कृपाशंकर आणि बिल्डर यांच्यातील साटेलोटे पाहता, राजकारण्यांच्या अशा व्यवहारांना कॉंग्रेसश्रेष्ठी आता तरी चाप लावणार की नाही, असा प्रश्न जनतेच्या मनात आहे.
मुंबई महापालिका जिंकून शिवसेनेचा प्रभाव नेस्तनाबूत करण्याचे कॉंग्रेसच्या मनातले मांडे मतदारांनी मोडून काढत, कॉंग्रेसला आपली जागा दाखवून दिली होतीच; पण मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन मुंबई उच्च न्यायालयाने त्याहीपेक्षा अधिक सणसणीत चपराक कॉंग्रेसश्रेष्ठींना लगावली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांच्या वस्त्रहरणाचे फड गावोगावी लावले होते. पण खटल्यापाठोपाठ कृपाशंकर यांनी कमावलेली बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिल्याने, आता खऱ्या अर्थाने कॉंग्रेसचे "वस्त्रहरण' झाले आहे. पण अधिक आश्चर्याची बाब म्हणजे "कृपाशंकर नावाचा दशमग्रह' आपल्या वक्रस्थानी बसवण्याची कर्तबगारी ही कॉंग्रेसश्रेष्ठींनीच दिल्लीत बसून पार पाडली होती! 1970 मध्ये टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी कृपाशंकर मुंबईत आले आणि त्यांनी विलेपार्ल्यात भाजी विकायला सुरवात केली. अवघ्या दोन दशकांतच कॉंग्रेसला त्यांच्या राजकीय प्रतिभेचा साक्षात्कार झाला आणि कृपाशंकर यांचा वारू चोहो दिशांनी धावू लागला. 1994 मध्ये त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली आणि आज डोळे पांढरे करणारे जे काही त्यांच्या स्थावर-जंगम मालमत्तेचे आकडे पुन्हा एकदा प्रकाशात आले आहेत, ती मालमत्ता त्यांनी त्यानंतरच्या दोन दशकांतच हस्तगत केली आहे. अर्थात, दिल्लीतल्या घोड्यावर बसून महाराष्ट्र आणि मुंबईच्या राजकारणाची सूत्रे हलवणाऱ्या कॉंग्रेसश्रेष्ठींना कृपाशंकर यांच्या या "कर्तृत्वा'ची कल्पना नव्हती, असे म्हणणे म्हणजे स्वत:च्याच डोळ्यांत धूळफेक करण्यासारखे आहे. कारण कृपाशंकर यांच्या कर्तृत्वाचे झेंडे महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून थेट झारखंडपर्यंत पोचले होते. झारखंडमध्ये मधू कोडा नावाचे कोणी एक गृहस्थ मुख्यमंत्री झाले, तेव्हाच ती "कृपा' कोणाच्या आशीर्वादाने झाली, त्याचे डिंडीम थेट दिल्ली दरबारात वाजले होते. पण दिल्लीतील कॉंग्रेसश्रेष्ठींना मात्र हे कृपाशंकर मुंबईतील तमाम उत्तर भारतीयांना एकत्र आणून मराठी माणसांच्या शिवसेनेला शह देतील, असे वाटत होते. त्यामुळेच आमदारकी, गृह खात्याचे राज्यमंत्रिपद यापाठोपाठ मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले. त्याचीच फळे आता या देशभरात झालेल्या बदनामीच्या रूपाने कॉंग्रेसश्रेष्ठींच्या पदरी आली आहेत.
पण कृपाशंकर यांच्या "कर्तृत्वा'चे धिंडवडे कोर्टाने काढल्यानंतरही त्यांची मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची हिंमत दिल्लीश्वरांनी का दाखवली नाही, हे एक कोडेच आहे. अखेर, कृपाशंकर यांनाच कणव आली आणि त्यांनी लगोलग राजीनामा दिला. पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मात्र त्यानंतरही, "कृपाशंकर यांनी निवडणूक निकालानंतरच राजीनामा दिला होता; तो आता पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला आहे!' असे सांगत आहेत. याचा अर्थ काय लावायचा? खरे तर न्यायालयाने तिखट शब्दांत कृपाशंकर यांचे वाभाडे काढून, थेट पोलिस आयुक्तांनाच त्यांच्या विरोधात "गुन्हेगारी स्वरूपाच्या वर्तनाबद्दल' खटला भरण्याचा आदेश देऊन या अव"कृपे'तून मुंबईकरांची मुक्तता केली आहे. मुळात कृपाशंकर यांच्या संदर्भातील सारे वास्तव कॉंग्रेसजनांना ठाऊक होते आणि त्यांनी या निवडणुकीत मुंबईतील तिकीटवाटप नेमक्या कशा रीतीने केले, त्याचा "भांडाफोड' मुंबई कॉंग्रेसचेच निष्ठावान कार्यकर्ते अजित सावंत यांनी या निवडणुकीच्या तोंडावर केला होता. परिणामी सावंत यांचीच कॉंग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली! गुरुदास कामत आणि प्रिया दत्त या कॉंग्रेसच्याच दोन खासदारांनीही त्याविरोधात आवाज उठवला होता. पण गांधी कुटुंबाशी असलेल्या जवळिकेमुळे त्यांना कवचकुंडले लाभली होती. ते कवच आता न्यायालयाच्या आदेशानंतर कुचकामी ठरले आहे. मात्र, या प्रकरणातून बाहेर आलेला एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. बिल्डर लॉबीशी साटेलोटे करून सर्वपक्षीय राजकारण्यांनी हे महानगर विकायला काढल्याच्या कहाण्या केवळ चर्चेतच नव्हेत, तर छाप्यातही आल्या आहेत. प्राप्तिकर खाते आणि "एसीबी' यांच्या अहवालातून कृपाशंकर आणि बिल्डर यांच्यातील साटेलोट्याचा जो तपशील बाहेर आला आहे, त्यामुळे या "अर्थपूर्ण व्यवहारां'वर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळेच आता तरी राजकारण्यांच्या या अशा व्यवहारांना कॉंग्रेसश्रेष्ठी चाप लावणार की नाही, हा नागरिकांच्या मनातला प्रश्न आहे. कारण विलासराव देशमुख यांनी केलेल्या जमीनवाटपाचे भांडे न्यायालयात फुटल्यानंतरही ते केंद्रीय मंत्रिपद दिमाखात मिरवत आहेतच! त्यामुळेच कृपाशंकर यांच्यावर खटला भरण्याचे आदेश देऊन न्यायालयाने एक प्रकारे कॉंग्रेसलाच धोक्याचा इशारा दिला आहे. कॉंग्रेस त्यापासून नेमका काय बोध घेते, ते बघायचे. नाहीतर अशा चपराकीची लोकसभा-विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ शकते.
http://www.esakal.com/esakal/20120224/5336874799988828351.htm