skip to main |
skip to sidebar
मराठीचा दिवा..
माझ्या मराठी मातीचा। लावा ललाटास टिळा।। हिच्या संगाने जागल्या। दर्याखोर्यातील शिळा।। अशी भूमिका घेऊन कविभास्कराच्या सार्मथ्याने मराठी जग उजळून ठेवणार्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी ‘मराठी दिन’ साजरा केला. आज तात्यासाहेब शरीराने नाहीत. सूर्य जरी मावळला, तरी नाहीसा होत नसतो. सूर्य असतोच; पण आपल्या नजरेला तो दिसतो की नाही, हे महत्त्वाचे असते. जीवनाचे आणि मराठी भाषेचे समग्र भान ज्यांनी आयुष्यभर निष्ठेने मांडले आणि भाषेची जमीन कसदार केली त्यांचे स्मरण करीत असताना या महाराष्ट्रात मराठी बोलणार्यांचा सलग भूभाग कमी होत आहे. सिंधी भाषा अनेक ठिकाणी बोलली जाते; परंतु या भाषकांना सलग भूभाग नाही. त्यामुळे या भाषेचा विकास र्मयादित झाला. हिब्रूचे पुनरुज्जीवन कसे करावे लागले, हे जगाला माहीत आहे. आजच्या महाराष्ट्राचा विचार करता, या राज्याची सार्वजनिक जीवनाची भाषा कोणती, असाच प्रश्न पडतो. मराठीचे भवितव्य उज्ज्वल आहे, अशी अस्मिताखोर भाषा करायची किंवा मराठी मरत चालली आहे, असे शोकांतिक निदान करायचे हे बरोबर आहे का? या दोन टोकांच्या मध्ये काय अवस्था आहे? ‘सचिन तेंडुलकरने ९९ शतके ठोकून इतिहास घडविला..आणि इतिहास रचला..’ अशी दोन्ही वाक्ये मराठीत लिहिली जातात. यांतील रचणे हिंदीतून आलेले आहे. आपल्याकडे मराठी संस्कृतीत शब्दापासून प्रत्येक गोष्ट घडविण्यावर भर असतो. जे आधीच अस्तित्वात आहे त्याची मांडणी करणे, याला मराठीत रचना म्हणतात. मराठीत शब्दांना सांस्कृतिक संदर्भ असतात. परभाषेतील शब्द वापरणे किंवा आत्मसात करणे, ही गोष्ट मराठीला नवी नाही. नाथांच्या काळात एका बाजूने फारसी भाषेचा दबाव आणि संस्कृतचा दुराग्रह, या कात्रीत मराठी भाषा सापडलेली असताना बहुजनांच्या भाषेत त्यांनी भारुडे लिहिली. आजही ती समकालीन वाटतात. आज आपण परभाषेतील शब्द घेताना किंवा वापरताना मराठी सांस्कृतिक संदर्भ असलेले शब्द वगळून उसनवारी करतो. विदर्भात सार्वजनिक ठिकाणी सरसकट हिंदी बोलली जाते त्याला गतकाळाचे संदर्भ आहेत. मराठवाड्यात निजामाची राजवट होती; त्यामुळे ऊदरूचा प्रभाव होता. परंतु, आजकाल सातारा-सांगली-कोल्हापूर आणि काही प्रमाणात कोकण वगळता कोणत्या गावामध्ये सलग, सोपी, सुंदर, कसदार मराठी बोलली जाते? पुण्याच्या औद्योगिकीकरणाच्या वादळाने ‘हिंग्लिश’पासून हिंदीपर्यंत भाषा सुसाट धावत असते. मुंबईत तर ‘बम्बय्या मराठी’ भूषण मानले जाते. आजही महाराष्ट्राच्या खेडोपाडी उत्तम मराठी बोलली जाते; परंतु सरकारपासून माध्यमांपर्यंत भाषेची जी मोडतोड सुरू असते, त्यामुळे आपल्या अस्तित्वाच्या सीमारेषा विसकटू लागल्या आहेत. प्रेक्षकांना उद्देशून व्यासपीठावर ‘दर्शक’ असा शब्द वापरला जातो. दूरचित्रवाहिन्यादेखील अनेकदा हा शब्द वापरतात. मुळात प्रेक्षक आणि श्रोता यांत फरक असतो. आपण ‘सूक्ष्मदर्शक यंत्र’, ‘निदर्शक’ असे शब्द ऐकतो. सूक्ष्मपणे दाखविणारे यंत्र, असा अर्थ लावतो. एखाद्या भूमिकेचे निदर्शक विधान, असे वाक्य वापरतो. येथे दर्शक असा शब्द आलेला आहे. प्रेक्षकांना जर दर्शक म्हणायचे, तर त्यात मराठी संस्कृतीचा संदर्भ काय? न्यायव्यवस्थेत शेतकर्यांना समजेल अशा भाषेत व्यवहार आज तरी होतो का? सरकारी पत्रकांची भाषा सरकारी कर्मचार्यांना