पैसा व दहशतीच्या जोरावर यापुढे निवडणुका जिंकता येणार नाहीत हे उत्तर प्रदेशच्या निकालांनी दाखवून दिले. सत्तासुंदरी यादवांची...देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशसह पंजाब, मणिपूर, उत्तराखंड, गोवा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत, पण सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या उत्तर प्रदेशवर. उत्तर प्रदेशात सत्तासुंदरी कुणाच्या गळ्यात वरमाला घालणार? युवराज राहुल गांधी की युवराज अखिलेश यादव? अखेर सत्तासुंदरीने वरमाला अखिलेश यादवच्या गळ्यात घातली. उत्तर प्रदेशात मायावतीराजचा इतका दारुण पराभव होईल असे कुणालाच वाटले नव्हते. जागांचे शतकही मायावतींचा हत्ती पार करू शकला नाही. ‘टीम अण्णा’ला आता तरी पटायला हवे की, मतदार शहाणा आहे. आमच्या देशातील जनता सुज्ञ आहे. देशाचे व स्वत:चे बरेवाईट तिला कळते. टीम अण्णाचे बोलके पोपट इकडे तिकडे फडफडू लागले, मिठू मिठू बोलू लागले म्हणून त्यांचे कोणी ऐकले असे कुठेच झाल्याचे दिसत नाही. मतदारांनी फडफडणार्या बेताल ‘टीम’ अण्णास त्यांची जागा दाखवली तरी राज्या राज्यात भ्रष्टाचार्यांचा निकाल लावून अनेकांचा निकाल लावला आहे. उत्तर प्रदेशात अण्णावाल्यांनी मायावती सरकार व त्यांच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध अजिबात प्रचार केला नाही. त्यांच्या प्रचाराचा संपूर्ण रोख कॉंग्रेसवर होता. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे अस्तित्वच उरले नसताना व हा पक्ष जवळजवळ तिरडीवर अखेरचे आचके देत पडला असताना या मुडद्यास लाथा मारून स्वत:चे शौर्य दाखविण्याची तशी गरज होती काय? पण आता निकाल लागले व मतदारांनी मायावतींची भ्रष्ट राजवट मुळापासून उखडून फेकून दिली आहे. मायावती सरकारातील जवळजवळ सर्वच भ्रष्ट मंत्री पराभूत झाले. पाच वर्षांपूर्वी समाजवादी पार्टीच्या कारभारास कंटाळून यादवांच्या गुंडगिरी व झुंडशाहीच्या विरोधात कौल देऊन उत्तर प्रदेशातील जनतेने मायावतींच्या हाती सत्ता सोपविली होती, पण भ्रष्टाचार व चंगळवाद मायावतींच्या राज्यात शिगेला पोहोचला. जिवंत माणसांपेक्षा पुतळे व मूर्तींवर हजारो कोटी उधळल्यामुळे लोकांनी मायावतींना घरी पाठवले आहे. हत्तीने मायावतींच्या भ्रष्ट राजवटीस पायदळी तुडवले आहे. ४०३ जागा असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत मुलायमसिंग यांच्या पक्षाला २२३ जागा मिळाल्या. एवढे मोठे प्रचंड बहुमत मिळाल्याने कॉंग्रेस तर सोडाच, पण अपक्ष किंवा इतर पक्षांच्याही मदतीची त्यांना आता गरज नाही. बसपाने शंभरी गाठली नाही व ‘राष्ट्रीय’ म्हणविणार्या कॉंग्रेस-भाजपने ‘साठी’ गाठली नाही. मायावतींची बसपा ८१ वर लटकली. कॉंग्रेस-रालोद ३५, भाजप ४८ वर थांबले. राहुल गांधी यांनी तर असे भासवले होते की, उत्तर प्रदेशची सत्ता काबीज केली. ४०० जागांपैकी ४०० जागा जिंकू असाच आभास त्यांनी प्रसिद्धीमाध्यमातून निर्माण केला होता. जावई ‘रॉबर्ट वढेरा’पासून सारे गांधी खानदान, नातवंडं, पतवंडांसह प्रचारात उतरले, पण त्यांच्याही हाती भोपळाच