skip to main |
skip to sidebar
भारत-पाक मैत्रीचे नवे पर्व
भारतीय मालाला आपली बाजारपेठ खुली करून देण्याचा पाकिस्तान सरकारचा ताजा निर्णय स्वागतार्ह आणि या दोन शेजारी देशांत मैत्रीचे नवे पर्व सुरू करणारा आहे. संशय, वैर, कुरघोडी आणि प्रत्यक्ष युद्ध यांचाच इतिहास असलेल्या या देशांचा शेजारधर्म या निर्णयामुळे एका चांगल्या वळणावर येण्याचीही शक्यता आहे. व्यापार हा शांतीचा व स्नेहाचा सहकारी आहे आणि त्याच्या वाढीवर भर देण्याचे प्रयत्न एप्रिल २0११ पासूनच या देशांनी सुरू केले आहेत. आतापर्यंत भारतातील १९६३ उत्पादनांसाठी पाकिस्तानचा बाजार खुला होता. नव्या निर्णयामुळे भारताची ६८00 उत्पादने पाकिस्तानी बाजारात विकली जाणार आहेत. ज्या १२00 वस्तूंच्या व्यापारावर अजून बंदी राहिली आहे तीही येत्या काही महिन्यात दूर होऊन दोन देशांत खुला व्यापारी संबंध प्रस्थापित होणार आहे. आज भारताचा पाकिस्तानशी असलेला व्यापार केवळ २.७ अब्ज डॉलर्सएवढा आहे. त्यातली भारताची निर्यात २.३३ अब्जांची आहे. नव्या व्यवस्थेत यात अनेक पटींनी वाढ होणार असून त्याचा लाभ दोन्ही देशांना मिळणार आहे. त्याच वेळी या देशात आज होत असलेल्या चोरट्या व्यापारालाही आळा बसणार आहे. भारताला ‘मित्र राष्ट्र’ असा विशेष दर्जा आपल्या परराष्ट्रीय धोरणात देण्याचा निर्णय पाकिस्तानच्या गिलानी सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला. त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला झालेली ही सुरुवात आहे. महत्त्वाची बाब ही की या निर्णयामुळे पाकिस्तानचा आजवरचा भारतविरोधी तोंडवळा बदलणार आहे. ‘जोवर काश्मीर प्रश्न सुटत नाही तोवर भारताशी मैत्री नाही’ ही त्या देशाची आजवरची टोकाची भूमिका या निर्णयामुळे बोथट झाल्याचे व वितळल्याचे स्पष्ट झाले आहे. काश्मीर या एकाच प्रश्नावर भारताशी सहा दशकांचे वैर केल्याने पाकिस्तानचे झालेले नुकसान व त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात घ्यावी लागलेली नकारात्मक भूमिका तेथील राज्यकर्त्यांनाच नंतरच्या काळात अडचणीची ठरू लागली. शिवाय एवढे वैर करूनही आपण भारताचा विकास वा आघाडी रोखू शकत नाही हेही त्यांच्या लक्षात आले. या तेढीपायी त्या देशाने प्रथम रशियाशी वैर घेतले व ज्या अमेरिकेच्या मैत्रीचा त्याला एवढी वर्षे भरवसा होता तो देशही तालिबान आणि अल् कायदा प्रकरणात त्याच्यावर रुष्ट झाल्याचे त्याला अनुभवावे लागले. त्याहून अडचणीची बाब ही की स्वत:ला धर्मसत्ता म्हणवून घेणार्या पाकिस्तानला चीनसारख्या धर्मविरोधी भूमिका घेणार्या देशाच्या पाठबळावर त्याचे भारतविरोधी राजकारण रेटणे भाग पडले. एकच एक नकारात्मक व भारतविरोधी भूमिका घेतल्याने त्या देशाकडे पाहण्याची जगाची दृष्टीही निश्चित झाली आणि जगातील बहुसंख्य मुस्लिम देश भारताशी मैत्री राखण्यात धन्यता मानत असताना त्याला एका चमत्कारिक कोंडीपर्यंत पोहचावे लागले.. आताच्या निर्णयामुळे या देशांतील व्यापार व दळणवळण वाढेल आणि त्याचवेळी त्यांच्यात व्यापाराला लागणारा एक विश्वासू संवाद कायम होईल अशी आशा करायला जागा आहे. हे संबंध आणखी दृढ झाल्यास दक्षिण आशियात शांतता स्थापन व्हायला मदत होईल व त्याचवेळी या दोन्ही देशांना आपल्या विकासकामांकडे जास्तीचे लक्ष पुरविणेही शक्य होईल. खुल्या व्यापाराचे हे पाऊल भारताच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचे व त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविणारे आहे व त्यासाठी त्याचे सार्यांनी स्वागत केले पाहिजे.
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=EditorialEdition-16-1-04-03-2012-f9e39&ndate=2012-03-05&editionname=editorial