News Update :

‘चिं. चू’ ऊर्फ चिदंबरम चुकले!

Monday, February 20, 2012




चिदंबरम, राजकारणात येण्याची चूक केली नसती तर तुम्हालाही काही फायदे झाले असते. ‘लुंगीपुचाट’ गृहमंत्री हे बिरुद तुम्हाला मिळाले नसते.
‘चिं. चू’ ऊर्फ चिदंबरम चुकले!राजकारणात येऊन चूक केली अशी उपरती म्हणे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना झाली आहे. या चुकीचा पश्‍चाताप होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आगरतळा येथील एका टेनिस कोर्टच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना चिदंबरम यांना त्यांच्यातील दबलेल्या टेनिसपटूची आठवण झाली आणि त्यांनी ही कबुली दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीच्या काळात ते एक उत्तम टेनिसपटू होते. त्या खेळावरच लक्ष केंद्रित केले असते तर कदाचित एक नामांकित टेनिसपटू म्हणून आपण जगासमोर आलो असतो. ही खंत म्हणा किंवा अधुरे स्वप्न चिदंबरम यांनी स्वत:च बोलून दाखविले असल्याने ते खरेच मानायला हवे. त्यांनी टेनिस कोर्टला रामराम करण्याची चूक केली नसती तर आज जे चिदंबरम एका हाताने फायली आणि दुसर्‍या हाताने लुंगी सावरत संसदेच्या आवारात चालताना दिसतात तसे दिसले नसते. टेनिस कोर्टवर दमदार ‘रॅली’ करणारे चिदंबरम जगाला बघायला मिळाले असते. कुणी सांगावे, अमृतराज बंधू आणि सध्याचे पेस-भूपती यांच्या दरम्यानची पोकळी पी. चिदंबरम या नावाने भरून निघाली असती. मात्र एका गाफील क्षणी त्यांच्याकडून ‘चूक’ झाली. ते हिंदुस्थानी राजकारणाच्या ‘क्ले’ कोर्टवर आले आणि इतरांप्रमाणे त्यांचेही पाय मातीचे झाले. पुढे मजल दर मजल करीत ते कॉंग्रेस नावाच्या ‘ग्रास’ कोर्टवर आले. कॉंग्रेस गवत त्यांच्याही अंगवळणी पडले. त्याचेच बक्षीस म्हणून आधी अर्थखाते आणि आता गृहखाते त्यांना मिळाले. हा संपूर्ण काळ कदाचित त्यांना एखाद्या ‘ग्रॅण्ड स्लॅम’सारखा वाटला असावा. त्यामुळेच दिल्लीतील मीडियाच नव्हे तर विरोधी पक्षांसह स्वपक्षीयही त्यांच्या खिजगणतीत राहिले नाहीत. सगळेच बिनदिक्कतपणे सुरू असल्याने टेनिसमध्ये करीअर केले नाही हे योग्यच केले असे कदाचित चिदंबरम महाशयांना आतापर्यंत वाटत होते. मात्र अर्थमंत्रीपदाच्या काळात २जी स्पेक्ट्रम महाघोटाळ्यात त्यांनीही काही ‘फटके’ मारल्याचा आरोप झाला. विद्यमान अर्थमंत्री प्रणवदांच्या काही बिनतोड ‘सर्व्हिसेस’मुळे चिदंबरम यांच्यावर ‘गेम पॉइंट’ गमावण्याची वेळ आली. सुब्रमण्यमस्वामी यांनी याप्रकरणी केलेल्या कोर्टबाजीतही त्यांना कसाबसा ‘ऍडव्हाण्टेज’ मिळाला आणि ते महाघोटाळ्यात सहआरोपी होता होता राहिले. अर्थात सर्वोच्च न्यायालयातील ‘रॅली’ अद्याप बाकी आहे. त्यामुळे आणखी बराच काळ चिदंबरम यांना दम टिकवावा लागणार आहे. कदाचित त्यामुळेच त्यांना राजकारणात येण्याची ‘झक’ उगाच मारली असे आता वाटत असावे. चिदंबरमजी, आपल्याला आज जे सत्य उमगले ते या देशातील सच्च्या नागरिकांना, निदान हिंदूंना तरी खूप आधीच कळले होते. कारण जर तुम्ही टेनिसचेच रॅकेट हातात धरले असते तर तुमच्या अर्थमंत्रीपदाच्या काळात देशाच्या नागरी बँकांची, ग्रामीण अर्थकारणाची जी घडी विस्कटली ती कदाचित विस्कटली नसती, २जी स्पेक्ट्रमसारखा महाघोटाळा झाला नसता आणि देशाचे पावणेदोन लाख कोटी वाचले असते. हिंदूंना त्यांच्याच देशात ‘भगवा दहशतवाद’ या नावाने हेटाळणी सहन करावी लागली नसती. चिदंबरम, तुम्ही राजकारणात येण्याची चूक केली नसती तर तुम्हालाही काही फायदे झाले असते. ‘लुंगीपुचाट’ गृहमंत्री हे बिरुद तुम्हाला मिळाले नसते. स्पेक्ट्रम घोटाळ्यातील ‘सहआरोपी’ या संशयाचे भूत तुमच्या मानगुटीवर बसले नसते, पण करणार काय? तुम्ही ती चूक केलीत, तुम्ही म्हणता तशी अवदसा तुम्हाला आठवली. कॉंग्रेजी राजकारणाचे गजकर्ण तुम्ही स्वत:च लावून घेतले. आता म्हणे तुम्हाला पश्‍चाताप झाला आहे. उपयोग काय? तुमचे ठीक आहे हो ‘चिं. चू’ ऊर्फ चिदंबरम चुकले, चूक तुमची आहे, पण तिचे प्रायश्‍चित्त भोगावे लागणार आहे ते येथील जनतेला त्याचे काय?
