News Update :

ठाण्यातील फोडा-झोडा!

Sunday, March 4, 2012


ठाण्यावर वर्षानुवर्षे फडकणारा भगवा झेंडा खाली उतरावा यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांचा जो खटाटोप चालला आहे तो व्यर्थच ठरणार आहे. 
ठाण्यातील फोडा-झोडा!आमच्या देशातील लोकशाही म्हणजे एक राजरोस तमाशाच बनला आहे. लोकशाही किंवा देशाचे चार स्तंभ कोणते? याचे उत्तर आपण सर्वसाधारणपणे असे देतो की, संसद, न्यायालय, प्रशासन आणि वृत्तपत्र! आजच्या घडीस तुमच्या त्या दळभद्री लोकशाहीचे चार स्तंभ कोणते, तर पहिला स्तंभ म्हणजे कट-कारस्थाने, नंतर पेड न्यूज, त्यानंतर फोडाफोडी-झोडाझोडी व चौथा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे थैलीशाही. ज्याच्या हाती हे सर्व आहे तोच निवडणुका जिंकू शकतो आणि सत्ता राखू शकतो. हे सर्व विस्ताराने सांगायचे कारण असे की, मुंबई-ठाण्यासह महापालिकांच्या निवडणुका झाल्या व आता महापौरपदाची बाशिंगे बांधण्याची घटिका समीप आली आहे. मुंबईची तशी आम्हाला चिंता नाही, पण ठाण्यात सध्या जे धूमशान सुरू आहे तो सर्व प्रकार लोकशाहीच्या कोणत्या स्तंभात बसतो? महापौरपदाच्या निवडणुकीत ‘आकडा’ शिवसेना-भाजप युतीच्याच बाजूने असताना भारतीय जनता पक्षाच्या ठाण्यातील एक नगरसेविका सुहासिनी लोखंडे या सहकुटुंब अचानक गायब झाल्या. सध्या ‘युती’चे नगरसेवक एकत्रितपणे सुरक्षित स्थळी आहेत. खरे तर लोकशाहीत निवडणुका पार पडल्यावर आपापल्या नगरसेवकांना-आमदारांना असे सुरक्षित स्थळी हलवावे लागते. त्यांच्यावर चौक्या-पहारे बसवावे लागतात. हा प्रकार काही तुमच्या लोकशाहीला तसा भूषणावह नाही. त्रिशंकू विधानसभा असतील, जिल्हा परिषदा असतील नाहीतर महानगरपालिका असतील, बहुमतांचा आकडा गाठण्यासाठी प्रत्येक पक्षाला कसरतीचे प्रयोग करावे लागतात व त्यासाठी मनधरण्या, तडजोडी करणे भाग पडते, पण ठाण्यात काय झाले? कॉंग्रेस व राष्ट्रवादीस लोकांनी नाकारले. शिवसेनेस सर्वाधिक जागा देऊन महापालिकेचा कारभार शिवसेनेनेच करावा असा कौल स्पष्टपणे दिला असताना एकमेकांचे नगरसेवक पळवून, धाकदपटशा निर्माण करून, पोलिसांचा वापर करून सत्ता मिळविण्याचा हा प्रयत्न बेशरमपणाचाच प्रकार म्हणावा लागेल. ठाण्यासारख्या सुसंस्कृत व संयमी शहरास ही कीड कशी व कोणामुळे लागली, हे ठाणेकर जनतेस चांगलेच माहीत आहे व त्याचा बदला जनता घेईलच. प्रश्‍न इतकाच आहे की, अपक्ष किंवा एखाद्या छोट्या पक्षाचा नगरसेवक ‘गळा’ला लावणे वेगळे व भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचा नगरसेवक बेपत्ता करणे वेगळे. ठाण्यातील नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचा अतापता लागत नाही. त्यांचे कोणी अपहरण केले की आणखी काय झाले ते समजत नाही. हे सर्वच गूढ आहे. लोखंडे या पती आणि मुलासह बेपत्ता आहेत व त्यांच्या भावाने तशी रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवून तपासाची मागणी केली आहे. नगरसेविकेचे अपहरण राष्ट्रवादीच्या गुंडांनीच केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या ठाणेकर नेत्यांनी