News Update :

तिसर्‍या महायुद्धाचे ढग!

Thursday, February 16, 2012


अमेरिका आणि इराणमध्ये सुरू झालेले शाब्दिक युद्ध असेच सुरू राहिले तर ते खर्‍याखुर्‍या युद्धात परावर्तित होण्यास वेळ लागणार नाही. 

तिसर्‍या महायुद्धाचे ढग!
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाने जगभरातील देशांना काळजीत टाकले आहे. इराणी राज्यकर्त्यांना तर जणू युद्धाची खुमखुमीच आली आहे. इराणच्या आक्रमक हालचालींवरून तरी तसेच दिसते आहे. बुधवारी इराणने डांगोरा पिटून जाहीर केले की, ‘इराणने स्वबळावर अणुतंत्रज्ञान विकसित केले आहे’. कोणत्याही देशाची मदत न घेता अणुभट्ट्यांमध्ये इंधन भरल्याचेही इराणने जगाला सांगितले. वास्तविक इराणचे हाडवैरी असलेल्या इस्रायल आणि अमेरिकेने इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. इतकेच काय, मागील महिन्यात त्या देशाच्या मुस्तफा अहमदी रोशन या प्रमुख अणुशास्त्रज्ञाची हत्या करण्यात आली. यापूर्वीही इराणच्या तीन अणुशास्त्रज्ञांची हत्या करण्यात आली. इराणी अणुकार्यक्रम रोखण्यासाठीच अमेरिका आणि इस्रायलने शास्त्रज्ञांच्या हत्या घडवल्याचा इराणचा आरोप आहे. इराणने आपला अणुकार्यक्रम थांबवावा यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचाही दबाव होता. हिंदुस्थानही याच परिस्थितीतून गेला आहे. वाजपेयी सरकारच्या काळात हिंदुस्थानने १४ मे १९९८ रोजी पोखरणमध्ये दुसर्‍यांदा अण्वस्त्र चाचणी घेतली तेव्हादेखील संयुक्त राष्ट्रसंघ आणि युरोपियन देशांनी आपल्या देशावर निर्बंध लादले होते. जगभर फुकट फौजदारकी करणार्‍या अमेरिकेने तर सर्वाधिक आदळआपट केली. हिंदुस्थानला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. तोच अनुभव आता इराण घेत आहे, पण हा सर्व विरोध झुगारून इराणचे राष्ट्राध्यक्ष अहमदिनेजाद यांनी त्यांचा अणुकार्यक्रम यशस्वी करून दाखवलाच. इथपर्यंत सगळे ठीक होते, पण ही घोषणा करतानाच इराणच्या कट्टरपंथी राष्ट्राध्यक्षांनी 
अमेरिकेला खुले आव्हान 
दिल्याने उभय देशांतील तणाव वाढला आहे. अमेरिकेने तर जगभरातील देशांनी इराणसोबतचे संबंध तोडावेत असे फर्मानच काढले. त्याला तेवढ्याच कडक भाषेत उत्तर देताना इराणने युरोपियन देशांचा तेलपुरवठा बंद करण्याची धमकी दिली. इराण हा जगातील एक आघाडीचा तेल उत्पादक देश आहे. हिंदुस्थान, पाकिस्तानसह जगभरातील अनेक देशांना इराणकडूनच तेलपुरवठा होतो. त्यामुळे इराणच्या नुसत्या धमकीनेच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे भाव वाढले. प्रत्यक्षात इराणने तसे पाऊल उचलले किंवा अमेरिकेशी युद्ध भडकले तर किती भयंकर तेलटंचाई निर्माण होईल या कल्पनेनेच जग चिंताक्रांत झाले आहे. तुम्ही अण्वस्त्रांची कोठारे बाळगता आणि इतर देशांचे अणुकार्यक्रम रोखता हा कुठला न्याय! आम्ही आता हे सहन करणार नाही अशा शब्दांत इराणने अमेरिकेला खडसावले. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू झालेले हे शाब्दिक युद्ध असेच सुरू राहिले तर ते खर्‍याखुर्‍या युद्धात परावर्तित होण्यास वेळ लागणार नाही. इराणचा ‘सख्खा’ शेजारी देश म्हणजे इस्रायल. इराण आणि इस्रायल यांचे हाडवैर जगजाहीर आहे. इस्रायलचे अस्तित्वच इराणला मान्य नाही. त्यामुळे इस्रायलचे नामोनिशाण मिटवणे हे आयातुल्ला खोमेनींपासून इराणच्या प्रत्येक कट्टरपंथीयाचे स्वप्न आहे. दिल्ली, बँकॉक येथे इस्रायलच्या दूतावास अधिकार्‍यांवर झालेले हल्ले त्याचेच द्योतक आहे. इराणच्या अणुशास्त्रज्ञांना ठार करण्यासाठी जो ‘फॉर्म्युला’ वापरण्यात आला तोच प्रयोग आता इस्रायलवर सुरू आहे. या घटनाही आगीत तेल ओतणार्‍या ठरू शकतात. अमेरिकेची भक्कम रसद आणि प्रखर राष्ट्रभावनेच्या जोरावर इस्रायलने आजपर्यंत शेजारच्या एकाही मुस्लिम देशाला डोके वर काढू दिले नाही. त्यामुळेच 
जगभरातील सर्व मुस्लिम देश 
आणि जगाच्या कानाकोपर्‍यातील कट्टर मुसलमान इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध ‘जिहाद’ करण्याच्या पवित्र्यात आहेत. आधीच इराकच्या लढाईत अमेरिकेचे तोंड पोळले आहे. अमेरिकेची ‘युद्धखोर’ ही प्रतिमा खुद्द अमेरिकन जनतेलाही पसंत नाही. त्यात मंदीमुळे आलेले आर्थिक संकट वेगळेच. या पार्श्‍वभूमीवर तवा गरम आहे म्हणून छोट्या इराणने फुरफुर सुरू केली असली तरी महाकाय अमेरिकेपुढे त्यांचा निभाव तो काय लागणार? इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आता कुठे पाळण्यात आहे आणि अमेरिकेच्या गोदामात १० हजार अणुबॉम्ब पडून आहेत. संपूर्ण पृथ्वी अनेक वेळा बेचिराख करण्याची क्षमता असणारी महासंहारक अस्त्रे अमेरिका बाळगून आहे. त्या जोरावरच ते जगभर दंडुके आपटत असतात. अर्थात टक्कर सोपी नाही हे समजण्याइतका इराणही दुधखुळा नाही. त्यामुळेच चीन, रशिया, उत्तर कोरियासारख्या अमेरिकेच्या कट्टर शत्रूंशी इराणने आधीच संधान साधले आहे. इराणवर अमेरिकेने कितीही निर्बंध लादले तरी हे तीन देश इराणच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. म्हणूनच उद्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाचा भडका उडालाच तर ते युद्ध केवळ दोन देशांपुरते असणार नाही. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, इटली, ऑस्ट्रेलिया हे ‘दोस्त’ राष्ट्र इस्रायलच्या बाजूने मैदानात उतरतील आणि चीन, रशिया, उत्तर कोरिया, ब्राझील हे देश इराणच्या बाजूने लढतील. फक्त ठिणगी पडायचाच अवकाश आहे. ढग तर दाटून आलेच आहेत. इराण-अमेरिका-इस्रायलमध्ये युद्धाचा भडका उडाला तर जगावर लादले गेलेले हे तिसरे महायुद्धच असेल! इराण-इराक युद्धात ९ लाख सैनिक मारले गेले. आधीच्या दोन महायुद्धांतही अपरिमित मनुष्यहानी झाली, तरीही तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने जगाची वाटचाल सुरू आहे. इराणची प्रक्षोभक भाषा म्हणजे खोमेनीचा वारसा सांगणारी ‘जिहादी’ मानसिकताच आहे. ती मान्य करण्यासारखी निश्‍चितच नाही. तथापि एक सार्वभौम राष्ट्र म्हणून इराणचे राष्ट्राध्यक्ष अहमदिनेजाद यांनी अमेरिकेवर डोळे वटारून राज्यकर्त्यांचा कणखरपणा दाखवला. पाकिस्तान, चीन आणि अमेरिकेसमोर सरपटणार्‍या आपल्या राज्यकर्त्यांनी यापासून काही बोध घेतला तर बरे होईल!
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.