उत्तर प्रदेशचे निकाल काही तासांवर येऊन ठेपलेले असताना काँग्रेसची चांगलीच लगबग सुरू झालेली दिसते. निकालानंतर सत्ता कोणाच्या साथीने बनवावी, कोणाला मुख्यमंत्री करावे वा कोणाला मंत्रिमंडळात घ्यावे किंवा वगळावे यासाठी ही लगीनघाई आहे असा कोणाचाही समज होऊ शकेल. वास्तविक तसे नाही. तसे असते तर ते एक वेळ नैसर्गिक समजता आले असते. परंतु काँग्रेसची घालमेल सुरू आहे ती वेगळय़ाच कारणासाठी. फार कमी राजकीय पक्षांच्या नशिबात अशी उत्पादक घालमेल येते. या पक्षाच्या जनुकांतच अशी रचना आहे की काहीही उत्तम कामगिरी पक्षाने केली की त्याचे श्रेय गांधी कुटुंबीयांच्या खात्यात आपोआप नोंदले जाते. आणि याउलट काहीही घडल्यास, म्हणजे पक्षाचा पराभव झाल्यास, पक्षाचा एखादा नेता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्यास अथवा अन्य कारणाने पक्षास लाजेने मान खाली घालावयाची वेळ आल्यास गांधी कुटुंबीयांभोवती एक अभेद्य तटबंदी तयार होते आणि कोणत्याही आरोपांची, टीकेची राळ त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. तेव्हा उत्तर प्रदेशात निकालानंतर काय होणार यापेक्षा काँग्रेस नेतृत्वाचा प्रयत्न सुरू आहे तो या पराभवाचा काळा बुक्का काँग्रेस नेतृत्वाच्या कपाळी लागू नये यासाठी. आपल्या देशात रस्त्यांवर बडय़ा धेंडांच्या मुलाबाळांना वाहतूक नियम तोडल्यावर झालीच तरी किरकोळ शिक्षा होते आणि त्यांच्या वाहतूक परवान्यावर कोणताही प्रतिकूल शेरा मारला जाणार नाही, याची काळजी घेतली जाते. काँग्रेसचे तसे आहे. पक्षाला उत्तर प्रदेशात दारुण पराभव स्वीकारावा लागला तरी हरकत नाही. पण त्या पराभवाची नोंद राहुल गांधी यांच्या खात्यावर होता नये, यासाठी काँग्रेसवाले दक्ष दिसतात. राहुलबाबांचा पक्षवाहतूक परवाना कोराच असायला हवा, याबद्दल ते दक्ष आहेत. आताही तसेच होताना दिसते.
राहुल गांधी यांनी या वेळच्या उत्तर प्रदेशाच्या लढाईची सूत्रे स्वत:च्या हाती ठेवली होती. किंग मेकर राहुलबाबा होत असताना त्यांच्या आर्य चाणक्याची भूमिका बजावली ती दिग्विजय सिंग यांनी. राहुल गांधी या दोन महिन्यांच्या रणसंगरात जवळपास २०० प्रचारसभा घेतल्या. एका अर्थाने हे राहुल गांधींचे प्रशिक्षण केंद्रच होते. याचे कारण गेल्या वर्षांत कोणत्याही मदतीशिवाय पाच मिनिटांच्या वर बोलता न येणारे राहुल गांधी या उत्तर प्रदेश निवडणुकीत फड गाजवताना दिसले. काय काय केले नाही, त्यांनी या निवडणुकीत. मुसलमानांतील मागासांना वेगळय़ा राखीव जागांचे आश्वासन दिले. ते कबूल करणाऱ्या सलमान खुर्शीद यांची पाठराखण केली. भारतात दूरसंचार क्रांतीचे दूत असणाऱ्या सॅम पित्रोदा हे अन्य मागास जातीतील आहेत हे दाखवून दिले. खरे तर या महान शोधकार्यामुळे पित्रोदा त्यांच्या दूरसंचार क्षेत्रातील योगदानापेक्षा काँग्रेसचा ओबीसी चेहरा म्हणूनच भविष्यात ओळखले जातील. ही राहुल गांधी यांची पुण्याई. शिवाय भर प्रचारसभेत समाजवादी पक्षाचा जाहीरनामा फाडून आपल्यातील अमिताभ बच्चन यांचे दर्शनही त्यांनी घडवले. मेहुणा रॉबर्ट वधेरा याला आपली बहीण प्रियांका हिच्या वतीने बोलण्याची संधी दिली. ज्या मायावती इतके दिवस काँग्रेसच्या समर्थक होत्या आणि ज्यांच्या भ्रष्टाचारांची चौकशी काँग्रेसने होऊ दिली नाही त्याच मायावती किती भ्रष्ट आहेत, हे राहुलबाबांमुळेच तर उत्तर प्रदेशवासीयांना समजले. परंतु इतके सगळे करूनही निवडणूकपूर्व पाहण्यांनुसार काँग्रेसला काही भरीव यश मिळण्याची शक्यता नाही. वास्तविक निवडणूक सर्वेक्षणांचे गांभीर्य हे प्रत्यक्ष मतमोजणीपर्यंतच असते. आधुनिक आर्य चाणक्य दिग्विजय सिंग गेले काही दिवस आपल्याला हेच तर सांगत आहेत. पण गमतीचा भाग असा की एका बाजूला हे आर्यवीर निवडणूकपूर्व सर्वेक्षणांत काहीही अर्थ नाही, असे जनतेस समजावून सांगत असताना दुसऱ्या बाजूला या सर्वेक्षणांतील अंदाजानुसार काँग्रेसची कामगिरी खरोखरच वाईट झाली तर राहुलबाबांना कसे वाचवायचे याच्याही योजना आखीत आहेत. म्हणजे ज्याला हवा तो अर्थ त्याने काढावा.
