मुंबईच्या जनतेने आधी कृपाशंकर यांचे धोतर सोडले व आता हायकोर्टाने त्यांच्या पेकाटात लाथ घालून त्यांना वठणीवर आणले.
कृपाशंकर गेले!
कॉंग्रेस पक्षाचे सन्माननीय, परम आदरणीय अशा कृपाशंकरांचा खेळ खलास झाला आहे. कृपाशंकर यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. कृपाशंकर यांची मालमत्ताही जप्त करण्यास सांगितले. त्यामुळे कृपाशंकर यांनी अखेर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडले आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, ‘कृपाशंकरांनी आधीच राजीनामा देऊन ठेवला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी राजीनाम्याचा काडीमात्र संबंध नाही!’ याचा अर्थ सामान्य पामरांनी काय घ्यायचा? कृपाशंकरांचा राजीनामा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे व उच्च न्यायालयाच्या ताशेर्यामुळे झालेला नसून कॉंग्रेसचा पराभव झाल्यामुळे नैतिकतेच्या मुद्यावर त्यांनी हा राजीनामा देऊन ठेवला होता व तोच आता स्वीकारला असे मुख्यमंत्र्यांना सुचवायचे आहे काय?. म्हणजे कॉंग्रेसचा पराभव झाला नसता तर हे भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे आरोप असलेले कृपाशंकर कॉंग्रेसला चालले असते. कॉंग्रेसची नैतिकता ही अशी आहे. मुंबईच्या जनतेने कृपाशंकरांचा दारुण पराभव आधी केला व आता उच्च न्यायालयाने त्यांचा पूर्ण कचरा केला. हा कचरा पदरी बाळगणे सध्या सोयीचे नाही म्हणून आधीच दिलेला राजीनामा आता स्वीकारला. कृपाशंकर यांच्याविषयी आम्ही पामरांनी काय बोलावे आणि लिहावे? कॉंग्रेस पक्षातील तो एक चमत्कारी आणि अवतारी बाबाच म्हणायला हवा. गेल्या काही वर्षांपासून या महाशयांचे मुंबईतलेच नव्हे तर कॉंग्रेसच्या राजकीय वर्तुळातील स्थान का व कसे वाढले? हे एकतर अहमद पटेलांना माहीत किंवा रॉबर्ट वडेराला माहीत! मुंबईत कांदे-बटाटे विकायला उत्तर प्रदेशातून आलेला हा माणूस मुंबई कॉंग्रेसचा मालक व दिल्लीतील अनेक बड्या कॉंग्रेस नेत्यांचा पालक बनला. कोणताही मुख्यमंत्री येऊ द्या. त्या
मुख्यमंत्र्याच्या गळ्यातले मंगळसूत्र
म्हणूनच या महाशयांचा वावर असे व मुख्यमंत्रीही अगदी अभिमानाने हे मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवत असत. मुख्यमंत्र्याच्या मागे किंवा पुढे स्वत:ला ‘मॅनेज’ करून प्रत्येक फोटोत दिसण्याची कला व किमया फक्त हेच महाशय जाणोत. आता मुंबईच्या हायकोर्टाने कृपाशंकरांचे जे वस्त्रहरण केले ते पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मंगळसूत्र त्यांच्या पदराखाली लपवून ठेवतात की हळूच काढून मुंबईच्या मिठी नदीत अदृश्य करतात तेच पाहावे लागेल. मुंबईवर फडकणार्या भगव्याची या व यांच्यासारख्या इतरांना जी ऍलर्जी होती ती पाहिली की तळपायाची आग नुसती मस्तकात जात असे. इकडे मुंबईत सगळ्यांसमोर झुकायचे, चरणस्पर्श करायचे आणि तिकडे दिल्लीत किंवा उत्तर प्रदेशात जाऊन ‘मुंबईत शिवसेना किंवा मराठी माणसाला संपविणे हेच आपले अवतार कार्य’ असल्याचे सांगायचे. पैसा व सत्ता, सत्तेतून पुन: पुन्हा पैसा हे तंत्र कॉंग्रेस पक्षात कृपाशंकर यांनी स्वीकारले. त्याचवेळी मुंबईतल्या थैल्या त्यांनी