
भारतीय गोलंदाज आणि फलंदाज सध्या काय दिवे लावत आहेत, हे रोजच्या रोज पाहायला मिळत आहे. पराभवाच्या बातम्या पाहून क्रिकेटप्रेमीही कंटाळून गेले आहेत. पूर्वी सचिन तेंडुलकर चांगला कसा खेळला, धोनीने षट्कार कसे मारले, सेहवागने समोरच्या गोलंदाजांना कसे फोडून काढले, द्रविडप्रमाणेच गौतम गंभीरही क्रिझवर कसा टिकून राहतो, याची चर्चा होत असे. आता मात्र याला काढायला हवे, त्याला डच्चू द्यायला हवा, तमक्याचा फॉर्म पूर्णपणे बिघडला आहे, भारताची कामगिरी कशी ढिसाळ असते, अशा चर्चांना ऊत आला आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडूनही मार खातो, इंग्लंडमध्येही वाईट कामगिरी करतो, श्रीलंकेचा संघही आपल्याला सहज हरवतो, हे पाहून क्रिकेटविषयीचे प्रेम कमी व्हायला लागले आहे. राजकारणी लबाड असतात, अशी भारतीय जनतेची जशी धारणा झाली आहे, तसेच भारतीय संघ हरणारच, असे क्रिकेटप्रेमींचे मत होऊ लागले आहे. आनंदात सर्वच सहभागी होतात आणि दु:खात कोणीच साथ देत नाहीत, ही म्हण भारतीय क्रिकेट संघालाही लागू झाली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचे सोडा, भारतीय संघातील खेळाडूही सतत होणाऱ्या पराभवाबद्दल एकमेकांना दूषणे देऊ लागले आहेत. त्यांच्यातील वाद आणि भांडणे आता चव्हाट्यावर येताहेत. मंगळवारी ब्रिस्बेनमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर तर महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यातील भांडणे उघडच झाली. तरुण तुर्कांना संधी देण्यासाठी जुन्या अर्कांना काही सामन्यांसाठी बसवण्याची "रोटेशन पद्धत' भारतीय संघात सुरू झाली आहे. त्यामुळे कधी सेहवाग, कधी गौतम गंभीर, तर कधी सचिन तेंडुलकर या जुन्या अर्कांऐवजी तरुण तुर्कांना खेळवण्यात येत आहे. त्याबद्दल जुन्या मंडळींनी आतापर्यंत तक्रार केली नव्हती, पण या मंडळींचे क्षेत्ररक्षण चांगले नसल्याचे मत धोनीने व्यक्त करताच, सेहवागने त्याला प्रत्युत्तर दिले. गेली दहा वर्षे आमचे क्षेत्ररक्षण असेच होते, पण त्या वेळी तक्रार का झाली नाही, असा सेहवागचा सवाल आहे. म्हणजेच पराभवाचे खापर आमच्यावर फोडण्याचा धोनी प्रयत्न करीत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्याने केला आहे. अलीकडील काळात भारतीय संघातील एकाही खेळाडूची कामगिरी समाधानकारक वा चांगली म्हणावी, अशी दिसलेली नाही. स्वत: धोनीही फार चांगले खेळताना दिसत नाही. संघाचा कर्णधार म्हणूनही तो कमी पडत असल्याचे जाणवत आहे. जे तरुण तुर्क आहेत, त्यांच्यातही दम दिसत नाही. त्याची अनेक कारणे आहेत. क्रिकेट सतत खेळले जात असल्याचा हा परिणाम आहे. सतत खेळल्याने सारे खेळाडू दमले आहेत. त्यातच अधूनमधून कोणीतरी दुखापतीमुळे त्रस्त असतो. कधी कसोटी, कधी एकदिवसीय आणि कधी 20 षट्के अशा सामन्यांमुळे कोणीही फॉर्मात दिसत नाही.
सचिन तेंडुलकरची वयाची एकोणचाळिशी, तर सेहवागनेही पस्तिशी गाठली आहे. तरीही ते खेळत आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या पॉंटिंगने मंगळवारीच एकदिवसीय सामन्यात यापुढे खेळणार नाही, केवळ कसोटीत खेळेन, असे जाहीर केले. त्याचेही वय 38 आहे. "लोकांनी मला निवृत्त व्हायला सांगावे आणि मी खेळत राहावे, हे मला योग्य वाटत नाही,' असे तो म्हणाला. पण एकाही खेळाडूला आपणही निवृत्त व्हावे, असे वाटत नाही. सक्तीने घरी बसवेपर्यंत खेळण्याची त्यांची इच्छा असावी. सचिनच्या शंभराव्या सेंच्युरीची सारेच वाट पाहत आहेत. त्याची 99 वी सेंच्युरी गेल्या मार्चमध्ये आफ्रिकेविरुद्ध नागपुरात झाली. त्यानंतर वर्षभर तो खेळत आहे, पण सध्याच्या मालिकेतील पाच सामन्यांत त्याची सरासरी आहे 18 धावांची आणि कसोटी सामन्यांमध्ये 38 धावांची. त्यामुळे सामना जिंकून देईल, असा एकही फलंदाज सध्या भारताकडे नाही. शिवाय खेळाडूंचा एकमेकांवर विश्वास नाही वा कमी होत चालला आहे, आणि तरुण तुर्कांना संघात स्थान देण्यासाठी आपल्याला कधी घरी बसवले जाईल, याची जुन्या अर्कांना खात्री राहिलेली नाही. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका यांच्या संघात लढण्याची ऊर्मी जी नेहमी जाणवते, ती आपल्याकडे कधीच दिसलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाची पूर्णपणे नव्याने बांधणी करणे गरजेचे आहे. कसोटी, एकदिवसीय आणि 20 षट्कांचे सामने यासाठी तीन वेगवेगळे कर्णधार असावेत, असे मत माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे. पण कर्णधारांबरोबरच त्या त्या प्रकारच्या खेळासाठी खेळाडूही वेगळे हवेत. कारण क्रिकेटच बदलत चालले आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, जिंकण्याची ईर्ष्याही खेळाडूंमध्ये असायला हवी. सध्या ती नसल्यामुळेच भारतीय संघाला जिंकण्याची स्वप्नेही पडेनाशी झाली आहेत.