तरी कळते का? मग, मराठीला ज्ञानभाषा बनविण्याच्या कामाचे काय होणार? शालांत परीक्षेपर्यंत एके काळी बरीच परिभाषा आपण वापरत होतो. आज मुला-मुलींना हिंदी किंवा इंग्रजी या भाषांत व्यवहार करण्याची सवय लागली, तर पत्रकारितेपासून वाड्मयापर्यंत आपला प्रवास कसा होणार? मराठी फक्त कुटुंबात बोलण्याचीच भाषा राहणार काय? अर्थात, असे घडण्यासाठी अनेक शतके जावी लागतील. कारण संस्कृत देवांनी निर्माण केली असली, तरीही प्राकृत काही चोरांनी निर्माण केलेली भाषा नव्हे, असे नाथांनी सांगितले त्याला आजही अर्थ आहे. १९४0नंतर मराठी वृत्तपत्रांनी क्रिकेटच्या खेळाची परिभाषा मराठी भाषकांना समजेल, अशी तयार केली. गोलंदाज, फलंदाज, यष्टिचीत, चौकार, षट्कार, धावबाद असे शब्द लोकप्रिय केले. आज मराठीतसुद्धा शीर्षक देताना ‘छक्का’ असे लिहिले जाते. याचा अर्थ, ‘शब्दचि आमुचे जीवन’ या तुकोबांच्या सार्मथ्याचा प्रभाव बाजूला टाकण्याचा पद्धतशीर प्रयत्न येथे रूढ होत चालला आहे. तरीही, मराठीचे भवितव्य किती उज्ज्वल आहे, असे ढोल वाजविले जातात. राजवाडेंनी मराठी मुमुर्षू झाली, असे म्हटल्यामुळे मराठी नष्ट झाली नाही हे खरे असले, तरीही रोजच्या व्यवहारात होणारी भाषेची तोडफोड आपल्यालाच थांबवावी लागेल. ‘माहोल’ आणि ‘वातावरण’या दोन शब्दांत काही सांस्कृतिक संदर्भ आहेत की नाही? केवळ रूढ झाले आहे म्हणून वापरतो, या भूमिकेने भाषेचा विकास होतो का? संगीतात ‘साथ करणे’ आणि ‘संगत करणे’ यांत काही फरक आहे की नाही? नव्या पिढीने मराठी अस्मिता जागवावी आणि कुसुमाग्रजांचे सार्मथ्य लक्षात घ्यावे असे वाटत असेल, तर आपण जी दिशा स्वीकारली आहे त्याबद्दल आत्मपरीक्षण करणार की नाही? यात प्रमाण भाषा किंवा व्याकरण यांचे प्रश्न नंतरच्या टप्प्यावर येतात. बोली भाषादेखील इथल्या मातीचा वास घेऊन वाढत असताना शब्दांचे आक्रमण सहजासहजी स्वीकारणार्या समाजाचे स्वातंत्र्य आपोआप टिकेल काय? महाराष्ट्राच्या विधिमंडळानेदेखील कित्येक चांगले मराठी शब्द निर्माण केले आणि त्यांचा वापर सुरू केला; परंतु आज विधिमंडळात जी भाषणे होतात, त्यांत मराठीचे भाषापण किती असते? जीवनाच्या सर्व क्षेत्रांत भाषेची अवहेलना होत असेल आणि भाषेच्या अस्मितेची प्रतीके मिरविली जात असतील, तर आपली दिशा तपासली पाहिजे. गोदेच्या काठावर उगवताना दिसलेला शुक्राचा तारा म्हणजे आत्मार्पण करण्यासाठी निघालेला वीर आहे, असे कुसुमाग्रजांना वाटत असे. साहित्याच्या अनेक दालना्त त्यांनी लेखन केले असले, तरीही त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी कविताच होती. त्यांच्या कवितेला नैतिक मूल्यांचा संदर्भ होता. सीमेवर लढणार्या जवानांमध्ये त्यांना ‘संस्कृतीचा निळा चांदवा’ दिसत असे. प्र™ोची जाणीव मान्य करण्याचा धर्म त्यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांच्या प्रत्येक शब्दाला मराठीच्या आकाशाचा स्पर्श झालेला असे. कोणत्याही मराठी माणसाला
आयुष्य कळावे, यासाठी तात्यासाहेब लिहायचे. ‘अखेर माझे जीवन म्हणजे, माझे कळणे। तिमिरही माझा, दिवाही माझा..माझे जळणे’ या शब्दांचा मराठी तत्त्वस्पर्श सर्वांनी नीट ध्यानात
घेतला पाहिजे.
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=EditorialEdition-16-1-27-02-2012-2c0b6&ndate=2012-02-28&editionname=editorial