
संसदेची प्रतिष्ठा
भारतीय लोकशाहीची सार्वभौम संस्था असलेल्या संसदेची प्रतिष्ठा केजरीवाल यांच्या आरोपांनी कलंकित झाली की नाही, याचा निर्णय त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव संसदेत दाखल झाल्यास ठरेल. भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, समाजवादी पक्षासह बहुतांश पक्षाच्या नेत्यांनी केजरीवाल यांनी हे भडकावू वक्तव्य करून संसदीय लोकशाहीत मिळालेल्या मूलभूत हक्कांचा मर्यादाभंग केल्याचा आरोप केला. अण्णा हजारे यांच्या लोकसंघटनेतले लोक विचारहीन आहेत, ते फक्त सरकार आणि लोकप्रतिनिधींना शिवीगाळ करतात, जनतेत त्यांना आधार नाही, हिंमत असेल तर त्यांनी निवडणुका लढवाव्यात, अशी आव्हानेही काही नेत्यांनी दिली. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते रामकृपाल यादव यांनी, केजरीवाल यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी केली. त्यांना वेड्याच्या रुग्णालयात पाठवायला हवे, असेही ते म्हणाले. लालूप्रसादांना केजरीवाल यांची टीका झोंबणे अपेक्षित होतेच. चारा घोटाळ्यात अडकलेले लालू लोकप्रतिनिधी कायद्यातल्या पळवाटांचा लाभ घेवून लोकसभेवर निवडून येतात, आपल्याला जनताच निवडून देते, असेही सांगतात. केंद्रातल्या या पूर्वीच्या सरकारमध्ये ते रेल्वे मंत्रीही होते. संसदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करायचा इशारा जाहीरपणे दिल्यावरही केजरीवाल मात्र मुळीच मागे हटायला तयार नाहीत. आपण सत्यच बोललो आणि यापुढेही तेच सांगणार, असा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी संसदेतल्या कलंकित खासदारांच्या चारित्र्याचा पंचनामा केला. काही राज्य सरकारांनी केलेल्या भ्रष्टाचाराची लक्तरेही त्यांनी चव्हाट्यावर टांगली. संसदेत 162 खासदारांवर विविध आरोपाखाली न्यायालयात खटले सुरु आहेत, ही बाब काही लपून राहिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. पण, सरसकट सर्वच खासदार कलंकित प्रतिमेचे नाहीत. एक तृतियांश खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असले तरीही दोन तृतियांश खासदार स्वच्छ प्रतिमेचे आहेत, हे केजरीवाल यांनाही माहिती आहे. पण, सरसकट त्यांनी सर्वच खासदारांची बदनामी होईल, अशा पध्दतीने केलेले वक्तव्य सवंग लोकप्रियता मिळवणारे असले तरी, ते संसदेचीही बदनामी करणारे ठरते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना निवडणुकीत मतदारांनी पराभूत करावे, लोकशाहीचे शुध्दिकरण करावे, या त्यांच्या आवाहनाला कुणाचाही आक्षेप असायचे कारण नाही. पण, त्यांनी संतापाच्या भरात संसदेवरच तोफ डागून, सार्वभौम मतदारांचाही अवमान केला, ही बाबही लोकशाहीला मारक ठरते. साप साप म्हणून भुई धोपटण्यापेक्षा फक्त सत्याचाच आधार घेत लोकजागृतीसाठी त्यांनी प्रचार मोहीम राबवायला हवी. त्यांच्या या चिथावणीखोर आणि आगलाव्या वक्तव्याने नवा राजकीय संघर्ष सुरु होईल आणि त्यांचा लोकशाहीच्या शुध्दिकरणाचा मूळ हेतूच बाजूला पडेल, याचे भान त्यांना राहिलेले नाही. या असल्या आरोपांनी सरकार आणि राजकीय पक्षावर फारसा परिणाम होणार नाही. कॉंग्रेस, भारतीय जनता पक्षासह बहुतांश राजकीय पक्ष लोकशाहीची गुन्हेगारी राजकारणापासून मुक्तता झाली पाहिजे, अशी भाषणे जाहीर प्रचारसभात करीत असले तरी, त्यांचे खायचे दात वेगळेच आहेत. सत्तेच्या राजकारणात गुरफटलेल्या या पक्षांना लोकशाहीचे शुध्दिकरण करायसाठी, लोकप्रतिनिधी कायद्यात बदल घडवायची हिंमत होत नाही. राजकारण्यांना अंगावर घेण्यापेक्षा बिरबलाच्या धूर्त धोरणाचा स्वीकार करून, पोपट मेल्याचे त्यांनी दुसऱ्या पध्दतीने सांगायला हवे होते.
http://www.dainikaikya.com/20120228/4805588877376365661.htm