skip to main |
skip to sidebar
"ही' तर ठोकशाही
राज्यातल्या दहा महापालिका, जिल्हा परिषदा-पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर सुरु झालेला धिंगाणा पुरोगामी महाराष्ट्राला कलंक होय. निवडणुकांचे निकाल जाहीर होताच, सर्वच राजकीय पक्षांच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका निघाल्या, फटाक्यांची आतषबाजी झाली. गुलालाची उधळण झाली. दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी राज्यभर रंगवलेले "संगीत वस्त्रहरणा' चे प्रयोगही संपले. स्वबळावर लढणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांची हवेत उडणारी विमाने जमिनीवर उतरली. निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांसाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात, या पक्षांच्या उमेदवारांना जागरूक मतदारांनी ढकलून दिले. दोन्ही कॉंग्रेसच्या बड्या-दिग्गज आमदार, पुढाऱ्यांची मुले-सुनांना मतदारांनी पराभवाचे पाणी पाजत राजकीय घराणेशाहीला चोख प्रत्युत्तर दिले. "केले तुका आणि झाले माका', अशी अवस्था झालेल्या या पक्षाच्या नेत्यांनी परस्परांवर पराभवाचे खापर फोडायसाठी सुरु केलेला कलगीतुराही रंगला. प्रचाराच्या रणधुमाळीत गावोगाव चिथावणीखोर-आगलावी भाषणबाजी करणारे मंत्री, नेते मुंबईला निघून गेले आणि मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्याच्या विविध भागात पराभूत उमेदवारांच्या समर्थकांनी रक्तरंजित सुरु केलेला राडा, ठोकशाहीचे राजकारण सुरु झाले, ते पाप नेमके कुणाचे? याचा जाबही कार्यकर्त्यांची डोकी फिरवणाऱ्या नेत्यांनी द्यायला हवा. निवडणुकांचे मतदान शांततेने पार पाडून जनतेने आपले कर्तव्य पार पाडले. निकालानंतर शांतता कायम ठेवायची जबाबदारी ज्या पुढाऱ्यांची असते, तेच आपल्या समर्थकांना वाऱ्यावर सोडून निघून गेल्यानेच शांततेला चूड लावणाऱ्या, निरपराध्यांचे बळी जायच्या गंभीर घटना राज्यभर घडल्या आहेत. महानगरी मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा जमावाने खून केला. नागपूरमध्येही राजकीय कार्यकर्त्याच्या खुनाची घटना घडली. विद्यानगरी पुण्यात सुतारवाडी प्रभागातून पराभूत झालेल्या उमेदवाराच्या समर्थकांनी वस्तीवरच हल्ला चढवून वीस घरांची आणि वीस गाड्यांची तोडफोड केली. बंडखोराचा पराभव झाल्यामुळे पिसाळलेल्या या समर्थकांनी दुसऱ्या गटाच्या समर्थकांवर हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले. पोलिसांच्या डोक्यातही वीट घातली. नवनिर्वाचित नगरसेविका रोहिणी सुधीर चिमटे यांनी आपला विनयभंग झाल्याची, जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद पोलिसात करावी, ही बाब संस्कृतीचे झेंडे नाचवणाऱ्या पुण्यातल्या राजकारण्यांच्या तोंडालाही डांबर फासणारी ठरते. नाशिकमध्ये शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केलेल्या माजी नगरसेवक दिलीप दातीर यांच्यावर झालेला हल्ला निवडणुकीच्या राजकारणातले गणित "चुकते' करायसाठीच होता. पुण्यात पराभूत उमेदवाराने हैदोस घालून दहशत निर्माण केली तर, सोलापुरात ठिकठिकणी काही भागात दगडफेक, हाणामारीच्या घटनांना उत आला. गेल्या दोन दिवसात दोन माजी नगरसेवकांसह त्यांच्या दहा समर्थकांवर पोलिसांनी गुन्हेही दाखल केले आहेत. ही ठोकशाही-हाणामाऱ्या रोखायसाठी तातडीने प्रयत्न केले नाहीत तर, राजकीय वैराची ही आग धुमसत राहील, त्याचे स्फोट पुन्हा होत राहतील, कायदा आणि सुव्यवस्थेला हादरे बसतील, याचे भान गृहमंत्री आर. आर. पाटील आणि सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी-नेत्यांनी ठेवायला हवे. निवडणुकात प्रचार करायचा, निवडणुका लढवायचा, आपले मत मांडायचा, द्यायचा घटनात्मक अधिकार सर्वांना आहे. तो नाकारायचा, त्यासाठी धमक्या द्यायचा, हाणामाऱ्या करायचा अधिकार कुणालाही नाही. कुणाच्या विरोधी प्रचारामुळे नव्हे, तर आपल्याला मतदारांनी पराभूत केले, याचे भान पराभूत उमेदवारांनीही ठेवून खुलेपणाने पराभव स्वीकारायला हवा. यातच त्यांचे आणि समाजाचेही हित आहे.
