कबड्डी या मराठी मातीतल्या खेळाची लोकप्रियता वाढविण्यास महिला संघाचे विजेतेपद साह्यभूत ठरेल. या खेळातील तंत्राचे वाढलेले महत्त्वही लक्षात घ्यायला हवे.
जागतिक क्रीडा क्षेत्रात भारतीय महिलांच्या कामगिरीचा आलेख वाढता राहिल्याचे दिसून येत आहे. अलीकडच्या काळात "इंडियन टेनिस क्वीन' सानिया मिर्झाने उमटविलेला ठसा असो किंवा अनेक मुलींसाठी आदर्श असणारी बॅडमिंटनपटू साईना नेहवाल असो. अशा खेळाडूंच्या यशामुळे त्या त्या खेळांना चालना मिळाली, अधिकाधिक महिला खेळाडू त्या खेळांकडे वळल्या; परंतु देशी खेळांना ते वलय प्राप्त झाले नाही. मात्र भारतीय महिला कबड्डी संघाने पहिल्यावहिल्या विश्वकरंडक स्पर्धेत तिरंगा फडकावल्याने या अस्सल मराठमोळ्या खेळाचे आकर्षण वाढण्यास मदत होणार आहे. कबड्डी आता सातासमुद्रापार गेली आहे. परदेशात हा खेळ एव्हाना बाळसे धरू लागला आहे. त्यामुळे भविष्यात अनेक तुल्यबळ संघ तयार होतील. पाटणा येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारतीय महिला संघाचे विजेतेपद सुखावह आहेच; परंतु हे यश कायम टिकविण्यासाठी उत्तरोत्तर अधिक बलाढ्य होणे गरजेचे आहे. या खेळाचा परिघ वाढत गेल्यानंतर त्यातील यशाने गरिबांच्या या खेळाला श्रीमंती प्राप्त होऊ शकेल. पुरुषांनी यापूर्वीच विश्वकरंडक स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे आणि आता महिलांनीही तो पराक्रम गाजविला. या वर्षी प्रथमच महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या मातीतला हा मर्दानी खेळ आता खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार गेला असल्याचे या स्पर्धेतून दिसले. कबड्डीला सातासमुद्रापार नेण्याचे स्वप्न बुवा साळवी या एकांड्या शिलेदाराने सुरवातीपासून पाहिले होते. त्यांच्या हयातीत पुरुषांची विश्वकरंडक स्पर्धा झाली; पण महिलांची विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यासाठी त्यानंतर बराच अवधी गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता कबड्डीचा टक्का वाढतोय. विविध देश हा खेळ खेळत आहेत. पण जोवर ते परिपूर्ण होत नाहीत, तोवर भारताचे वर्चस्व राहणार. या पार्श्वभूमीवर परदेशी संघांनी कबड्डीतील आपली ओळख करून दिली, हे सर्वांत महत्त्वाचे. केवळ चेहराच दिसेल असा पोशाख परिधान करून खेळणाऱ्या इराणच्या महिलांनी भारताबाहेरदेखील कबड्डीचा "दम' जोरात घुमतोय हे दाखवून दिले. याच इराणच्या महिलांनी चीनमध्ये ग्वांगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाला झुंजविले होते. त्या वेळी भारताने तांत्रिक गुणाच्या जोरावर सुवर्णपदक मिळविले होते. म्हणूनच भारताबाहेरदेखील कबड्डीचा "दम' केवळ मैदानातच नव्हे, तर खेळाच्या प्रत्येक अंगातून घुमतोय याची कल्पना आली. इराणची कर्णधार गझल खलाज ही त्यांची हुकमी खेळाडू. सामन्यादरम्यान ती प्रत्येक गुणासाठी झुंजत तर होतीच; पण पंचांशी चर्चा करून निर्णयाबद्दल माहिती घेत होती. प्रसंगी तिने एक-दोनदा वादही घातला. कबड्डीच्या नियमांचा तिचा अभ्यास यावरून दिसून येतो. ही भारतीय कबड्डीला धोक्याची सूचना आहे. कबड्डी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली तेव्हा ती केवळ मॅटवर खेळली जाते इतकाच त्यातील बदल. तंत्र तेच आहे. त्यामुळे तुम्ही तंत्रात जर अचूक असाल, तर तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही. या तंत्राला केवळ आधुनिकतेची जोड मिळत जाणार यात शंका नाही. त्याच्याशी जुळवून घेणे हेच आव्हान पार पाडावे लागणार आहे.
या महिला विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात पुण्याची दीपिका जोसेफ, मुंबईच्या सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या तीन महाराष्ट्राच्या मुली होत्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी यांचा उल्लेख करता येईल. कबड्डी आणि रमेश हे समीकरण आता नवे राहिलेले नाही. आशिया स्पर्धेत ते थायलंडच्या महिला संघाचे प्रशिक्षक होते. स्पर्धेनंतरही काही काळ थायलंडने त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले होते. तरी, जेव्हा देशाची सेवा करण्याची वेळ आली तेव्हा कोल्हापूरच्या भेंडिगिरी यांनी भारतीय संघाला प्राधान्य दिले. भारतातील प्रशिक्षक, तंत्रज्ञ यांना परदेशात पाठवून खेळाचा प्रसार करणे ही एक योजना आहे. या स्पर्धेतून दुसरी गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे वेळ. या स्पर्धेत सामने वेळेवर सुरू करणे आणि संपविणे याबाबत जबरदस्त कटाक्ष पाळण्यात आला. यातून महाराष्ट्राच्या संघटकांनी धडा घेणे गरजेचे आहे. कारण महाराष्ट्रात कबड्डीचे सामने कधीच वेळेवर सुरू होत नाहीत आणि संपत तर त्याहून नाहीत. आजही महाराष्ट्रातील खेळाडू चमकदार कामगिरी करूनदेखील नोकरीसाठी प्रतीक्षा करत आहेत. आश्वासनाखेरीज त्यांच्या हातात काहीच पडत नाही. आता तरी पुरस्कर्ते या खेळाकडे आपले लक्ष पुरवतील, अशी आशा वाटते. खेळाचा प्रचार, प्रसार, अचूक तंत्र अवगत असणारे प्रशिक्षक, भारतात होणाऱ्या विविध स्पर्धांतील सामन्यांचे व्हिडिओ चित्रीकरण यांची परदेशात देवाणघेवाण करून या खेळाला अधिक भक्कमपणे सातासमुद्रापार नेता येईल. तेव्हाच या मराठी खेळाला ऑलिंपिकचे दरवाजे खुले होतील.