पुण्याला ‘विद्येचे माहेरघर’ म्हणण्याची पद्धत आहे. पुण्यात पद्म पुरस्कार मिळालेल्यांची संख्या मोठी आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था आहेत. अशा पुण्यात भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांचे ‘विज्ञानदिनी’ आयोजिलेले भाषण कशामुळे गाजले? संयोजक असलेल्या आघारकर संशोधन संस्थेने शिवसेनेच्या नेत्यांना असे लिहून दिले, की ‘जैतापूरच्या प्रकल्पाबद्दल डॉ. काकोडकर काहीही बोलणार नाहीत.’ याचा अर्थ काय होतो? काकोडकरांसारख्या शास्त्रज्ञाला जैतापूरविषयी मतच व्यक्त करण्यावर स्वयंघोषित बंदी शिवसेनेने लादल्यानंतर आयोजक संस्थेने लेखी हमी देऊन पुण्याची आणि भारताची संस्कृती वाढविली की मागे ओढली? काकोडकरांची मते आघारकरसारख्या संस्थेला माहीत नाहीत, असे असण्याची सुतराम शक्यता नाही. जैतापूरवर बोलण्यासाठी काकोडकरांना निमंत्रित केल्यानंतर दबावाला शरण जाऊन भलतीच भूमिका घेणे हा समाजावर गंभीर परिणाम करणारा दीर्घकालीन सांस्कृतिक पराभव आहे. काकोडकरांची अथवा शिवसेनेची भूमिका हा चर्चेचा विषय असू शकतो; परंतु क्रिकेटचे मैदान उखडणे, चित्रकारांच्या कलाकृतींची मोडतोड करणे, वर्तमानपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले करणे अशी अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी करणारी अनेक कामे शिवसेनेने केली आहेत. त्यावर बरीच चर्चा झाली आणि होत असते. कारण, मत व्यक्त करण्याचा अधिकार भारताच्या घटनेने प्रत्येकाला दिला आहे, मत मांडण्याचे स्वातंत्र्य कायद्याने दिले आहे. त्याची गळचेपी म्हणजे कायदा मोडण्याचाच प्रकार आहे. काकोडकर त्यांची मते मांडत असतात. त्याचा कदाचित सरकारला फायदा होत असेलही; परंतु आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आण्विक कार्यक्रमाबद्दल भारतावर लादलेली जागतिक अस्पृश्यता दूर करण्यासाठी ज्यांनी ४४ देशांच्या यंत्रणांना हाताळले, त्यांचा सरकार वापर करून घेत आहे, अशा प्रकारची शेरेबाजी कोणत्या दर्जाची मानायची? काकोडकरांची भूमिका बरोबर आहे की चूक, याबद्दल मतभेद असू शकतात. केवळ मतभेद आहेत किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, या आधारावर चित्रपटापासून व्याख्यानापर्यंतचे कार्यक्रम रोखले जात असतील, तर पुण्यात झालेला बिघाड कोणत्या पातळीवर गेला आहे, याचा विचार झाला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा शाळा काढली, तेव्हा त्यांच्यावर ज्याप्रकारचे हल्ले झाले त्यात आणि काकोडकरांनी कोणत्या विषयावर बोलू नये, याचा निर्णय आघारकर संशोधन संस्थेने घेणे यात गुणात्मक फरक काय? सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही, असाही प्रश्न यामुळे पुढे आला आहे. तुमच्या देशाचे अणुऊर्जाक्षेत्रात आंतरराष्ट्रीय नेतृत्व करणार्या शास्त्रज्ञाशी आमचे गंभीर मतभेद आहेत; पण आम्ही ते लोकांच्या विचारासाठी मांडतो, अशी भूमिका घेण्याऐवजी दमबाजी करण्याने मूळ प्रकल्पाचा विषय बाजूला पडतो. लोकांनी विचारच करू नये, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करणे सोपे जाते. त्यातच आयोजक संस्था आणि सरकार हे बघ्याची भूमिका घेणार असतील, तर अशा झुंडशाहीला सत्तेचाही पाठिंबा आहे, असाच अर्थ सामान्य माणसापर्यंत पोहोचतो. विचार आणि प्रचार यांतील अंतर पुसले जाते.
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=EditorialEdition-16-1-28-02-2012-f3a30&ndate=2012-02-29&editionname=editorial