वास्तविक उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसचे भले होऊन होऊन होणार किती, हा प्रश्न आहे. कारण मुळात त्या पक्षाचा राज्यातील पायाच इतका ठिसूळ आहे की राहुलबाबांनी कितीही मजबूत इमला बांधायचे ठरवले तरी तो उभा राहू शकणार नाही. ४०३ सदस्यांच्या विधानसभेत देशातील या सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षाचे संख्याबळ आहे जेमतेम २२. म्हणजे राहुलबाबांच्या कृपेने काँग्रेसला शंभर टक्के यश मिळेल असा आशावाद व्यक्त केला तरी ही संख्या होते फार फार ४४. सर्वसाधारणपणे यशाच्या प्रमाणात इतकी वाढ होत नाही. परंतु राहुलबाबांसारखा जादूगार असल्यामुळे काँग्रेसचा वाढीचा वेग देदीप्यमान असेल असे मानावयास हरकत नाही. परंतु चाणक्य दिग्विजय सिंग यांच्या सुरुवातीच्या दाव्यानुसार हा वाढीचा वेग महादेदीप्यमान असणार होता. म्हणजे काँग्रेसची सदस्यसंख्या २२ वरून थेट किमान १२५ वर जाईल असे त्यांचे म्हणणे होते. हा वेग साधारण ५०० पट होतो. मुंबईतील बडे बिल्डर सोडले तर इतक्या वेगात प्रगती करणे कोणाही मर्त्य मानवास शक्य झालेले नाही. परंतु हे मर्त्य मानवाचे नियम गांधी कुटुंबीयास लागू होत नाहीत, अशी काँग्रेसची धारणा असल्याने यातले काहीही राहुलबाबांच्या अंगास चिकटणार नाही. कारण आम्ही हरलो तर त्यास राहुल गांधी जबाबदार नाहीतच मुळी, असे सामुदायिक सुरात सांगायला काँग्रेसजनांनी आताच सुरुवात केली आहे. त्यांना दूरचे दिसते ते असे.
वास्तविक पराभवाचा पिता कोणी नसतो, असे म्हणतात. म्हणजे यशात अनेक वाटेकरी असतात आणि पराभवाची जबाबदारी मात्र कोणास नको असते, असा त्याचा अर्थ. परंतु आपल्याकडे काँग्रेसजन इतके नि:स्वार्थ आहेत की ही म्हणच गैरलागू शाबीत व्हावी. जगात असा एकही राजकीय पक्ष नसेल की त्याच्या नेत्यांत यशाचे श्रेय घेण्यापेक्षा पराभवाची जबाबदारी घेण्यासाठी अहमहमिका लागत असेल. काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या प्रमुख रिटा जोशी असोत, चाणक्य दिग्विजय सिंग असोत वा माजी प्रदेशाध्यक्ष सलमान खुर्शीद असोत. सगळे कसे एकाच सुरात गाताना दिसतात. यातील प्रत्येकाचे म्हणणे एकच. पक्षाच्या पराभवास राहुलबाबा नाही तर मी जबाबदार आहे. प्रत्यक्ष पराभव व्हायच्या आधीच इतकी त्यागवृत्ती दाखवून त्या संभाव्य पराभवाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेणारे नेते असण्याचे भाग्य अन्य पक्षांना नाही. उत्तर प्रदेशात उत्तम कामगिरी झाली, काँग्रेसने सव्वाशेच्या वर जागा खरोखरच मिळवल्या तर यातील प्रत्येक जण पुन्हा एका सुरात गायला लागेल. त्या गाण्याचा अर्थ असेल पक्षाच्या यशामागे एकाच व्यक्तीचा हात आहे. ती म्हणजे राहुल गांधी.
दैनंदिन राजकारणाच्या खेळात राहुलबाबांची भगिनी प्रियांकाताई नसतात. त्या फक्त निवडणुकांच्या धबडग्यापुरत्या येतात आणि आपल्या आईच्या आणि भावाच्या मतदारसंघात न चुकता प्रचार करतात. याही वेळी तसा तो करताना आपण राजकारणातील बेडूक आहोत, असे त्या म्हणाल्या होत्या. म्हणजे बेडूक जसे पावसाळय़ापूर्वी बरोबर डराव डराव करायला लागतात, तसे आपण निवडणुकांपुरतेच येतो, असे त्यांचे प्रामाणिक स्वगत होते. राजकारणात दुर्मीळ असलेल्या या प्रामाणिकपणास फक्त जोड एवढीच द्यायला हवी. ती म्हणजे गांधी कुटुंबीयांचा प्राणी हा उडाला तर पक्षी असतो आणि बुडाला तर बेडूक.
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=214324:2012-03-05-15-19-01&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7