चेंगराचेंगरीचा शाप!गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यात शिवरात्रोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत आठ भाविकांचा मृत्यू झाला आहे. भावनाथ मंदिरात हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. गुजरातमधील हे एक महत्त्वाचे शिवमंदिर मानले जाते. त्यामुळे दर महाशिवरात्रीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. सोमवारीदेखील लाखभर भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी रात्री ब्रेक निकामी झालेली एक बस गर्दीत शिरली आणि चेंगराचेंगरी होऊन आठ निष्पाप जीव दगावले. भावनाथ मंदिर हे गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पंचनाका पूल हा एकच रस्ता आहे. साहजिकच तेथे भाविकांच्या वाहनांची प्रचंड गर्दी होऊन वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. त्यात भाविकांचा ओघही थांबत नव्हता. वाहतूक कोंडी आणि भाविकांचा ओघ याचे नियमन आणि नियंत्रण करण्याची कुठलीच व्यवस्था नसल्याने व्हायचे तेच झाले. चेंगराचेंगरीत आठ जण हकनाक मरण पावले तर तीसपेक्षा अधिक जखमी झाले. देशभरातील धार्मिक स्थळी गेल्या दहा वर्षांत झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त भाविकांचा बळी गेला आहे. या सर्व दुर्घटनांची कारणे जवळपास सारखीच आहेत. एकच अरुंद रस्ता, पर्वतावरील धार्मिक स्थळे किंवा मंदिरापर्यंत जाण्यासाठी चिंचोळी वाट, अनियंत्रित गर्दी, भाविकांचा बेशिस्तपणा, गर्दीला नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांकडे दुर्लक्ष, अफवा पसरल्याने होणारी गडबड याच कारणांमुळे चेंगराचेंगरी होत असते. मग ती हरिद्वार येथील आश्रमातील दुर्घटना असो, केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला मंदिरातील असो, उत्तर प्रदेशातील कृपालू महाराजांच्या आश्रमातील असो, राजस्थानच्या चामुंडा देवी मंदिर किंवा हिमाचल प्रदेशातील नैना देवी मंदिरात झालेली भीषण चेंगराचेंगरी असो. महाराष्ट्रातही मांढरदेवी यात्रेच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे ३०० भाविक मृत्युमुखी पडले होते. गुजरातमध्ये पावागड येथेही २००७ मध्ये चेंगराचेंगरी झाली होती. आता या यादीत जुनागढची भर पडली. दुर्घटनेमुळे भावनाथ येथील शिवरात्रोत्सवाचा कार्यक्रम कदाचित आता स्थगित केला जाईल, पण गेलेल्या जिवांचे काय? आजपर्यंत अशा प्रत्येक दुर्घटनेनंतर असेच घडले आहे. त्यापासून योग्य धडा घेऊन खबरदारीचे उपाय योजले आणि चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती रोखण्याचा प्रयत्न केला असे दुर्दैवाने कुठेही झालेले नाही. मुळात सार्वजनिक शिस्त ही आपल्या जनजीवनात अत्यंत अभावाने आढळणारी गोष्ट आहे. त्यामुळेच आयोजकांची जबाबदारी अशा वेळी मोठी असते. आपल्याकडील धार्मिक संस्थाने किंवा मंदिरे यांना प्रसिद्धी आणि त्यासोबत येणारा अमाप पैसा हवा असतो, मात्र तेवढीच काळजी त्यांना भाविकांविषयी वाटत नसते. त्यामुळेच संभाव्य चेंगराचेंगरीचे व्यवस्थापन करायचे त्यांच्या ध्यानीमनीही नसते. त्यातूनच जुनागढसारख्या दुर्घटना घडत राहतात. आपल्या देशातील देवस्थानांना लागलेला चेंगराचेंगरीचा शाप कधी दूर होणार, हा एक प्रश्‍नच आहे.
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.