जाती एकत्र करून सत्ता मिळवण्याचा सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला कोलमडला. यातून मतदारांनी दिलेला इशारा समजून घेतला पाहिजे.

उत्तर प्रदेश देशाच्या राजकारणात महत्त्वाचे राज्य आहे, ते ताब्यात ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी तळ ठोकला. झोपडपट्ट्यांचे दर्शन घेतले. उत्तर प्रदेशला आधुनिक राज्य बनविण्याचे स्वप्न ठेवले; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कॉंग्रेसच्या जागांमध्ये जेमतेम डझनभराने वाढ झाली. राजकारणातील एक मोठी लढाई राजकुमार हरला असला तरी त्याचा पराभवच विजयासारखा कसा आहे, हे सांगण्याची शर्यत दिल्ली दरबारातील झिलकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. विशेष म्हणजे युवराजाने स्वत: पराभव स्वीकारला असला तरी झिलकरी मात्र "पराभव' हा शब्द उच्चारण्यास तयार नाहीत. भाजपनेही आपले तरुण अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढविली. साध्वी उमा भारतींच्या हातात निवडणूक सूत्रे दिली. भ्रष्टाचाराचा महामेरू असलेल्या आणि मायावतींनी मंत्रिमंडळातून लाथाडलेल्या बाबूसिंह कुशावाह यांनाही वाजतगाजत आपल्या पक्षात घेतले. स्टार प्रचारकाप्रमाणे त्यांना फिरवण्यास सुरवात केली. शेवटी जननिंदेला जागून बाबूसिंह यांनीच आपला भाजप प्रवेश रद्द करून घेतला. हे सारे कमी होते म्हणून की काय, म्हणून गेली काही वर्षे म्यान केलेले राममंदिराचे हत्यारही बाहेर काढले. मायावतींपासून तुटला गेलेला ब्राह्मण साराच्या सारा आपल्याकडे येईल, असे स्वप्न पाहिले; पण या साऱ्या स्वप्नांवर सायकलीने गाडगाभर पाणी ओतले. 2007 मध्ये भाजपला 48 जागा जिंकता आल्या होत्या. आता त्यात दोन-चार जागांनी वाढ झाली, हीच काय ती गडकऱ्यांची कमाई. मुलायमसिंह यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी सारी निवडणूक फिरवून दाखविली. युवराजांनाही त्यांची जागा दाखविली. 403 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात इतरांच्या मदतीने जेमतेम पन्नासएक जागा जिंकणे, ही कॉंग्रेसची नाचक्कीच म्हणावी लागेल; पण पडलो तरी नाकावर, म्हणणाऱ्या कॉंग्रेसने मात्र आपण 22 वरून 44 वर कसे आलो, हे सांगण्यात धन्यता मानायला सुरवात केली आहे. मुलायमसिंह यांच्या मुलाने आपल्या पक्षाचा चेहरामोहराच बदलला. त्याला तरुण केले. सर्वजातीय केले. सामान्य जनतेला भावेल असा अजेंडा तयार केला. त्यामुळेच की काय, लोकांनी मायावतींच्या विरोधात समाजवादी पक्षाला पर्याय समजण्यास सुरवात केली. बाकी सर्व पक्षांवर लोकांनी विश्वास टाकला नाही. अनेक वर्षे राजकीय गटांगळ्या खाणाऱ्या आपल्या राज्याला त्रिशंकू न ठेवता स्वबळावर सरकार स्थापन करता येईल एवढे यश दिले आहे. 2007 नंतर सलग दुसऱ्यांदा असे घडते आहे. याचा अर्थ मायावतींनी समजून घेतला नाही. मुलायमसिंह तरी तो समजून घेणार का, हा प्रश्न आहे. राजकारण पूर्वी विचारावर चालायचे, आता त्याची जागा जातीने घेतली आहे. जाती एकत्र करता येतात; पण प्रत्येकाचा जातीअभिनिवेश, अहंकार, सर्व प्रकारचा स्वार्थ टिकून ठेवणे, तो गोंजारणे तसे कठीण असते. हाही सोशल इंजिनिअरिंगचा एक बायप्रॉडक्ट आहे. मुलायमसिंहसुद्धा हाच प्रयोग करणार आहेत. त्यांना तो करावा लागणार आहे. भारतीय जातवास्तव नाकारता जसे येत नाही, तसे मधाचे बोट दाखवून ते फार काळ एकत्रही ठेवता येत नाही; पण सत्तेमुळे आंधळे झालेल्या आणि जातीलाच राजकारण समजणाऱ्यांना हे कोण सांगेल?
उत्तर प्रदेशबरोबरच गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या अन्य छोट्या राज्यांतही निवडणुका झाल्या. गोव्यात कॉंग्रेसची धोबीपछाड झाली आणि राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. भाजपने मित्राच्या मदतीने येथे चमकदार कामगिरी केली आहे. कर्नाटकात अश्लील भानगडी उघडकीस आल्यानंतरही भाजपला हे यश मिळाले. पंजाबातही अकाली दलाच्या मदतीने भाजप पुन्हा सत्तेत जाणार आहे. कॉंग्रेसने तेथे लज्जारक्षणापुरते यश मिळविले, ही चांगली गोष्ट. याशिवाय छोटे मणिपूर आपल्या हातात ठेवण्यात कॉंग्रेसने यश मिळविले आहे. उत्तराखंड भाजपच्या किल्ल्यासारखे होते; पण तेही खिळखिळे होते आहे. तेथे कॉंग्रेसला एक जागा अधिक मिळाली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांचीच विकेट पडली आहे. उत्तराखंडात सत्तासंघर्ष नेमके कोणते वळण घेतो हे लवकरच स्पष्ट होईल. पाचही राज्यांमध्ये निवडणूक काळात विकासाऐवजी धुणीभांडी धुण्याचाच कार्यक्रम झाला. लोकशाहीसाठी हे चांगले लक्षण म्हणता येणार नाही.
Tags: editorial, uttar pradesh, assembly election, mayawati, sp, congress, national http://online2.esakal.com/esakal/20120307/5017657648281555872.htm