skip to main |
skip to sidebar
व्लादिमीर पुतीन
रशियन गणराज्याच्या अध्यक्षपदावर व्लादिमीर पुतीन यांची पुन्हा एकवार निवड होणे हे रशियाएवढीच भारताच्याही आनंदाची बाब आहे. अध्यक्षपदाच्या पहिल्या कारकिर्दीपासूनच (२000 ते २00८) पुतीन यांनी जगाच्या राजकारणात भारताची पाठराखण केली. त्या देशाच्या घटनेप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला दोन कार्यकालाहून अधिक काळ अध्यक्षपदावर राहता येत नसल्याने त्या पदावरून पायउतार होऊन त्यांनी रशियाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्याही काळात ते भारताच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांचे अध्यक्षपदावरील सहकारी दिमित्री मेड्वेडेव्ह यांनाही भारताशी असलेले रशियाचे संबंध दृढ राहतील याची काळजी घेतली. सोव्हिएत युनियनचा शेवट आणि तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीचा अंत झाल्यानंतर ज्या एका नेत्याने रशियाला खर्या अर्थाने स्थैर्य व सुबत्ता प्राप्त करून दिली त्याचे नाव पुतीन आहे आणि त्यांना आपल्या अध्यक्षपदावर पुन्हा एकवार ६३.७५ टक्क्यांएवढय़ा प्रचंड बहुमताने निवडून देऊन रशियन जनतेने त्यांच्यावरील आपला विश्वास नव्याने जाहीर केला आहे. त्यांच्या विरोधात उभ्या झालेल्या चार उमेदवारांपैकी मिखाईल पोरोखोव्ह या धनाढय़ उमेदवाराने स्वत:विषयीच्या अपेक्षा बर्याच उंचावल्या होत्या. मात्र १८ अब्ज डॉलर्सएवढय़ा प्रचंड मालमत्तेचा धनी असलेल्या पोरोखोव्हना या निवडणुकीत अवघी ७.७ टक्के मते मिळाली. काही काळापूर्वी पंतप्रधानपदाच्या झालेल्या निवडणुकीत पुतीन यांच्या पक्षाने बरेच गैरप्रकार केल्याचा आरोप झाला. त्यामुळे त्यांची लोकप्रियता डागाळलीदेखील. मात्र आताच्या निवडणुकीने त्या आरोपांना उत्तर मिळाले आहे. रशियाच्या घटनेत अलीकडे झालेल्या दुरुस्तीने अध्यक्षपदाचा कार्यकाल ६ वर्षांचा केला आहे. याचा अर्थ पुतीन यांची नवी कारकीर्द २0१८ पर्यंत कायम राहील व त्यावर्षी होणार्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले तर २0२४ पर्यंत ते सत्तेवर राहतील. त्या स्थितीत २000 ते २0२४ एवढा प्रदीर्घ काळ सत्तेवर राहणारे लोकशाही देशातील ते एकमेव नेते ठरू शकतील. फार न बोलता स्वस्थपणे दृढ पावले उचलणारा नेता अशी पुतीन यांची जगात प्रतिमा आहे. त्यांच्या साध्या स्मिताला व चेहर्यावरील छटेलाही जगाच्या राजकारणात महत्त्व आहे. कम्युनिस्टांच्या पाऊणशे वर्षांच्या राजवटीने दरिद्री व कंगाल बनविलेल्या रशियाला पुतीन यांच्या सत्ताकाळात बरकत आली. एक डॉलरची किंमत काही हजार रुबल्समध्ये मोजाव्या लागणार्या त्या देशाने पुतीन यांच्या काळात ६00 अब्ज डॉलर्स आपल्या गंगाजळीत जमा केले. तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनात वाढ करून त्याच्या जागतिक व्यापारावर आपला प्रभाव कायम केला. सोव्हिएत सत्ता मोडली तरी त्याच्या सत्तेसोबत एकेकाळी राहिलेले पूर्व युरोपातील देश रशियापासून दूर जाणार नाहीत याची त्यांनी काळजी घेतली आणि भारतासारख्या मित्रदेशांशी असलेले संबंध आणखी दृढ केले. एका विस्कळीत व गरीब देशाला स्थैर्य व सुबत्ता देणे, कम्युनिस्टांच्या जुलुमी हुकूमशाहीकडून त्याला स्वस्थ लोकशाहीकडे नेणे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात रसातळाला गेलेली त्याची पत मजबूत बनविणे एवढय़ा सार्या कामगिरीचे पुतीन हे नेते आहेत. युरोप आणि आशियातील शांतता कायम राखण्याचे श्रेयही त्यांच्या नावावर आहे. अशा नेत्याची आपल्या मित्र राष्ट्राच्या अध्यक्षपदी झालेली निवड निश्चितच स्वागतार्ह आहे.
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=EditorialEdition-16-1-05-03-2012-2522f&ndate=2012-03-06&editionname=editorial