राजकीय तंटेबाजीचे वणवे
निवडणुकांच्या प्रचारात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, उमेदवारांनी, मंत्र्यांनी मर्यादा ओलांडून केलेली चिथावणीखोर आगलावी भाषणबाजी, राजकीय तंट्याच्या वणव्यात तेल ओतणारी ठरली. तंटामुक्तीसाठी सुरु असलेल्या राज्यव्यापी मोहिमेत, या सत्तेच्या दलालांनीच कोलदांडे घातले. शांततापूर्ण प्रचार सुरु असतानाही, त्याला राजकीय वैराचे वळण दिले. राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत राजकारण्यांचे गट-तट आहेतच, ते राहतीलही. पण, राजकीय गटबाजीचे रुपांतर गावात दुही निर्माण होण्यात, गटबाजीत, गावाचा विकास ठप्प होण्यात होवू नये, यासाठीच सरकारने तंटामुक्ती मोहिमेला गती दिली. राजकीय वैराने-हाणामाऱ्यांनी आपले भले होत नाही, नुकसानच होते, याची जाणीव झाल्यामुळेच राज्यातली हजारो गावे तंटामुक्त झाली. पण, या निवडणुकीतल्या प्रचारामुळे राज्यातल्या हजारो गावात पुन्हा राजकीय वैराची बीजे पेरली जावीत, हे राज्याच्या-समाजाच्याही हिताचे नाही. मंत्र्यांनीच जाहीर सभांतून एकमेकांचे कपडे फाडायचा उद्योग सुरु केल्यावर, तेच लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचले. परस्परांना बघून घ्यायच्या, हिसका दाखवयच्या, राजकीय अस्तित्व संपवायच्या धमक्याही प्रचारसभांत दिल्या गेल्या. काही मंत्र्यांनीच परस्परांवर गुंडगिरीला संरक्षण दिल्याचे, दहशतवाद निर्माण केल्याचे, भूखंडांच्या हडपाहडपीचे आरोप-प्रत्यारोप केले. तोच धडा त्यांच्या समर्थकांनी, गावागावातल्या पुढाऱ्यांनी गिरवला. कुणी, किती, कसा भ्रष्टाचार केला, कोण कसा श्रीमंत झाला, याचे पंचनामे जाहीर सभात झाले. निवडणुकीतल्या या अत्यंत विषारी आणि मर्यादा सोडून झालेल्या प्रचारामुळेच, निकालानंतर या गटबाजीचे ठिकठिकाणी स्फोट झाले. पण, त्यात दोन निरपराध्यांचे बळी गेले. काही जणांची डोकी फुटली. ज्यांचे बळी गेले, त्यांच्या कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले. हा सारा अनर्थ राजकारणातल्या वैर भावनेतून घडला. राजकीय पक्षांच्या उमेदवाराचा निर्भयपणे प्रचार केल्याची मोठी किंमत त्यांना आणि त्यांच्या कुुटुंबियांना मोजावी लागली. दहा/पंधरा वर्षांपूर्वी बिहार राज्यात निवडणुकीच्या प्रचारात दहशतवादाचा आश्रय, राजकारणी नेतेच घेत असत. निवडणुकीच्या प्रचारात आणि निकालानंतर हाणामाऱ्या होत. त्या बिहारमध्ये आता अत्यंत शांततापूर्ण वातावरणात निवडणुका होतात. मतदान केंद्रावर हल्ले करायचे, प्रचारात राडा करायचे धाडस गुंड गुन्हेगारांच्या टोळ्यांना होत नाही. बिहारचा लौकिक विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणारे राज्य असा झाला असतानाच, महाराष्ट्राचा बदलौकिक मात्र "बिहार' मध्ये रुपांतर होत असलेले राज्य असा व्हावा, ही बाब सरकारला आणि सत्तेसाठी रणांगण गाजवणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही शोभणारी नाही. सरकारने निवडणुकीनंतर राज्यभरात शांतता कायम ठेवायसाठी कडक उपाययोजना करायलाच हवी आणि ती सरकारची जबाबदारीही आहे.