लागला. मतदारांना गृहीत धरता येत नाही आणि पैसा व दहशतीच्या जोरावर यापुढे निवडणुका जिंकता येणार नाहीत हे उत्तर प्रदेशच्या निकालांनी दाखवून दिले. राहुल गांधी महाशयांनी मेहनत व भाषणे तर भरपूर केली. आधीच्या विधानसभेत कॉंग्रेसचा आकडा जेमतेम पंधराच्या घरात होता. तो आता चाळिशीत पोहोचला इतकेच, पण त्याचा उपयोग काय? वयाची चाळिशी पार करूनही युवराज राहुलबाबा जसे सडाफटिंग राहिले तसेच कॉंग्रेसच्या या चाळिशीच्या वांझ आकड्याचे आहे. समाजवादी पार्टीस संपूर्ण बहुमत मिळणार नाही व कॉंग्रेसचा टेकू घेतल्याशिवाय मुलायम सत्ता स्थापन करू शकणार नाहीत या स्वप्नाच्या मात्र ‘बाबरी’प्रमाणे साफ ठिकर्या उडाल्या आहेत. केजरीवाल, बेदी वगैरे मंडळींनी कॉंग्रेसविरोधी प्रचार केला हे खरे, पण कॉंग्रेसच्या जागा कमी होण्याऐवजी थोड्या वाढल्या आहेत. अर्थात ही वाढ तोलामोलाची आहे व त्यामुळे कॉंग्रेसची प्रतिष्ठा किंवा वजन वाढले असे नाही. गांधी खानदानाची ‘जागीर’ असलेल्या अमेठी व रायबरेलीत कॉंग्रेसची पीछेहाट झाली. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाची पीछेहाट झाली याचे दु:ख आहे. कॉंग्रेसइतक्याच बरोबरीच्या जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. ज्या उत्तर प्रदेशने भाजपास देशाची सत्ता दिली त्या रामजन्मभूमीत हिंदुत्व इतके कमजोर का पडले? याचा विचार आता सगळ्यांनाच करावा लागेल.
...आणि चौघांची!उत्तर प्रदेशातील निकाल ‘चौंकानेवाले’ असतील असे मित्रपक्ष भाजपकडून आज सकाळपर्यंत सांगितले जात होते, तसे ते नक्कीच दिसले नाहीत. इतर चार राज्यांतील निकाल मात्र नक्कीच ‘चौंकानेवाले’ आहेत. पंजाबात अकाली दलाचे काही खरे नाही अशी हवा निर्माण झाली होती, पण अकाली दलाचे ‘बादल’ पुन्हा गरजले असून त्यांच्यावर चांगले निकाल बरसले आहेत. कॉंग्रेस पक्षाची पंजाबात म्हणावी तशी पीछेहाट झालेली नाही. मणिपूर नेहमीप्रमाणे कॉंग्रेसलाच मिळाले. आश्चर्य वाटते ते उत्तराखंडच्या निकालांचे. उत्तराखंडात भाजपचा कारभार व मुख्यमंत्री खंडुरी यांचे नेतृत्व स्वच्छ आणि भक्कम असतानाही तेथे भाजपच्या सत्तेला अपेक्षित यश मिळाले नाही. उत्तराखंडात कॉंग्रेसने भाजपला टक्कर द्यावी हा प्रकार अस्वस्थ करणारा आहे. उत्तर प्रदेशात मायावतींची राजवट भ्रष्ट व चंगळवादी होती म्हणून त्यांचा पराभव झाला, पण उत्तराखंडात खंडुरी सरकार सचोटीचे व कल्याणकारी होते. मुख्य म्हणजे उत्तराखंड सरकारने ‘लोकायुक्त’ कायदा आणला तो आदर्श असल्याचे प्रशस्तिपत्र अण्णा हजारे यांनी दिले होते. खंडुरी सरकार निवडून यावे यासाठी ‘टीम अण्णा’ही प्रचार करीत होती, पण नेमके उलटे घडले. गोव्यात कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला व सर्व घराणी मोडीत काढून भाजप जिंकली. हे तर होणारच होते. शेवटी लोकशाही, निवडणुका वगैरे म्हटल्या की सत्तासुंदरीने कुणाच्या तरी गळ्यात वरमाला घालणे या गोष्टी आल्याच. पाच राज्यांतही तेच घडले. उत्तर प्रदेशात सत्तासुंदरी यादवांची झाली, तर इतर चार राज्यांत तिने अन्य चौघांची निवड केली!
http://www.saamana.com/

