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आपल्या साहित्यसंपदेतून व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या वागण्या, वावरण्यातून घालून दिला. मराठी साहित्याच्या विश्वामध्ये कुसुमाग्रज आपल्या तेजस्वी प्रतिभेने तळपत राहिले. "गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार' हे क्रांतिसूक्त त्यांनी मुक्तकंठाने गायले. शब्दांमध्ये कधी अंगार ओतत त्यांनी मराठी सारस्वताचे डोळे दिपविले, तर कधी नावाप्रमाणेच अतिशय कुसुम व कोमल शैलीने आपली मुद्रा उमटविली. नाटक, कविता, कथा, कादंबरी असे वाङ्मयाचे विविध प्रांत त्यांनी समर्थपणे पादाक्रांत केले. अनेक राज्य पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्षपद या सर्वांवरचा कळस म्हणजे 1988 मध्ये त्यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार. अशी ज्यांच्या कर्तृत्वाची गाथा होती ते कुसुमाग्रज, काळाच्या पडद्याआड गेले असले तरी शतकानंतरही मराठी माणसांच्या मनात अढळस्थानी आहेत. ज्यांना त्यांचा सहवास मिळाला, त्या सर्वांसाठी तर त्यांच्या नुसत्या आठवणीदेखील आनंदपर्वणी आहे.
उभारीच्या काळात आपल्या शब्दकाव्यातून क्रांतीचा जयजयकार केला, तेच कुसुमाग्रज अनेकदा बदलत्या सामाजिक संदर्भात पुढे अस्वस्थही होत गेले. भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाल्याच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेली "स्वातंत्र्यदेवीची विनवणी' असा काही फटका आहे, की त्यातून संवेदनशील मनाला खडबडून जागेच व्हावे लागेल. मायमराठी मरत असताना परकीचे पद चेपणाऱ्यांवर कुसुमाग्रजांनी कोरडे ओढले. जातींचे जहर हटविण्यासाठी हा कवी समाजाला पुकारत राहिला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या कवीचे समाजासाठी अखंड राबणाऱ्या कार्यकर्त्यांत लढाऊ रूपांतर होऊन गेले. त्यामुळेच कुसुमाग्रज हे नाशिककरांचे ग्रामदैवत व तमाम मराठी माणसांचे स्फूर्तिस्थान बनून गेले. कुसुमाग्रज यांचे घर म्हणजे त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक माणसाला मंदिराच्या गाभाऱ्यापलीकडचेही आनंदनिधान होता. ओळखीचा असो वा नसो, प्रत्येकासाठी ते आत्मीयतेचे अत्युच्च शिखर होते. स्वतःचा वाढदिवस स्वतः कधीच साजरा न करणारे कुसुमाग्रज, आदिवासींच्या पाड्यावर जाऊन त्यांची दुःखे पाहत. ती दूर करण्याचे प्रयत्न करत. दुःखाची सामिलकी करत. सहभागी हा शब्द त्यांना कधी आवडायचा नाही. ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने मिळालेल्या रकमेचेच प्रतिष्ठान करणारे कुसुमाग्रज पुढे समाजाचे शिल्पकार बनून गेले. गोदातीरावर थंडीत कुडकुडणाऱ्या भिकाऱ्यांच्या अंगावर भर थंडीत स्वतः मध्यरात्री जाऊन गोधड्या पांघरणारे कुसुमाग्रज "आहे रे व नाही रे'मधील दरी कमी करण्याचे काम करत होते. वाचन संस्कृती वाढावी म्हणून फिरत्या वाचनालयांचा आग्रह धरत होते. त्यांचे साहित्य व त्यांचे व्यक्तिगत जीवन हातात हात घालून मराठी माणसांच्या विकासाचे स्वप्न पाहत होते. कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीचे सोहळे करताना समाज व शासनावर मोठी जबाबदारी आहे. ज्या निगर्वीपणाने, साधेपणातून कुसुमाग्रजांनी आपल्या कृतीमधून सामान्य माणसांना जिंकून घेतले होते, तोच सामान्य माणूस मध्यवर्ती ठेवून कुसुमाग्रजांच्या आठवणी जाग्या ठेवाव्या लागतील. एखाद्या बगीच्याला, फुलपाखरू उद्यानाला कुसुमाग्रजांचे नाव देण्याचे सोहळे उरकले जात असतील व पुढे ते बगीचे उद्ध्वस्त होऊन जाणार असतील तर काय उपयोग? स्थानिक खासदारांच्या पाठपुराव्यामुळे जन्मशताब्दीचे औचित्य साधून नाशिक, मुंबई रेल्वेला कुसुमाग्रज एक्स्प्रेस नाव देण्याची घोषणा झाली. मात्र, जन्मशताब्दीचे वर्ष संपले तरी कुसुमाग्रज एक्स्प्रेस अजून काही धावली नाही. अशा अस्वस्थतेच्या वळणावर ती कधी धावणार, हा प्रश्न आहे. ज्या महाकवीने माणुसकी वाढविण्याचे कार्य केले, त्यांची आठवण जपण्यासाठी समाजजीवनात वाढत असलेल्या काळोखात तेजाची लेणी खोदण्यासाठी साहित्य, समाज आणि माणूस यांच्यातील धागा गच्च करावा लागेल.