दिल्लीतील त्यांच्या मायबापांच्याही चरणी अर्पण केल्या. परिणामी भ्रष्टाचार, झारखंड खाण घोटाळ्याच्या गर्तेत अडकूनही या महाशयांना अभय मिळत राहिले. झारखंडच्या खाण घोटाळ्यात तेथील माजी मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री पूर्ण अडकले. मधू कोडा तर आजही तुरुंगात आहेत, मात्र या घोटाळ्याशी कृपाशंकर यांचा थेट संबंध व पुरावे समोर येऊनही त्यांच्यापर्यंत ना सीबीआयचे हात पोहोचले ना पोलिसांचे. अनेकदा तपास अधिकार्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. झारखंड खाण घोटाळ्यात मधू कोडा आत गेले मग कृपाशंकर मोकळे कसे? त्यांच्याभोवती कोणाची कवचकुंडले आहेत? व त्यांना वाचविण्याचा प्रयत्न कोण करीत आहेत? असे प्रश्न आम्ही मुंबई महानगरपालिका प्रचारात उभे केले. कृपाशंकर यांचा भ्रष्टाचार व गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला तेव्हा हा आपल्या बदनामीचा कट असल्याचे सांगून या महाशयांनी
‘सामना’वरच वकिली नोटीस
बजावून दहा कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची धमकी दिली. अर्थात ‘सामना’ अशा अग्निदिव्यातून अनेकदा सहीसलामत बाहेर पडला आहे. कृपाशंकरांनी त्यांची वळवळणारी जीभ टाळ्याला लावीत अशीही मखलाशी केली की, ‘माझ्यावरील भ्रष्टाचार-गैरव्यवहाराचे आरोप खोटे असून माझ्याकडे संपत्तीच नाही. मी माझी संपत्ती शिवसेनाप्रमुखांच्या नावावर करतो, शिवसेनाप्रमुखांनी त्यांची संपत्ती माझ्या नावावर करावी!’ व्वा! आव्हान तर चांगले आहे, पण तुमची पापाची कमाई तुमच्याजवळच राहू द्या. त्याच पापाच्या संपत्तीवर कोर्टाने जप्ती आणली. आता कृपाशंकर काय करणार व काय बोलणार? माझी संपत्ती जप्त करण्याचा आदेश म्हणजे माझ्या बदनामीचा कट असून बदनामी करणार्या हायकोर्टावर मी १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकीत आहे असे ते सांगणार आहेत काय? कृपाशंकर हे ज्या वेगाने शिखरावर गेले त्यापेक्षा दुप्पट वेगाने त्यांचे अध:पतन झाले. मुंबई व मराठी माणसांच्या मुळावर येणार्यांना कधीच सुख लाभत नाही व त्यांचे भलेही होत नाही. कृपाशंकर यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचेच स्वप्न अलीकडे पडत होते आणि त्यांच्या स्वप्नाच्या झाडास भ्रष्ट पैशांचे खतपाणी घातले जात होते. कृपाशंकर यांच्याप्रमाणे अनेक उत्तर हिंदुस्थानी मुंबईत रोजी-रोटीसाठी आले. त्या सगळ्यांनाच कृपाशंकर होता आले नाही. कृपाशंकर यांनी जे केले व करण्याचा प्रयत्न केला ते सर्वच प्रकार नैतिकतेत बसणारे नव्हते. आमचे कृपाशंकरांशी व्यक्तिगत वाकडे असण्याचा प्रश्न नाही, पण मुंबई-ठाण्यातील उत्तर हिंदुस्थानींना मराठी माणसांविरुद्ध भडकवून त्यांना वेगळे पाडण्याचा प्रयत्न त्यांनी सतत केला. हिंदी भाषिकांच्या जोरावर त्यांचे राजकारण सुरू होते. दिल्लीच्या आशीर्वादाने त्यांचे इतर धंदे बहरले होते. मुंबईच्या जनतेने आधी कृपाशंकर यांचे धोतर सोडले व आता हायकोर्टाने त्यांच्या पेकाटात लाथ घालून त्यांना वठणीवर आणले. हे कधी तरी घडणारच होते. कृपाशंकर पदावरून गेले याबद्दल मुंबईतला हिंदी भाषिक रिक्षावालाही हळहळणार नाही.
http://www.saamana.com/