केला आहे. नगरसेविका हरवल्या आहेत व त्यांच्याबरोबर त्यांचा पती, मुलगाही बेपत्ता आहेत. ठाण्याची सत्ता मिळावी, ठाण्यावरील वर्षानुवर्षे फडकणारा भगवा झेंडा खाली उतरावा यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांचा जो खटाटोप चालला आहे तो व्यर्थच ठरणार आहे. पवित्र ठाण्यावर फक्त भगवा आणि भगवाच फडकेल असा स्पष्ट कौल जनतेने दिला आहे व शिवसेना-भाजप ‘युती’ उद्याच्या महापौरपदी व उपमहापौरपदी भगव्याचेच शिलेदार विराजमान केल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही तुमचा तो घोडेबाजार करा नाहीतर आमच्याविरोधात नेहमीची कोल्हेकुई करा. ठाण्याच्या नगरसेविकेचे अपहरण करून पवित्र भगव्यास तुमचे बरबटलेले हात लावता येणार नाहीत. ठाण्याच्या जनतेने काल जो बंद पुकारला, संतापाचा उद्रेक घडवून जनभावना व्यक्त केली त्याची धग लोखंड वितळवणारी आहे. तुमच्या त्या अपहरण नाट्यास चोख उत्तर देण्याची धमक शिवसेनेतही नक्कीच आहे व वेळ पडली तर तेदेखील करून दाखविण्याची हिंमत शिवसैनिकांच्या धमन्यांत आहे. ठाण्याचे महापौरपद फोडाफोडीचे राजकारण करून मिळवता येणार नाही. कुणी त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली असेल तर आम्ही त्यांना आजच इशारा देऊन ठेवतो, उगाच वाघाच्या शेपटीवर पाय ठेवू नका. तुमचे भ्याड व भ्रष्ट राजकारण तुमच्यापाशी. तुमच्या घोडेबाजाराशी आमचा संबंध नाही. लोकांनी तुम्हाला झिडकारले आहे याचे भान ठेवा व ठाण्यातील मुंग्यांच्या वारुळात हात घाला! समझनेवालों को इशारा काफी है.
गोयंकरांचे अभिनंदन!लोकशाहीचा खरा जोर गोव्यातील निवडणुकीत दिसला. विधानसभा निवडणुकीत गोयंकरांनी ८२ टक्के असे विक्रमी मतदान केले. मडगावातील एका मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाले. एरवी ‘सुशेगाद’ असलेल्या गोयंकरांनी अशा प्रकारे सार्‍या देशासमोर आदर्श निर्माण केला. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, तरच सरकार किंवा विरोधी पक्षावर टीकाटिपणी करण्याचा हक्क त्यांना आहे. नाहीतर तुमचे ते ‘टीम अण्णा’वाले केजरीवाल सरकारविरोधात, राजकारण्यांविरोधात, आमदार-खासदारांविरोधात हवे तसे बकबक बकतात. देशात कशा सुधारणा व्हायला हव्यात अशी ‘पेड’ प्रवचने झोडतात व स्वत: मात्र मतदानास दांडी मारतात. या अशा लोकांना राज्यव्यवस्था, लोकशाहीवर बोलण्याचा नैतिक सोडाच पण कुठलाही अधिकार नाही. अनेक सुशिक्षित लोक मोठ्या प्रमाणात मतदानास उतरत नाहीत व नंतर निवडून आलेल्यांना दोष देतात, भाषणे ठोकतात, विचारमंथन व चिंतन करतात. त्याचा उपयोग काय? मुंबईसारख्या शहरात पन्नास टक्केही मतदान होत नाही हे कसले लक्षण? अनेक सुशिक्षित भागात लोक मतदानाकडे पाठ फिरवितात. मतदान म्हणजे सुट्टी व मौजमजा, पैशांचा खेळ या मानसिकतेतून मतदार बाहेर पडत नाहीत. देशाचे, राज्याचे, शहराचे भविष्य फक्त ३५ ते ४० टक्के लोक ठरवतात. ही लोकशाही खरी नव्हे. म्हणूनच गोव्यातील ८२ टक्के जनतेचे आम्ही अभिनंदन करीत आहोत.  

http://www.saamana.com/
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.